Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९

फुलला वसंत नाटय़ोत्सव!
मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सने पाच वर्षांत नुसते बाळसेच धरलेले नाही, तर आज देशातील महत्त्वाच्या नाटय़प्रशिक्षण विभागात त्याचा अंतर्भाव झालेला आहे. हा विभाग सुरू झाल्यापासूनच दरवर्षी वसंत नाटय़ोत्सव हा राष्ट्रीय नाटय़महोत्सव सुरू करून त्यात देशातील अभिजात नाटय़कृतींसह महत्त्वाच्या रंगकर्मीचं काम पाहण्याची संधी इथल्या विद्यार्थ्यांसह मुंबईकर रसिकांना मिळवून देण्यात या विभागाचा मोलाचा वाटा आहे. एवढंच नव्हे तर आतापर्यंत सर्वसामान्यांसाठी आडवाट असलेला विद्यापीठाचा कालिना कॅम्पस आज या नाटय़विभागामुळे त्यांच्याकरता सहजवाट झालेला आहे. याचं मोठं श्रेय निश्चितच या विभागाची धुरा वाहणाऱ्या प्रा. वामन केंद्रे यांची आहे. त्यांनी इतक्या अल्पावधीत हा विभाग नुसता स्थिरस्थावरच केला नाही, तर त्याचं स्वत:चं असं स्वतंत्र स्थान निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. दरवर्षी राष्ट्रीय पातळीवरील नाटय़महोत्सव भरवणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही. त्यात विद्यापीठासारख्या नियम व अटींच्या जंजाळातील नोकरशाही पद्धतीनं चाकोरीबद्ध काम करणाऱ्या यंत्रणेत राहून, त्यांचं सर्व तऱ्हेचं सहकार्य मिळवून हे घडवून आणणं- तेही सातत्यानं- हे तर फारच अवघड काम. परंतु प्रत्येक अडचणींशी झगडत, त्याचप्रमाणे संगीत नाटक अकादमी, राष्ट्रीय नाटय़ विद्यालय तसंच पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्र, रतन टाटा ट्रस्ट यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांचं सर्व प्रकारचं सहकार्य मिळवून त्यांनी हे जमवून आणलं.

अणुविश्वाचे आर्त
भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या नागरी अणुऊर्जा करारानंतर युरेनिअम हा शब्द वृत्तपत्रांमधून किंवा वृत्तवाहिन्यांवरुन सतत आपल्याला डोळ्यासमोर दिसू लागला. अणुऊर्जेच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे इंधन ऐवढीच आपली आणि त्या शब्दाची ओळख आहे, पण आपल्या मनात युरेनिअम म्हणजे काय असते? ते दुर्मिळ असते का? यासाठी भारताला अमेरिकेवर अवलंबून रहावे लागत आहे का? भारतात हे इंधन सापडत नाही का? अशा अनेक प्रश्नांची यादी तयार होते. या व्यतिरिक्त युरेनिअम जागतिक राजकारणातही महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. प्रत्यक्षात अणुऊर्जा निर्मितीसाठी हे इंधन महत्त्वाचे आहे. याला पर्याय आहेत पण अणुऊर्जा रिअ‍ॅक्टर्स(किमान भारतातील) हे युरेनिअमशिवाय चालणार नाहीत, अशा प्रकारचेच बनविण्यात आले आहेत. १९६७ मध्ये जेव्हा आशिया खंडातील पहिल्या अणुऊर्जा केंद्राच्या कामाची सुरुवात झाली तेव्हा जनरल इलेक्ट्रिक्स या अमेरिकन कंपनीने बनविलेले रिअ‍ॅक्टर्स हे युरेनिअमवर आधारित बनविण्यात आले. परिणामी भारताला युरेनिअमच्या पुरवठय़ासाठी अमेरिकेवर अवलंबून रहावे लागेल हा त्यामागील सुप्त हेतू असल्याचे स्पष्ट झाले. १९७४ मध्ये जेव्हा भारताने अणुबॉम्ब चाचणी केली, तेव्हा अमेरिकेने भारताला युरेनिअमचा पुरवठा बंद केला.

बालरंगपीठची बालनाटय़ शिबिरे
‘बालरंगपीठ, मुंबई’ या संस्थेतर्फे या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबई आणि उपनगरांत बालनाटय़ शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. ही शिबिरे १६ ते २६ एप्रिल या कालावधीत सकाळी ९ ते १२ या वेळेत गडकरी रंगायतन रिअर्सल हॉल (ठाणे), येथे तर सायंकाळी ५ ते ८ या वेळेत उत्कर्ष मंदिर शाळा, २, मामलेदारवाडी, मालाड (प.) येथे आणि ३ ते १३ मे या कालावधीत सकाळी १० ते १ या वेळेत दीनानाथ नाटय़गृह रिअर्सल हॉल (विलेपार्ले) येथे तसेच सायंकाळी ५ ते ८ पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (प्रभादेवी) येथे आयोजित करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त यावर्षी अलिबाग तसेच महाड येथेसुद्धा १८ ते ३० मे या कालावधीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ७ ते १५ वर्षे वयोगटांतील गुणी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. शिबिरात नाटय़माध्यमाची ओळख, अभिनयाची संकल्पना, अभिनयाचे विविध प्रकार, अभिनयाची शैली, आवाजाची जोपासना, संवादफेक, शरीराचा वापर, सभाधीटपणा, एकाग्रता, स्मरणशक्ती विकास, कल्पनाशक्ती विकास, भावनाविष्कार, ऊर्जा व उत्स्फूर्तता विकास इ. विषयांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाणार आहे. या शिबिरांत अजय वढावकर, देवेन्द्र प्रेम, अनिल सुतार, शुभांगी फावडे- लाटकर, प्रा. वामन केंद्रे आणि अन्य तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचे संचालन गौरी केंद्रे या करणार आहेत. शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी २८५४०३४० व ९८२०८६८६२८ या दूरध्वनी क्रमांकांवर सकाळी ८ ते ११, तर सायं. ५ ते ८ या वेळेत संपर्क साधावा.

नाटय़संपदा पुरस्कार
‘नाटय़संपदा’ या नाटय़संस्थेचा ४६ वा वर्धापनदिन ८ एप्रिल रोजी दु. ४.३० वा. शिवाजी मंदिर येथे साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त नाटय़संपदा निर्मित ‘अवघा रंग एकचि झाला’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येईल. नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यापासून गेली तीन वर्षे नाटय़संपदातर्फे पणशीकरांच्या निकटच्या सहकाऱ्यांच्या स्मरणार्थ दोन पुरस्कार दिले जातात. यंदाचा व्यवस्थापक कै. श्याम जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा उत्कृष्ट व्यवस्थापन पुरस्कार प्रभाकर गादेवार (नांदेड) यांना दिला जाणार आहे, तर नेपथ्यकार कै. राजाराम चव्हाण यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा रंगसज्जा पुरस्कार श्याम आडारकर यांना दिला जाणारा आहे.

‘चिरंजीव आईस’चे द्विशतक
रसिकमोहिनीनिर्मित आणि चंद्रलेखा प्रकाशित ‘चिरंजीव आईस’ या नाटकाचा २०० वा महोत्सवी प्रयोग शुक्रवार, १० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे होत आहे. ‘झी’ गौरव नामांकनासह विविध पुरस्कार या नाटकाला लाभले आहेत. अमेरिकेत घडणाऱ्या या नाटकात आजच्या काळातील वृद्धांचे एकटेपण, त्या अनुषंगाने उपस्थित होणारे प्रश्न व समस्या आणि सर्व मोहांपलीकडे गेलेल्या उतारवयातील सहजीवनाचा वेगळा विचार मांडलेला आहे. या प्रयोगाला निर्माते मोहन वाघ, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार, दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांची उपस्थिती लाभणार आहे. या प्रयोगाचे औचित्य साधून या नाटकाचे सर्वात जास्त प्रयोग पाहिलेल्या प्रतिभा शाहू मोडक, तसेच अन्य व्यक्तींचे प्रतिनिधिक सत्कार करण्यात येणार आहेत.