Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९

त्रिकोणी संघर्षांत आत्रामांच्या मतांवर भिस्त
सुरेश सरोदे

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे मारोतराव कोवासे, भाजपचे अशोक नेते, बसपचे राजे सत्यवानराव आत्राम आणि भारिप-बहुजन महासंघाचे दिवाकर पेंदाम हे चार उमेदवार प्रमुख आहेत. माना समाजाचे नेते डॉ. रमेशकुमार गजबे यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतल्याने भाजपमधील बंडखोरी टळली असली तरी मारोतराव कोवासे यांच्या उमेदवारीमुळे भाजपचे अशोक नेते यांनाही घाम फुटला आहे. या मतदारसंघात कोणत्याही पक्षात बंडखोरी नसली तरी प्रारंभापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने लोकसभा निवडणुकीच्या जय्यत तयारीत असलेले अहेरीचे राजे सत्यवानराव आत्राम यांना ऐन वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारली. त्यानंतर हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटय़ाला गेल्याने नाराज झालेले राजे सत्यवानराव हत्तीवर स्वार झाल्याने या निवडणुकीचे चित्र बदलले आहे.

पटेलांना धास्ती पटोलेंची
वामन तुरिले

भंडारा-गोंदिया मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले असून विद्यमान खासदार भाजपचे शिशुपाल पटले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि अपक्ष उमेदवार काँग्रेसचे माजी आमदार नाना पटोले यांच्यात खरी लढत असून बसपचे उमेदवार अ‍ॅड. वीरेंद्रकुमार जयस्वाल आणि भाकप व डाव्या लोकशाही आघाडीचे कॉ. शिवकुमार गणवीर यांच्यासह एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत.

भाजप हॅटट्रिकच्या तयारीत
अनिल वासनिक

दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांना दोन रुपये दराने तांदूळ देण्याची छत्तीसगडची योजना देशभर लागू करण्याची घोषणा जाहिरनाम्यात करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला त्यांच्या या बालेकिल्ल्यात विजयाची हॅटट्रिक साधण्याची संधी आहे. परंतु, २००४ च्या निवडणुकीसारखे भरघोस यश यावेळी मिळेलच, याची शाश्वती मात्र नाही. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात येत्या १६ एप्रिलला राज्यातील सर्व ११ मतदारसंघात मतदान होणार आहे. एकूण १७८ उमेदवार रिंगणात असले तरी बहुसंख्य मतदारसंघात भाजप-काँग्रेस अशीच थेट लढत आहे. काही मतदारसंघात मात्र बहुजन समाज पक्ष व भाकप-माकपही लढतीत आहे.

कोल्हापुरात पवारांची कोलांटउडी
राजेंद्र जोशी
कोल्हापूर, ७ एप्रिल

‘सामान्य जनतेची स्मरणशक्ती कमी असते’ अशा अर्थाचे एक इंग्रजी वचन आहे. या कमकुवत स्मरणशक्तीचा फायदा राजकारणात उठवण्याची एकही संधी राजकारणी दवडत नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तो पुरेपूर उठवला. गतनिवडणुकीत ज्यांच्यावर काळे धंदेवाले म्हणून टीकास्त्र सोडत निवडणुकीचा लंबक राष्ट्रवादीकडे झुकविण्यात यशस्वी झालेल्या पवारांनी ज्याच्यावर टीकेचा भडिमार केला, त्याला केवळ आपल्या दौऱ्यात बरोबर घेण्याचीच दक्षता घेतली नाही तर सायंकाळी त्यांच्या आलिशान महालात जाऊन चहापाणीही केले. पवारांच्या या खेळीमुळे राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजीराजे छत्रपती यांची बाजू भक्कम होत असली, तरी ही खेळी राष्ट्रवादीच्या हतबलतेवर आणि पवारांच्या वैचारिक विसंगतीवर प्रकाश टाकून गेली.

बंडोबांना थंड करण्यावर काँग्रेसचा भर तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल
संशय !

मुंबई, ७ एप्रिल / खास प्रतिनिधी

काँग्रेसने बंडोबांना शांत करण्याबरोबरच नाराजांची नाराजी दूर करण्यावर भर दिला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे बंडखोरी टाळण्यासाठी पुढाकार घेत असतानाच निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याच्या मुद्दय़ावर आज चर्चा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात विदर्भातील मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. त्यामुळे विदर्भातील मतदारसंघांमधील बंडखोरांना शांत करण्याबरोबरच नाराजांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

काँग्रेसच्या ‘जय हो!’ला भाजपच्या ‘भय हो!’चे भय
नवी दिल्ली, ७ एप्रिल/खास प्रतिनिधी

संगीतकार ए. आर. रहमान यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि ऑस्कर पुरस्काराचे वलय लाभलेल्या स्लमडॉग मिलेनिअरमधील ‘जय हो!’ या गीताचे कोटय़वधी रुपये मोजून हक्क विकत घेण्याचा सौदा सत्ताधारी काँग्रेस पक्षाला महागात पडला आहे.

ठाणे, मुंबईत मनसेमुळे रंगत
मुंबई,६ एप्रिल/ खास प्रतिनिधी

मुंबई महापालिका निवडणुकीत तब्बल साडेचार लाख मते घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे मुंबईतील लोकसभेच्या सहाही मतदारसंघात यावेळी रंगत निर्माण होणार आहे. मुंबई व ठाणे येथे प्रामुख्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेना-भाजप यांच्यातच लढत असली तरी मनसे ‘मराठी मतांचा’ चमत्कार करणार का, याकडे जाणकारांचे लक्ष लागून आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रचार समितीच्या प्रमुखांमध्येच जुंपली
मुंबई, ७ एप्रिल / खास प्रतिनिधी

शेतकरी कर्जमाफीच्या श्रेयावरून आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. निवडणूक प्रचारात राष्ट्रवादीने कर्जमाफीचे श्रेय कृषीमंत्री शरद पवारांना देण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जमाफीचा निर्णय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतला असून तो सामुदायिक असल्याचे सांगत काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख खासदार बाळासाहेब विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीवर तोफ डागली आहे.

मनसेचा पाठिंबा कोणत्याही पक्षाला नाही - राज ठाकरे
मुंबई,७ एप्रिल/ खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी ज्या मतदारसंघात मनसेने आपले उमेदवार उभे केलेले नाहीत त्या ठिकाणी अन्य कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला आपण पाठिंबा दिलेला नाही, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट केले. ज्या लोकसभा मतदारसंघात मनसे निवडणूक लढवत नाही तेथील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनसेची भूमिका स्पष्ट करताना राज म्हणाले की, पैसा व निवडून येण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडक जागा लढवित आहोत. यापूर्वी महापालिका निवडणुकांच्या वेळी आपण सर्व जागी उमेदवार उभे केल्यामुळे कोणत्याही एका ठिकाणी लक्ष केंद्रित करता आले नव्हते. परिणामी मुंबई महापालिकेत सात जागा, पुणे येथे आठ तर नाशिक येथे १३ नगरसेवक निवडून आले. अन्यत्रही एखाद दुसरा नगरसेवक निवडून आला होता. तेव्हाचा अनुभव लक्षात घेऊन मोजक्या जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राज यांनी सांगितले. या जागांवर सर्वशक्ती एकवटून विजयासाठी प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट करतानाच ज्या लोकसभेच्या जागा आपण लढवत नाही तेथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरू ठेवावे, असे राज म्हणाले. आपण जर आज एखाद्या पक्षाला पाठिंबा दिला आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्याच विरोधात लढण्याची वेळ आली तर लोकांना उत्तर देणे कठीण होईल, हे लक्षात घेऊन कोणत्याही उमेदवाराला आपण पाठिंबा देत नाही हे लक्षात ठेवा, असेही राज म्हणाले.