Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९

कोल्हापुरातून राष्ट्रवादीला संपवा- मंडलिक
कोल्हापूर, ७ एप्रिल / विशेष प्रतिनिधी

सर्वसामान्यांविषयींचे धोरण आणि पक्षांतर्गत लोकशाही संपुष्टात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोल्हापूर जिल्ह्य़ातून संपवणे ही काळाची गरज आहे. यासाठी लोकसभा निवडणूक ही उत्तम संधी चालून आली असून कोल्हापूरच्या स्वाभिमानाला हात घालणाऱ्यांचा वचपा काढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन करीत राष्ट्रवादीचे बंडखोर खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी मंगळवारी राधानगरी तालुक्यातील तुरूंबे येथे आपल्या प्रचाराचे रणिशग फुंकले.

निवडून आल्यास भाजपला पाठिंब्याचे घोरपडेंचे आश्वासन
सांगलीतून भाजप माघार घेणार ?
सांगली, ७ एप्रिल / गणेश जोशी
काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अजित घोरपडे यांनी निवडून आल्यास आपण भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊ, असे आश्वासन दिल्याने सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार दीपक शिंदे- म्हैसाळकर हे अखेर निवडणूक रिंगणातून माघार घेणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

कीटकनाशक प्याल्याने मृत्यू
दोन मुलींसह दांपत्याची आत्महत्या
सातारा, ७ एप्रिल/प्रतिनिधी
आपल्या दोन लहान मुलींना कीटकनाशक पाजून व स्वत: प्राशन करून बामणोली तर्फ कुडाळ ता. जावली. जि. सातारा येथील एका दाम्पत्याने आत्महत्या केली. दोन मुलींपैकी एक मुलगी झोपेतच मृत झाली, तर दुसरी रुग्णालयात उपचार घेत असताना मयत झाली. कर्जबाजारीपणाला कंटाळून ही आत्महत्या घडल्याचे परिसरात बोलले जात आहे.

अलमट्टी साठय़ाबाबत कर्नाटकाकडून केंद्रीय जल आयोगाची फसवणूक?
धरणाची उंची दोन फुटांनी कमी दाखविली
मिरज, ७ एप्रिल / वार्ताहर
सांगली व कोल्हापूर जिल्हय़ातील कृष्णा काठावरील गावांना महापुराचा धोका उत्पन्न करण्यास अलमट्टी जलाशय कारणीभूत असून, जलसाठय़ाबाबत कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाने केंद्रीय जल आयोगाची चक्क फसवणूक केली आहे. कर्नाटकची ही बनवेगिरी लवादाच्या निर्देशानुसार तपासणी करणाऱ्या संयुक्त पथकाच्या अभ्यासात स्पष्ट झाली असल्याचे समजते. या धरणातील पाणीसाठय़ाची उंची चक्क दोन फुटांनी कमी दर्शवून कर्नाटकने महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेशचीही फसवणूक केली आहे.

तुम्हारे गाँवसे आम आये है..
प्रचार सुरू झाला आणि भाईंनी आता गल्लोगल्ली, टेकडय़ा, सारसबाग धुंडाळायला सुरूवात केली आणि मिळेल त्याला हात जोडून मत देण्याचे आवाहन करण्यास सुरूवात केली. मग प्रचार करताना त्यांनी रविवारचा मुहूर्त साधून गुलटेकडी मार्केट यार्ड सकाळीच गाठले आणि व्यापाऱ्यांना हाताशी धरले. काही व्यापाऱ्यांसह कार्यकर्त्यांना घेऊन भाईंनी विविध ठिकाणांहून येणाऱ्या ग्राहकांसह, व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या. सोबतच्या व्यापाऱ्याने भाईंच्या ‘टीम’ला अशाच एका आंब्याच्या व्यापाऱ्याच्या भेटीस नेले.

सहावे सत्यशोधक साहित्य संमेलन साताऱ्यात
डॉ. श्रीराम गुंदेकर अध्यक्ष
सातारा, ७ एप्रिल/ प्रतिनिधी
अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या वतीने येत्या ३० व ३१ मे रोजी सातारा येथील धनलक्ष्मी मंगल कार्यालयात ६ वे सत्यशोधन साहित्य संमेलन होणार आहे. त्याचे अध्यक्ष लातूरचे विचारवंत डॉ. श्रीराम गुंदेकर असून उद्घाटक डॉ. बाबुराव गुरव आहेत, अशी माहिती सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष व संमेलनाचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड. वसंतराव फाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मिरजेमध्ये रॉकेलचा काळा बाजार उघड
मिरज, ७ एप्रिल / वार्ताहर

जिल्हा पुरवठा विभागाच्या हप्तेगिरीमुळे शहरात बोकाळलेला रॉकेलचा काळा बाजार मंगळवारी उघडकीस आला. पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या विशेष पथकाने छापा टाकून सुमारे दहा हजार रुपये किमतीचे ४५५ लीटर रॉकेल जप्त केले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. सर्वसामान्य आवश्यक ठरणारे रॉकेल रेशनिंग दुकानातून गायब करून ते वाहनधारकांना प्रतिलीटर २५ रुपये दराने विक्री करणारी रॉकेल तस्करांची एक टोळी मिरज शहरात कार्यरत आहे. ही टोळी रॉकेल हॉकर्सकडून नियंत्रित दरापेक्षा जादा दराने रॉकेल खरेदी करून साठा करीत होती. याची माहिती शहर पोलीस ठाण्याकडील काहींना होती. तसेच पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनाही याची कल्पना होती. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते. पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या विशेष पथकाने कोल्हापूर चाळीतील अड्डय़ावर छापा टाकून साठवलेले ४५५ लीटर निळे रॉकेल जप्त केले. याप्रकरणी दत्तात्रय बिहारीलाल परदेशी (वय ५१) याला अटक करण्यात आली असून, त्याचे आणखी दोन साथीदार फरारी झाले आहेत.

सहायक पोलीस निरीक्षकाचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू
सोलापूर, ७ एप्रिल/प्रतिनिधी
सोलापूर ग्रामीणच्या मोहोळ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर रामचंद्र तथा एस. आर. भोसले (वय ५०) यांचे मंगळवारी सकाळी पोलीस ठाण्यात काम करीत असताना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले. कामाच्या अतिताणामुळे त्यांच्यावर मृत्यू ओढवला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन बंधू असा परिवार आहे. भोसले हे मोहोळ पोलीस ठाण्यात गेल्या सहा महिन्यापासून नेमणुकीस होते. कुरुल येथे एका व्यक्तीच्या मृत्यूच्या संदर्भात निनावी पत्र आल्याने त्याची चौकशी सहायक पोलीस निरीक्षक भोसले यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यासंदर्भात सकाळी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांच्याशी चर्चा करीत असतानाच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने गावातील एका खासगी दवाखान्यात नेले असता काही वेळातच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. निवृत्त पोलीस आयुक्त एल. आर. भोसले व सहायक पोलीस निरीक्षक आर. आर. भोसले हे त्यांचे बंधू होत. उद्या बुधवारी त्यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्य़ातील कोरेगाव येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

उमेदवारांना ‘गावबंदी’
सोलापूर, ७ एप्रिल/प्रतिनिधी
बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव मध्यम प्रकल्पांतर्गत पुनर्वसित झालेल्या महागावात कोणत्याही पायाभूत सुविधा नसल्यामुळे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांना ‘गावबंदी’ करुन निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या बार्शी तालुक्यातील महागाव हे प्रकल्पग्रस्त गाव असून शासनाने या गावाच्या विकासाकडे सतत दुर्लक्ष केल्याची संतप्त भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात शिवशंकर घोलप, शांतिलाल घोलप, संतोष घोलप, ज्ञानेश्वर चापळे, निशांत घोलप, दिगंबर काशीद, अंकुश गायकवाड, विलास मुळे आदी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांना निवेदन सादर केले आहे. तसेच या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार परिषदा घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

सोलापुरात पाऊस
सोलापूर, ७ एप्रिल/प्रतिनिधी
वैशाख वणव्याचा त्रास समस्त सोलापूरकरांना होत असताना मंगळवारी दुपारनंतर अचानकपणे हवामानात बदल होऊन मेघगर्जनेसह वळिवाच्या पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे सर्वाना काहीसा दिलासा मिळाला. दुपारी चारनंतर वळिवाच्या पावसाला प्रारंभ होऊन काही वेळातच सारे रस्ते जलमय झाले होते. हा आल्हाददायक पावसाचा सुखद अनुभव घेण्यासाठी लहान मुले अंगावर पावसाचे पाणी झेलत होती. ४२ अंश सेल्सियसच्या घरात गेलेल्या असह्य़ तापमानामुळे अंगाची लाही लाही होत असताना या वळिवाच्या पावसाने उन्हाळ्याचा त्रास हलका केला.

महावीर जयंतीनिमित्त सोलापुरात मान्यवरांचा सत्कार, महाप्रसाद
सोलापूर, ७ एप्रिल/प्रतिनिधी

भगवान महावीर जयंतीनिमित्त सोलापुरात जैन सोशल ग्रुपच्या वतीने उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल इंदरमल जैन, जवाहरलाल मुनोत, चेतन संघवी, सत्यजित शहा, नंदकिशोर शहा, भद्रेश शहा यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाप्रसादाच्या कार्यक्रमात चार हजार भाविकांनी लाभ घेतला. महावीर जयंतीनिमित्त जैन समाजाचा ‘स्वामी वत्सल’ अर्थात स्नेहभोजनाचा कार्यक्रम सलग सहाव्या वर्षी झाला. या कार्यक्रमात जाई-जुई विचारमंचच्या संस्थापिका-अध्यक्षा कु. प्रणिती शिंदे यांच्यासह माजी आमदार विश्वनाथ चाकोते, तिलोकचंद मुनोत, माजी महापौर नारायणदास राठी, विश्वनाथ करवा, रंगनाथ बंग, रामवल्लभ जाजू, रमेश मर्दा, श्रीनिवास भुतडा, धनराज मिनियार, घनशाम जाखोटिया, अनिल सलगर, अमरचंद रांका, अ‍ॅड. जयकुमार कस्तुरे, सी. आर. दोशी, प्रकाशचंद वेद, फुसालाल कोचर, प्रकाश डाकलिया, भैरुलाल लुंकड, अतुल भंडारी, केतन शहा, दीपक मुनोत, डॉ. प्रदीप नांदगावकर, कल्पेश मालू आदींचा प्रामुख्याने सहभाग होता.

सोलापुरात १२ एप्रिलपासून बालनाटय़ प्रशिक्षण शिबिर
सोलापूर, ७ एप्रिल/प्रतिनिधी

दरवर्षांप्रमाणे यंदाही हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वतीने दि. १२ ते २४ एप्रिलपर्यंत बालनाटय़ अभिनय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तिसरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या शिबिरात भाग घेता येईल.
या शिबिरात कायिक, वाचिक अभिनयाबरोबरच रंगमंचीय खेळ, ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ आदी रंगमंचाशी निगडित प्रकार शिकविले जाणार आहेत. बालनाटय़ चळवळीतील नाटय़कलावंत मीरा शेंडगे, अमोल धाबळे, राजेश जाधव, जयप्रकाश कुलकर्णी, अभिराम सराफ, मंजूषा गाडगीळ यांचे मार्गदर्शन लाभणाऱ्या या शिबिरातून तयार झालेल्या विद्यार्थ्यांना घेऊन आगामी काळात नाटय़संहिता लेखन, बालनाटय़े यासारखे काही प्रकल्प राबविले जाणार आहेत. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये दुपारी ३ ते ६ दरम्यान चालणाऱ्या या शिबिरात सहभागी होण्यासाठी मीरा शेंडगे (भ्रमणध्वनी ९८२२३७९८६७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. जी. एम. रजपूत यांनी केले आहे.

‘भुजबळ, मुंडेंना पराभूत करावयास जाणाऱ्या मेटेंनी आता समोर यावे’
कराड, ७ एप्रिल/वार्ताहर
छगन भुजबळ व गोपीनाथ मुंडे यांना पराभूत करावयास जाणार असल्याची विनायक मेटे यांची घोषणा हवेत विरली आहे असल्याची टीका करून यासाठी आता पडद्याआड गेलेल्या मेटेंनी समोर आले पाहिजे, असे आवाहन राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत केले. मराठा आरक्षणाचे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्नही मेटेंकडून झाल्याची टीका त्यांनी केली. यावर मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी प्राणपणाची तयारीही मेटेंनी दाखवली होती. याबाबत कोंढरे यांना छेडले असता, या वल्गनेपेक्षा त्यांनी केवळ थोडासा त्याग करावा इतकीच आमची अपेक्षा असल्याचा टोला त्यांनी लगावला. मराठा आरक्षणासंदर्भात मेटेंनी विधिमंडळात कधी तोंड उघडले नसल्याचे कोंढरे यांनी आवर्जुन नमूद केले. मराठय़ांच्या हृदयात स्थान मिळवायचे असेल तर मराठा आरक्षणाशी प्रामाणिक रहावे असे त्यांनी सुनावले.

स्वामी समर्थाच्या पुण्यतिथीनिमित्त धर्मसंकीर्तनाचे आयोजन
अक्कलकोट, ७ एप्रिल/ वार्ताहर
श्री स्वामी समर्थाच्या १३१व्या पुण्यतिथीनिमित्त दि. १० ते २३ एप्रिलपर्यंत धर्मसंकीर्तनाचे आयोजन वटवृक्षदेवस्थान मंदिराच्या प्रांगणात करण्यात आल्याची माहिती संयोजक डॉ. हेरंबराव पाठक यांनी दिली. गुरुवार, दि. २३ रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा १३१ वा पुण्यतिथी सोहळा पहाटे दोन वाजता नगर प्रदक्षिणेला प्रारंभ पहाटे ४ वा. काकड आरती अभिषेक, दुपारी १२ वाजता राजघराण्याच्या वतीने स्वामी समर्थाची महापूजा, सायंकाळी ५ वाजता पालखी उत्सवाला प्रारंभ, रात्री उत्सव समाप्त होईल.