Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९

मालिका जिंकली, पण..
२-० विजयात पावसाचा अडथळा
सामना व मालिकेत गौतम गंभीर सर्वोत्तम
वेलिंग्टन, ७ एप्रिल / पीटीआय

अपेक्षेप्रमाणे आलेल्या पावसामुळे न्यूझीलंडमध्ये २-० फरकाने मालिका जिंकण्याच्या आणि भारताच्या क्रिकेट इतिहासातील १००वा कसोटी विजय मिळविण्याच्या ‘टीम इंडिया’च्या स्वप्नावर पाणी फेरले गेले. पण हॅमिल्टनची पहिली कसोटी जिंकून घेतलेल्या १-० आघाडीच्या जोरावर तब्बल ४१ वर्षांनी न्यूझीलंडच्या मातीत कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास धोनीच्या भारतीय संघाने घडविला. १९६८मध्ये मन्सूर अली खान पतौडी यांच्या भारतीय संघाने ३-१ असा विजय साकारला होता, तशीच क्रांती धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये घडविली. अखेरच्या कसोटीत विजय हुकल्याची चुटपूट मात्र क्रिकेटरसिकांना लागून राहिली. अखेरच्या दिवशी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता आणि ती शक्यता अखेर खरी ठरली. भारताच्या ६१७ धावांचा पाठलाग करताना ८ बाद २८१ अशा कठीण स्थितीत असलेला न्यूझीलंड संघ पराभवापासून थोडक्यात बचावला.(सविस्तर वृत्त)

अमर सिंह यांची पक्ष सोडण्याची धमकी
जयाप्रदाच्या उमेदवारीवरून समाजवादी पक्षात राडा
नवी दिल्ली, ७ एप्रिल/खास प्रतिनिधी

सिनेतारका जया प्रदा यांना उत्तर प्रदेशच्या रामपूर मतदारसंघातून वतीने उमेदवारी देण्याच्या मुद्यावरून पक्षाचे ज्येष्ठ व प्रभावी मुस्लीम नेते आझम खान यांचा विरोध असह्य झाल्यामुळे समाजवादी पार्टीचे सर्वशक्तीमान सरचिटणीस अमर सिंह यांनी पक्ष सोडण्याची धमकी दिली आहे. मात्र, आझम खान यांच्या तुलनेत अमर सिंह यांची उपयुक्तता अधिक असल्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे.

जगदीश टायटलर यांना क्लीन चिट दिल्याचा निषेध
पत्रकाराने चिदंबरम यांच्या दिशेने बूट भिरकावला
नवी दिल्ली, ७ एप्रिल/खास प्रतिनिधी
शीख विरोधी दंगलीत खासदार जगदीश टायटलर यांना सीबीआयने क्लीन चिट दिल्याच्या निषेधार्थ उत्तर भारतातील प्रतिष्ठित हिंदूी वृत्तपत्र ‘दैनिक जागरण’चा पत्रकार जर्नेल सिंग याने आज एका पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या दिशेने जोडा भिरकावून खळबळ उडवून दिली. जर्नेल सिंगला खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लगेच ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले. जर्नेल सिंगला माफ केल्याचे जाहीर करून चिदंबरम व काँग्रेसने या घटनेवर पडदा टाकला, तर तुघलक रोड पोलीस ठाण्यात विचारपूस करून पोलिसांनी त्याला सोडून दिले.

‘हत्ती’ कुणाचे मनसुबे उधळणार?
आज शिवाजी पार्कवर मायावतींची सभा
मुंबई, ७ एप्रिल / प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकांत परंपरागत समीकरणे उद्ध्वस्त करण्याची क्षमता राखणाऱ्या बहुजन समाज पक्षाची जाहीर प्रचार सभा उद्या शिवाजी पार्कवर दुपारी दोन वाजता होत असून बसपच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बहेन मायावती कोणता नारा देणार, या विषयी औत्सुक्य आहे. एकाही पदाधिकाऱ्याला देण्यात न आलेले तिकीट आणि शून्य टक्के बंडखोरी या पाश्र्वभूमीवर बसपचा ‘हत्ती’ या वेळी भल्याभल्यांचे अंदाज चुकवण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना मुंबईतील मायावतींची ही सभा विक्रमी करण्याचा चंग बसपच्या महाराष्ट्र शाखेने बांधला आहे.

शाहरूख-आमिर यांच्यात पॅचअप?
मुंबई, ७ एप्रिल / प्रतिनिधी

खासगीत एकमेकांना कोपरखळ्या मारणारे आणि टीका करणारे शाहरूख आणि आमीर खान आज मात्र एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून बसले होते. एवढेच नव्हे तर एकमेकांशी चर्चाही करीत होते. त्यांच्या एकत्र येण्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये उत्सुकता राहिली नसती तर नवलच! हिंदी चित्रपटसृष्टीतील हे दोन प्रवाह एकत्र येण्याचे निमित्त होते हिंदी चित्रपट निर्माते व वितरकांनी मल्टिप्लेक्सविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनाचे. आज शाहरूख आणि आमीर खानने निर्माते-वितरकांची बाजू पत्रकारांसमोर मांडली. गेली सुमारे वीस वर्षे चित्रपटसृष्टीत राहूनही एकत्र चित्रपट न केलेल्या या दोन कलाकारांनी आज मात्र एकाच मुद्दय़ावरील आपली सारखी मते मांडून आपल्यात मतभेद नसल्याचे भासवले.

मिलिंद देवरा यांच्यासाठी अरुण गवळींची माघार
मुंबई, ७ एप्रिल/प्रतिनिधी

चिंचपोकळी मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेलेले आमदार अरुण गवळी यांनी मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय बदलला आहे. गवळी यांची कन्या व नगरसेवक गीता गवळी यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, गवळी यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय मागे घेतला आहे. भायखळा विभागाचा विकास होणे महत्त्वाचे असून लोकसभेत मतविभाजनाचा काहीच फायदा होणार नाही. त्यापेक्षा काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केल्यास काँग्रेस या विभागाचा विकास करील, असा आम्हाला विश्वास वाटत असल्याचे गीता गवळी म्हणाल्या. गवळी यांनी मिलिंद देवरा यांच्या समर्थनार्थ उमेदवारी मागे घेतल्याने आता दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील चित्र पुन्हा पालटले आहे. मोहन रावले यांच्यासारख्या मातब्बर शिवसैनिकामुळे मिलिंद देवरा यांना ही निवडणूक अत्यंत कठीण जाणार असे चित्र होते. मात्र आता गवळी यांनी देवरा यांच्या बाजूने उडी घेतल्याने चित्र पालटण्याची शक्यता आहे. देवरा यांच्या विरोधात बसपाचे महंमदअली उतरल्याने मुस्लिम मतांचे गणित नक्की कसे असेल हे सांगणे कठीण झाले होते. मात्र त्याचवेळी मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यामुळे काँग्रेस व शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना विजयाची समान संधी होती. मात्र गवळी यांनी अचानक उमेदवारी जाहीर केल्याने मिलिंद देवरा यांच्यासाठी ती मोठी डोकेदुखी ठरली होती. आता मात्र गवळी यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतानाच काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केल्याने देवरा यांना फायदा होऊ शकेल, असे बोलले जात आहे.

टायटलर, सज्जनकुमार यांच्यावर टांगती तलवार
नवी दिल्ली, ७ एप्रिल/खास प्रतिनिधी

शीखविरोधी दंगलींसाठी काँग्रेसचे खासदार जगदीश टायटलर यांना सीबीआयने क्लिन चीट दिल्याबद्दल पत्रकार जर्नेल सिंगने गृहमंत्री चिदंबरम यांच्या दिशेने बूट भिरकावून केलेल्या निषेधानंतर आता दिल्लीतील दोन्ही ‘कलंकित’ उमेदवार सज्जनकुमार आणि जगदीश टायटलर यांच्या उमेदवारीवर फेरविचार करण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीतून सज्जनकुमार आणि टायटलर यांना उमेदवारी देणार नाही, अशी घोषणा काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी तीन महिन्यांपूर्वी अमृतसर येथे केली होती. पण राहुल गांधींच्या घोषणेकडे कानाडोळा करून शीखविरोधी दंगलीत आरोपी असलेल्या या दोन्ही नेत्यांना पुन्हा काँग्रेसची तिकीटे देण्यात आली. मात्र, आजच्या घटनेनंतर टायटलर आणि सज्जनकुमार यांचे ओझे काँग्रेसने आणखी किती काळ वाहायचे यावर पक्षात गंभीरपणे फेरविचार सुरु झाला आहे. शीख मतदारांसह काँग्रेसमधील अनेक नेत्यांचा विरोध असूनही सज्जनकुमार आणि टायटलर यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळविले होते आणि यंदाही त्यांना विजयाची नामी संधी असल्याचे म्हटले जात आहे. जर्नेल सिंगने बूट भिरकविल्यानंतरही चिदंबरम आणि काँग्रेसने ज्या संयमाने हे प्रकरण हाताळले त्यामुळे जर्नेल सिंगचा उद्देश पूर्णपणे सफल झाला नाही. पण भाजप आणि अकाली दलाकडून होत असलेल्या राजकारणाला कायमचा पूर्णविराम देऊन शीखांचा विरोध संपुष्टात आणण्यासाठी टायटलर आणि सज्जनकुमार यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे.

प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी लालूंविरुध्द गुन्हा दाखल
किशनगंज (बिहार), ७ एप्रिल / पी.टी.आय.
मी देशाचा गृहमंत्री असतो तर वरुण गांधी यांना रोलरखाली चिरडले असते या प्रक्षोभक विधानाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने लालूप्रसाद यादव यांच्याविरुध्द किशनगंज शहर पोलिसात गुन्हा दाखल केला. किशनगंजचे जिल्हा दंडाधिकारी फारुख अहमद यांनी याबाबत बोलताना सांगितले की, लालू प्रसाद यादव यांनी केलेले हे वक्तव्य आपण ध्वनिचित्रफितीद्वारे पाहिले आहे. या वक्तव्याने जातीय सलोखा तसेच शांतता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे लालूंविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लालूंनी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याची ध्वनिचित्रफित निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली असून लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल, असेही अहमद म्हणाले. दरम्यान, वरुण गांधी यांना रोलरखाली चिरडण्याची भाषा चिथावणीखोर नसून त्याचा अर्थ वरुणवर कडक कारवाई केली जाईल असा होतो, असे सांगत लोकजनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा रामविलास पासवान यांनी लालूंची बाजू घेतली. लालूंची भाषणशैली ही वेगळ्या धाटणीची असून त्यामधून नेमका अर्थ समजून घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

मोदींबरोबर प्रचार करण्यास नितीशकुमार यांचा नकार
नवी दिल्ली ७ एप्रिल/पीटीआय
नरेंद्र मोदी यांच्याबरोबर निवडणूक प्रचार करणार नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज सांगितले. मोदी यांच्याबरोबर सभा घेणार काय असे विचारले असता त्यांनी सांगितले की, कधीच नाही, त्यांच्याबरोबर कशासाठी जाऊ. त्याची काही गरज नाही.आमच्या राज्यात जातीय सलोखा आहे. मोदींना आमचा आक्षेप नाही पण बिहारमधील भाजप नेते सक्षम आहेत शिवाय भाजप नेते लालकृष्ण अडवाणी बिहारमध्ये येणार आहेत, मी त्यांच्याबरोबर सभा घेणार आहे. आमच्याकडे भाजप नेते सुशील मोदी आहेत ते सक्षम आहेत.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी