Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी पवारांचे हात बरबटलेले!
परभणी, ७ एप्रिल/वार्ताहर

‘ज्यांचे हात रक्ताने बरबटलेले आहेत त्यांच्या हाती सत्ता सोपविणार काय?’, असे म्हणणाऱ्या शरद पवार यांचेही हात महाराष्ट्रात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी बरबटलेले आहेत अशी थेट टीका करीत आज शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर थेट हल्ला चढविला. स्टेडियम मैदानावर श्री. ठाकरे यांची जाहीर सभा झाली.

‘महाराष्ट्र दोन वर्षांत वीजकपातमुक्त बनवू’
भोकर, ७ एप्रिल/वार्ताहर

राज्यातील आघाडी सरकारने १६ तास वीजकपात करून शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन उद्ध्वस्त केले आहे. जनतेने सत्ता दिल्यास भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती दोन वर्षांत राज्याला वीजकपातमुक्त करील, अशी ग्वाही भा. ज. प.चे प्रदेशाध्यक्ष नितिन गडकरी यांनी आज दिली. लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातील भा. ज. प.चे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ शहरातील मोंढा मैदानावर आज जाहीर सभा झाली.

शेतकरी हीच माझी जात - मुंडे
बीड, ७ एप्रिल/वार्ताहर

‘‘शेतकरी हाच माझा धर्म आणि जात आहे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीत, हे मला काशीयात्रेला पाठविणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. पराभव दिसू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पातळी सोडून ‘अरे तुरे’ची भाषा वापरू लागले आहेत. आपण २३ तारखेपर्यंत शांत राहून त्यानंतरच त्यांना उत्तरे देऊ,’’ अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व बीड मतदारसंघातील उमेदवार गोपीनाथ मुंडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा समाचार घेतला.

एक गाडी बाकी अनाडी
*एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांला स्वत:स नेता म्हणून घ्यायची तीव्र इच्छा होती. जनता मात्र त्याला नेता म्हणत नव्हती. वैतागला बिचारा आणि गेला राजकीय गुरूकडे गेला. गुरुमंत्र मिळाला. ‘लोकसभा निवडणुका आल्यात. हात धुवून घे. उमेदवारास गाडी माग आणि गाडीत बसून मतदारांना हात करीत फिर. मतदार तुला नेता म्हणतात की नाही बघ.’ मंत्राप्रमाणे त्याने उमेदवाराकडे गाडी मागितली. उमेदवारानेही मागणी लगेच पूर्ण केली. कार्यकर्ता सकाळ, संध्याकाळ गाडीतून हात करीत नळदुर्गमधून फिरू लागला. मतदार बुचकाळ्यात पडले.

औरंगाबाद परिसरात मेघगर्जनेसह पाऊस
औरंगाबाद, ७ एप्रिल/प्रतिनिधी

शहराचे तापमान गेल्या काही दिवसांत ४० अंश सेल्सियसच्याही वर जाऊ लागले होते. गेल्या दोन दिवसांपासून मात्र तापमानात घट झाली आणि आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस झाला. पंधरा मिनिटे पाऊस पडला. विजांचा कडकडाट चालू असला असला तरी सुदैवाने कोठेही वीज कोसळल्याचे वृत्त नाही. आजच्या पावसामुळे वातावरणातील असह्य़ होणारा उकाडा काही अंशी कमी झाला आहे.

शासकीय खर्चाचा महिना
राज्य घटनेच्या अनुच्छेद ११२ ते ११६ नुसार दर वर्षी शासनाचा अर्थसंकल्प तयार केला जातो. मागील ५९ वर्षांपासून ही प्रक्रिया सतत सुरू आहे. राज्याचा अर्थसंकल्प एप्रिल ते मार्च या १२ महिन्यांच्या कालावधीकरिता असतो. अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेला संपूर्ण निधी ३१ मार्चपावेतो खर्च करणे बंधनकारक असते. या कालमर्यादेची जाणीव शासनव्यवस्थेत काम करणाऱ्या सर्वानाच आहे. तथापि, कोणत्याही वर्षांचे अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले असता असे स्पष्टपणे दिसून येते की, अर्थसंकल्पातील एकूण तरतुदींपैकी २५ ते ३० टक्के निधी एकटय़ा मार्चमध्ये वितरित केला जातो आणि अंदाजे १० टक्के निधी ३१ मार्चला वितरित केला जातो.

उमेदवारांची कुटुंबे रंगली प्रचारात!
सतीश टोणगे
कळंब, ७ एप्रिल

राजकीय सत्ता मिळविण्यासाठी सर्वच पक्ष, उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करीत आहेत. काहीही झाले तरी ही लोकसभेची निवडणूक जिंकायचीच या जिद्दीपोटी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांचे अख्खे कुटुंब रस्त्यावर उतरून, मतदारांना मतदान करण्याविषयी विनंती करीत आहेत. इतर वेळी घराबाहेर न पडणाऱ्या महिलाही आता ग्रामीण भागात, शेतात, वस्तीवर जाऊन उन्हाचे चटके सहन करीत प्रचारात सहभागी होत आहेत.

महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी पवारांना शक्ती द्या - आर. आर.
जालना, ७ एप्रिल/वार्ताहर

महाराष्ट्राच्या अस्मितेची जाणीव ठेवून मराठी माणसाची मान दिल्लीत ताठ ठेवण्यासाठी शरदचंद्र पवार यांना या निवडणुकीत शक्ती द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी आज केले. परभणी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांच्या प्रचारासाठी तालुक्यातील विरेगाव येथे श्री. पाटील यांची आज सभा झाली.

भ्रष्टाचार थांबविण्यासाठी लढा देणारा असावा
सध्या देशात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. भ्रष्टाचाराचा भस्मासूर थोपविण्यासाठी प्रत्यक्षात मात्र कोणीच लक्ष देण्यास तयार नाही. यामुळे सरकारच्या योजना खऱ्या लाभार्थीपर्यंत पोहोचत नाहीत. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लढा देणाऱ्या लोकप्रतिनिधीची सध्या नितांत गरज आहे. आपण जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी म्हणून संसदेत आलो आहोत याचे भान लोकप्रतिनिधींना असणे गरजेचे आहे. आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधी निवडून गेले; परंतु त्यांनी भ्रष्टाचाराच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. या साठी भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून टाकण्यात प्रयत्नशील असणारा व स्वत: निष्कलंक असणाराच खरा लोकप्रतिनिधी आहे.

बालेकिल्ला अभेद्यच राहील
परभणी मतदारसंघातील जनतेने शिवसेनेवर कायम विश्वास टाकला आहे. या विश्वासाच्या जोरावरच शिवसेनेचा हा बालेकिल्ला याही निवडणुकीत अभेद्य राहील. या जिल्ह्य़ाला विकासाभिमुख चेहरा देण्यासाठी आणि जिल्ह्य़ात कृषिऔद्योगिक समाजरचना उभी करण्यासाठीच शिवसेना मैदानात उतरली आहे. निवडणुकीत गणेश दुधगावकर मोठय़ा मताधिक्क्य़ाने विजयी होतील. शिवसेनेकडे निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी आहे. स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची अभेद्य वज्रमूठ या जोरावर शिवसेनेचा बालेकिल्ला कायम राहील.

विकासाच्या धोरणांमुळे समर्थनाची सुप्त लाट
काँग्रेसचे सर्व गट-तट कामाला लागले आहेत. काँग्रेस पक्षाचे सहकार्य, खासदार तुकाराम रेंगे यांचा पाठिंबा आणि केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्यांच्या हिताची घेतलेली धोरणे यामुळे परभणी मतदारसंघात विजय आमचाच होईल. केंद्रातल्या आघाडी सरकारने ग्रामीण भागाच्या विकासाला चालना दिली. भारत निर्माण, जलस्वराज्य या सारख्या प्रकल्पांमुळे ग्रामीण भागाचे जनजीवन सुधारले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे कमी झाले. अल्प दरात शेतकऱ्यांना कर्ज मिळू लागले.

केंद्रातच नव्हे तर राज्यातही भगवा फडकेल
‘ज्यांचे हात रक्ताने माखले आहेत, त्यांच्या हाती सत्ता सोपविणार का?’ हा शरद पवार यांचा कांगावा म्हणजे मतदारांचीच घोर फसवणूक आहे. सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाचे प्रश्न पवारांना महत्त्वाचे वाटत नाहीत. नरेंद्र मोदी यांच्याविषयी द्वेषमूलक प्रचार करून त्यांना निव्वळ मतांचे राजकारण करायचे आहे. मोदी यांनी गुजरातचा चेहरामोहरा बदलला. उद्योगाला चालना दिली याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. मतदारांना मात्र हे राजकारण आता कळू लागले आहे. त्यामुळे केवळ केंद्रातच नव्हे तर राज्यातही येणाऱ्या काळात भगवा फडकेल.
‘लोकसभेची निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्दय़ावर लढवत आहोत,’ असे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सांगत असले तरीही ते विकासाबद्दल मात्र काहीच बोलत नाहीत.

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना हवे ते प्रश्न विचारा. फक्त प्रश्न व्यक्तिगत, आरोप करणारे नसावेत, एवढे नक्की. प्रश्न कोणाला विचारायचा आहे, याचा उल्लेख करून नेमक्या शब्दांत प्रश्न विचारा. आपले प्रश्न ‘लोकसत्ता’च्या औरंगाबाद कार्यालयात पाठवा. प्रश्नकर्त्यांचे संपूर्ण नाव व पत्ता अवश्य द्यावा. lokmtv@gmail.com या पत्त्यावरही प्रश्नांचे ‘इ-मेल’ पाठवता येईल.
लातूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार जयवंत आवळे यांना.

‘काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नये’
बीड, ७ एप्रिल/वार्ताहर

स्वातंत्र्याच्या साठ वर्षांनंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दलित समाजाचा केवळ सत्तेसाठी प्रलोभने दाखवून वापर केला. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या भूलथापांना बळी न पडता भाजप-शिवसेनेचे उमेदवार आमदार गोपीनाथ मुंडे यांना मत देण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य अमित उजगरे यांनी केले. लोकसभेच्या बीड मतदारसंघात भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार आमदार गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद सदस्य व भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अमित उजगरे यांचाडोंगरपट्टय़ात संपर्क दौरा झाला.

खर्च दाखल न करणाऱ्या उमेदवारांना नोटीस
जालना, ७ एप्रिल/वार्ताहर

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या दिनांकापासून निवडणूक खर्च दाखल केला नाही म्हणून नऊ उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयातून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात अप्पासाहेब राधाकिसन कुळेकर, किसन बळवंता बोर्डे, तुकाराम बाबुराव मिसाळ, खंडू हरिश्चंद्र लघने, परमेश्वर बंडेराव नरोडे, म. रफीक अ. सलाम पठाण, शेख तय्यब फकिरा पटेल, सय्यद मकसूद नूर, अशोक विठ्ठल सोनवणे यांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरल्यापासून प्रत्येक दिवसाचा खर्च निवडणूक खर्च नियंत्रण कक्षाकडे सादर करणे बंधनकारक आहे. असा खर्च सादर न करणे निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचे या उमेदवारांना दिलेल्या पत्रात निवडणूक खर्च प्रमुखांनी म्हटले आहे.

वीज पडून तिघांचा मृत्यू
बीड, ७ एप्रिल/वार्ताहर
वादळी वाऱ्यासह आलेल्या बिगरमोसमी पावसात जिल्ह्य़ात वीज पडून पाच जण मृत्युमुखी पडले. गेवराई तालुक्यात दोघांचा व केज तालुक्यात एकाचा मृत्यू झाला.
सासरा-सून यांचा मृत्यू
गेवराई/वार्ताहर - शेतात गहू काढत असताना वीज पडल्याने एका कुटुंबातील सासरा व सून मृत्युमुखी पडले. तालुक्यातील बंगाली पिंपळा येथे आज दुपारी ही दुर्घटना घडली. अंकुश बापुराव भुईभार (वय ५५) व त्यांची सून अंजना दत्तात्रय भुईभार (वय २८) गहू काढण्यासाठी शेतात गेले होते. दुपारी अचानक वीज कोसळल्याने दोघेही मृत्युमुखी पडले. धारूर/वार्ताहर - केज तालुक्या-तील आडस येथे वीज पडून बबन वैजनाथ अकुसकर (वय ३४) यांचा मृत्यू झाला. आंब्याच्या झाडाखाली ते उभे असताना वीज पडली.

भारिप बहुजन महासंघाचा मराठा आरक्षणाला विरोध
परभणी, ७ एप्रिल/वार्ताहर

सर्व राजकीय पक्ष मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाषा करीत असले तरी या आरक्षणाला भारिप-बहुजन महासंघाचा कायम विरोध राहील, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज ठणकावून सांगितले. शहरातील शनिवार बाजार मैदानावर आज सकाळी भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार गंगाधर भांड यांच्या प्रचारार्थ श्री. आंबेडकर यांची जाहीर सभा झाली. ते म्हणाले की, काँग्रेसने रा. सु. गवई व रामदास आठवले यांना अपमानास्पद वागणूक दिली. आंबेडकर चळवळ स्वाभिमानी चळवळ असून ती कोणीही विकत घेऊ शकत नाही. परभणीच्या धर्माच्या नावाखाली राजकारण करून सर्व जातीमध्ये एकमेकाबद्दल द्वेष निर्माण करण्याचे काम काँग्रेस आघाडीने केले आहे. आजपर्यंतच्या निवडणुका केवळ धर्माच्या नावावर झाल्या. प्रथमच सामाजिक प्रश्नावर ही निवडणूक लढविली जात आहे. ओ.बी.सी. समाजाला भारिप-बहुजन महासंघाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे श्री. आंबेडकर म्हणाले. आंबेडकर चळवळीचा काँग्रेसकडून झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी श्री. भांड यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष धम्मपाल सोनटक्के यांनी प्रास्ताविक केले. श्री. प्रकाश उजागरे यांनी आभार मानले.

प्रशिक्षणार्थी जवानाचा संशयास्पद मृत्यू
चाकूर, ७ एप्रिल/वार्ताहर
सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रातील एका जवानाचा तेथील तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. तो गेल्या दोन दिवसांपासून केंद्रातून बेपत्ता होऊनही अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली नव्हती. तलावातील पाण्यात आज सकाळी त्या जवानाचा मृतदेह आढळून आला. सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रातील जवान अनुपकुमार दिनेशकुमार (वय २१, उर्धन, जिल्हा सतना, मध्य प्रदेश) रविवारपासून बेपत्ता होता. तेथील तलावाच्या पाण्यात आज सकाळई एक मृतदेह तरंगत असताना एका जवानाला आढळले. त्याने पाहिल्यावर तो अनुपकुमार असल्याचे स्पष्ट झाले. सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्राचे वरिष्ठ अधिकारी एस. आर. खान यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या गावी पाठविण्यात आला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविला आहे. पोलीस उपनिरीक्षक गुरलिंग जमादार, पोलीस हवालदार शमशोद्दीन काझी तपास करीत आहेत.

मोह्य़ाच्या शेप यांना नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण
परळी वैजनाथ, ७ एप्रिल/वार्ताहर
गडचिरोली जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर केलेल्या हल्ल्यामध्ये तालुक्यातील मोहा येथील ज्ञानेश्वर शेप (वय २८) यांना वीरमरण आले. त्यांचा मृतदेह गडचिरोलीहून त्याच्या गावी रवाना करण्यात आला असून उद्या (बुधवारी) सकाळी त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. ज्ञानेश्वर शेप तीन वर्षांपूर्वी पोलीस दलात भरती झालेा. पोलीस खात्याच्या अटीप्रमाणे पाच वर्षे नक्षली भागात काम करणे बंधनकारक असल्याने ते सध्या गडचिरोली जिल्ह्य़ात नक्षलवादीविरोधी सी-६० या पथकात होते. धानोरा तालुक्यातील मंगनेर जंगलात काल सायंकाळी हे पथक नक्षलवादीविरोधी मोहीम राबवीत होते. याचदरम्यान दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पथकावर हल्ला केला. या वेळी झालेल्या गोळीबारात ज्ञानेश्वर यांच्यासह तीन पोलिसांना वीरमरण आले. ज्ञानेश्वर यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. शेप यांचा पार्थिव देह गडचिरोली पोलीस मुख्यालयातून त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आला असून मध्यरात्रीपर्यंत तो मोहा येथे पोहोचण्याची शक्यता आहे.

तुळजापूरच्या माजी नगराध्यक्षांना अटक
तुळजापूर, ७ एप्रिल/वार्ताहर
शिवीगाळ व मारहाण केल्याच्या आरोपावरून अटक केलेले माजी नगराध्यक्ष सुरेशप्पा पाटील व अन्य आठ जणांना पोलिसांनी आज अटक करून तुळजापूरच्या न्यायालयात हजर केले. न्यायदंडाधिकारी विश्वास मोहिते यांनी १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्याचे आदेश केल्यावर पाटील यांची जामिनावर सुटका झाली.

स्थापना दिवसानिमित्त भाजपची फेरी
परभणी, ७ एप्रिल/वार्ताहर

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी काल शहरात फेरी काढली सायंकाळी निघालेल्या या फेरीत कार्यकर्त्यांनी मोठय़ा प्रमाणावर सहभाग नोंदविला.
जिंतूर रस्त्यावरील गणपती चौकातून ही मोटरसायकल फेरी निघाली. या फेरीची सुरुवात शहराध्यक्ष दिलीप ठाकूर यांनी नारळ फोडून केली. ‘चप्पा-चप्पा भा. ज. पा.’, ‘दूर नही दिल्ली की गद्दी, राज करेंगे मुंडे-मोदी’ या घोषणा देत कार्यकर्त्यांनी शहराच्या मुख्य रस्त्यावरून ही फेरी काढली. शेवटी या फेरीचा समारोप झाल्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल मुदगलकर यांनी मार्गदर्शन केले. सरचिटणीस अभय चाटे यांचेही यावेळी भाषण झाले. कार्यक्रमाचे संचालन मोहन कुलकर्णी यांनी केले. नगरसेवक मोकिंद खिल्लारे यांच्यासह भा. ज. प.च्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या मीना परतानी, राजेश देशपांडे, विलास चांदवडकर, संजय रिझवाणी, दिनेश नरवाडकर आदींसह अनेक कार्यकर्ते या वेळी हजर होते.

पूर्णवादी बँकेला दोन कोटींचा नफा
बीड, ७ एप्रिल/वार्ताहर

पूर्णवादी नागरी सहकारी बँकेला चालू आर्थिक वर्षांअखेरीस दोन कोटी रुपयांचा नफा झाला असून दोनशे कोटी रुपये ठेवीची उद्दिष्टपूर्तीही झाली असल्याने बँक आर्थिकदृष्टय़ा सक्षम असून ग्राहक व ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरली आहे, असे बँकेचे अध्यक्ष डॉ. अरुण निरंतर यांनी सांगितले. ठेवीचे उद्दिष्ट गाठताना बँकेने वर्षभरात २०५.६१ कोटींच्या ठेवी जमवल्या. मार्च २००८ मध्ये कर्ज १२६.९७ कोटी होते. ते यंदा १३२.२३ कोटी झाले आहे. बँकेचा एनपीए कमी होऊन केवळ ६.५५ टक्केराहिला आहे. बँकेचे कर्मचारी व संचालक मंडळाने ग्राहक व ठेवीदारांचा विश्वास प्राप्त करून वर्षभरात बँकेला चांगल्या आर्थिक स्थितीत नेले आहे. अशाच पद्धतीने यापुढे बँक प्रयत्न करील, असे डॉ. निरंतर म्हणाले.

गायकवाड यांच्या प्रचारार्थ आज भाजपची बैठक
चाकूर, ७ एप्रिल/वार्ताहर
लातूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुनील गायकवाड यांच्या प्रचारार्थ पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष मनीषा चौधरी यांच्या उपस्थितीत उद्या (बुधवारी) दुपारी १२ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस वसुंधरा शिंदे, जिल्हाध्यक्ष स्नेहलता भिसे, जि.प. सदस्या विद्याताई नाईकवाडे उपस्थित राहतील. या बैठकीस तालुक्यातील महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष तथा जि.प. सदस्य निर्मला भालेकर यांनी केले आहे.

नातवाच्या पदयात्रेला अल्प प्रतिसाद!
उमरगा, ६ एप्रिल/वार्ताहर
उस्मानाबाद मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांचे नातू मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी उमरगा येथे काढलेल्या पदयात्रेस अल्प प्रतिसाद मिळाला. ग्रामदैवत महादेव मंदिरात दर्शन घेऊन पदयात्रेला सुरुवात केली. प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेली ही पदयात्रा डॉ. पाटील यांच्या प्रचारार्थ वातावरणनिर्मितीसाठी होती. पण या पदयात्रेस शहरातील कार्यकर्त्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला. मल्हार पाटील हात उंचावून सर्वाना नमस्कार करीत होते. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जाधव, नगरसेवक संजय पवार, विक्रम बिराजदार, किशोर कांबळे, अमोल पाटील, विशाल माने आदींसह जेमतेम बोटावर मोजण्याएवढे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बसखाली आल्याने प्रवासी गंभीर जखमी
सोनपेठ, ७ एप्रिल/वार्ताहर
बाजार आटोपल्यानंतर गावाकडे जाणारी बस पकडताना तोल जाऊन बसच्या चाकाखाली सापडून प्रवासी रावसाहेब चव्हाण गंभीर जखमी झाले. काल येथील आठवडे बाजार होता. बाजार आटोपून गंगाखेड येथून सोनपेठमार्गे गंगापिपरी येथे जाणारी ही बस पकडण्यासाठी रावसाहेब चव्हाण जात होते. तोल गेल्यामुळे बसच्या मागील चाकाखाली येऊन ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सोनपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करून प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना परळी येथे हलविण्यात आले. सोनपेठ पोलिसांनी बस ताब्यात घेतली.

परळी पालिकेतील कागदपत्रे जळाली
परळी वैजनाथ, ७ एप्रिल/वार्ताहर
नगरपालिकेतील एका खोलीला आज दुपारी अचानक आग लागून कागदपत्रे जळाली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नगरपालिकेच्या एका खोलीस अचानक आग लागली. आग लागताच अग्निशामक दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत कागदपत्रे जळाली असल्याचे निदर्शनास आले. नेमकी कोणती कागदपत्रे जळाली याची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. आग कशामुळे लागली हे समजले नाही.

निवडणूक खेडय़ापर्यंत पोहोचलीच नाही
तुळजापूर, ७ एप्रिल/वार्ताहर
लोकसभा निवडणुकीची धामधूम तालुका व तत्सम मोठय़ा गावात सुरू झाली असली तरी अनेक खेडय़ांत अजूनही निवडणुकीचा नावनिशाणा वा हालचाली सुरू नसल्याचे चित्र दिसते. अनेक गावे अजून या वातावरणापासून दूर असल्याचे दिसते. जळकोटवाडी, वडगाव (काटी), गंजेवाडी, बोळेगाव, मुर्टा, भातंब्री यासारख्या तुळजापूर तालुक्यातील अनेक छोटय़ा खेडय़ांतील ग्रामस्थांना या निवडणुकीबद्दल माहिती नाही. तसेच रस नाही, असेच चित्र दिसते.

काँग्रेस आघाडीच्या नाकर्तेपणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या - बागडे
औरंगाबाद, ७ एप्रिल/खास प्रतिनिधी

काँग्रेस आघाडीच्या नाकर्तेपणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. या नाकर्त्यां सरकारच्या उमेदवाराला निवडून देणार का, असा सवाल माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केला. लोकसभेच्या जालना मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ फुलंब्री तालुक्यातील जातवा येथे ते बोलत होते. गेल्या पाच दशकांत जनतेच्या भल्याचे कोणतेही निर्णय काँग्रेस करू शकली नाही. गरिबी हटावचा फसवा नारा दिला. कर्जमुक्तीच्या भूलथापा दिल्या. ग्रामीण भागात १२ ते १८ तास वीज नसल्यामुळे उभी पिके शेतात असूनही आणि विहिरीत पाणी असूनही वाळत आहेत. विद्यार्थ्यांना विजेअभावी परीक्षेच्या काळात अडचणी सहन कराव्या लागल्या. अशा काँग्रेस सरकारच्या राजवटीला उलथवून टाका असे आवाहन श्री. बागडे यांनी केले. नद्याजोड प्रकल्प केंद्र सरकारने बंद करून मोठी चूक केली आहे. एन.डी.ए.चे सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या हिताचा हा प्रकल्प राबविण्यात येईल, असेही श्री. बागडे यांनी सांगितले . या वेळी भा.ज.पा. किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष एकनाथ जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांचे भाषण झाले.

जालन्यात आजपासून आंबेडकर व्याख्यानमाला
जालना, ७ एप्रिल/वार्ताहर
शहरात उद्यापासून (बुधवार) दि. १३पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. व्याख्यानमालेचे हे ३२ वे वर्ष आहे.
उद्या (दि. ८) समाजकल्याण संचालक इ. झेड. खोब्रागडे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर प्रा. डॉ. जगन वंजारी यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली भारतीय सामाजिक व्यवस्था’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. ९ ला वसंत साळवे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मातर आणि त्याचे परिणाम’, १० ला चंद्रकांत वानखेडे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीविषयक विचार आणि शेतकऱ्यांची आजची दुरवस्था’, ११ ला प्रा. माझव सरकुंडे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समताभिमुख समाजपरिवर्तन’, १२ ला जयश्री शेळके यांचे ‘सावित्रीबाई फुले याचे जीवनकार्य’ तर १३ एप्रिलला मनोजराज गोसावी यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल. व्याख्यान दररोज सायं. ७ वा. स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. एन. डी. गायकवाड व्याख्यानमालेचे अध्यक्ष, डॉ. शांताराम रायपुरे सचिव आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा रविवारी द्वैवार्षिक मेळावा
औरंगाबाद, ७ एप्रिल/खास प्रतिनिधी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या जिल्हा मेळावा रविवारी (दि.१२) होणार आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजता महात्मा गांधी भवन येथे हा मेळावा राज्य कार्यवाह अविनाश पाटील आणि डॉ. ठकसेन गोराणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. आजची सामाजिक व राजकीय परिस्थिती, काम करताना येणारी आव्हाने याबाबत चर्चा होणार आहे.

डॉ. आंबेडकर व्याख्यानमालेला उद्यापासून सुरूवात
औरंगाबाद, ७ एप्रिल/प्रतिनिधी
बोधीसत्व प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला गुरुवारपासून (दि.९) सुरू होणार आहे. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. उमेश बगाडे हे ‘महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळ : स्वरूप आणि फलित’ या विषयावर गुंफणार आहेत. अध्यक्षस्थानी डॉ. गंगाधर पानतावणे हे असणार आहेत. मिलिंद विज्ञान महाविद्यालयाच्या रिक्रिएशन सभागृहात शुक्रवारी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक तत्त्वज्ञान’ या विषयावर विद्यापीठाचे डॉ. गणेशराज सोनाळे यांचे व्याख्यान होणार आहे. शनिवारी समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे यांचे ‘महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान होईल. या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपाध्यक्ष डॉ. पी. एच. गेडाम, सहसचिव अ‍ॅड. वसंत बोरकर, प्रा. एस. एस. वाल्दे, प्रमोद खोब्रागडे यांनी केले आहे.

आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
बोरी, ७ एप्रिल/वार्ताहर
येथील मराठवाडा दीक्षा भूमीतील श्रावस्ती नगरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.ए. जी. कनकुटे यांच्या हस्ते मंगळवारी (दि.१४) सकाळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुलाबराव चव्हाण राहणार आहेत. भदन्त सदानंद बोधी यांच्या त्रिशरण-पंचशील व वंदना पूजापाठानंतर मन्साराम तावर (परभणी), माणिकराव जव्हारण (आसेगाव) यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. संभाजीराव घोबले, गोविंदराव घोडे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी सहा वाजता डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक निघणार आहे. या कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या सोहळ्याचे सल्लागार, स्वागत समितीचे सदस्य व दीक्षाभूमी विकास प्रतिष्ठान यांनी केले आहे.

वर्तमानपत्र विक्रेता संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर
औरंगाबाद, ७ एप्रिल/प्रतिनिधी
वर्तमानपत्र विक्रेता संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी अण्णासाहेब जगताप, सचिवपदी नीलेश फाटके यांची निवड करण्यात आली. वर्तमानपत्र संघटनेचे अध्यक्ष साहेबराव कांबळे आणि राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हा सदस्य शेख बदरुद्दीन यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. ती अशी - गोपीनाथ माळी (उपाध्यक्ष), सय्यद मुकीम (कार्याध्यक्ष), गणेश पिंजरकर (सहकार्याध्यक्ष), आसाराम कुलकर्णी (सहकोषाध्यक्ष), शेख फईम (सहसचिव), अजीज भाई (प्रसिद्धीप्रमुख), ताराचंद तावळे, माणिक कदम, काकासाहेब मानकापे व सर्जेराव शिंदे (सल्लागार).

विकास जैन यांची पदयात्रा
औरंगाबाद, ७ एप्रिल/प्रतिनिधी
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे शहरप्रमुख विकास जैन, सभागृह नेता गजानन बारवाल यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी पदयात्रा काढणार आहेत.

बनावट पुस्तके विकणारे अटकेत
लातूर, ७ एप्रिल/वार्ताहर

विद्या भारती प्रकाशनच्या इयत्ता बारावी, वैद्यकीय प्रवेश परीक्षा पुस्तकाच्या बनावट प्रती अकोला येथील बाजारपेठेत निदर्शनास आल्या. त्यावरून प्रकाशनचे रवी जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोला येथील सिटी कोतवाली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. लातूर पॅटर्नची पुस्तके अकोला बाजारपेठेत विक्री होत असल्याचे येथील विद्याभारती प्रकाशनाचे रवि जोशी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. एस. सोळुंके यांनी अकोला येथील चिवचिव बाजार येथे छापा टाकला. येथील हरणे बुक स्टॉल, पाटील बुक डेपो, चेतन बुक डेपो या दुकानातून बनावट प्रतींची पुस्तके जप्त केली. महेंद्र सुधाकर हरणे (वय २७), वासुदेव सांगोले (वय ६०), कमलाकर भास्कर पाटील (वय ३८) या तिघा विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले बचतगटाच्या नफ्याचे वाटप
लातूर, ७ एप्रिल/वार्ताहर
गवळीनगर भागातील सावित्रीबाई फुले बचत गटाचा वार्षिक नफा वितरण कार्यक्रम नुकताच झाला. अध्यक्षस्थानी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक विनायक धेंडे होते. प्रमुख पाहुणे प्रा. संजय गवई, प्रा. दत्ता सुरवसे, जिल्हा बँकेचे निवृत्त व्यवस्थापक टी. एस. जाधव, संध्या पाटील, नीता मगर उपस्थित होते.प्रा. गवई म्हणाले, स्वयंसहायता बचत गट चळवळीत आपण गटाचा नफा वाटून घेत नाही तर ती रक्कम पुन्हा गटातच ठेवतो; त्यामुळे आपल्या गटाचे सामूहिक भांडवल वाढते. १५१ महिलांचा हा गट नसून ती एक लहान बँक आहे. या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात सुंदरबाई सोनकांबळे, सुनीता टेकाळे, मीना माने, वंदना कुलकर्णी, सुनीता कांबळे यांना नफा वाटप करण्यात आला. या वेळी टी. एस. जाधव, संध्या पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रभाकर सायगावकर यांनी केले तर आभार गटाच्या अध्यक्षा ज्योती जाधव यांनी मानले.

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत ‘केशवराज’चे यश
लातूर, ७ एप्रिल/वार्ताहर
महाराष्ट्र राज्य परीक्षा, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता आठवीमधून राष्ट्रीय स्तरावर केशवराज विद्यालयातील चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात केतन अविनाश देशमुख, स्नेहा राजकुमार मोरे, ऐश्वर्या आदिनाथ पोकळे, सुमिधा भागवत जोशी यांनी यश संपादन केले आहे. त्यांना संजय गुरव, श्याम अंदुरे, रवींद्र दिवाण, त्र्यंबक कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष अनिल महाजन, मुख्याध्यापक प्र. मा. जोशी, पर्यवेक्षक उमेश सेलूकर आदींनी अभिनंदन केले आहे.

सिल्लोडमध्ये महावीर जयंती उत्साहात
सिल्लोड, ७ एप्रिल/वार्ताहर

भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरात भव्य मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रमही पार पडले. सकाळी येथील जैन मंदिरात आमदार सांडू पाटील-लोखंडे यांनी येऊन दर्शन घेतले. ८ च्या सुमारास मिरवणुकीस प्रारंभ झाला. यात माजी आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद मंडलेचा, कार्याध्यक्ष रमेश कासलीवाल, सचिव अ‍ॅड्. विजय मंडलेचा, पोलीस निरीक्षक शालिग्राम पाटील आदींसह जैन समाजबांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. या मिरवणुकीत २४ वेगवेगळ्या गाडय़ांवर प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. शिस्तबद्ध मिरवणूक सर्वाचे लक्ष वेधून घेत होती. याप्रसंगी महिलांची संख्या मोठी होती. मिरवणुकीची सांगता टिळकनगरात जैन स्थानकात झाली. यावेळी विविध धार्मिक प्रवचने व गौतम प्रासादीचा लाभ भाविक व समाजबांधवांनी घेतला.

भोकरदन येथे महावीर जयंती साजरी
भोकरदन, ७ एप्रिल/वार्ताहर
‘जियो और जिने दो’च्या गजरात शहरातून मिरवणूक काढून भगवान महावीर जयंती साजरी करण्यात आली. शहरातील जैन मंदिरापासून आज सकाळी भगवान महावीरांच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. मंदिरासमोर नेमीचंद लव्हांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर मिरवणूक डॉ. आंबेडकर चौक, हेडगेवार चौक मार्गे लालगढीपासून जैन मंदिरापर्यंत नेण्यात आली. यावेळी सर्व जैन बांधवांनी आपापल्या प्रतिष्ठान व घरांसमोर मिरवणुकीचे स्वागत केले, तर नगराध्यक्ष राजा देशमुख, शिवसेना जिल्हा उपप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य मनीष श्रीवास्तव, उपनगराध्यक्ष शेख रिझवान आदींनीही स्वागत केले. मिरवणुकीत ढोल-ताशांसह जैन समाजातील सर्व स्त्री-पुरुष सहभागी झाले होते. भगवान महावीर की जय, आज के आनंद की जय आदी घोषणा देण्यात येत होत्या. याप्रसंगी इंद्र व इंद्राणीचा मान प्रेमजी व गुणाबाई लव्हांडे यांना देण्यात आला, तर कुंभकलशाचा मान माया लव्हांडे यांना मिळाला. अभिषेक नेमीचंद लव्हांडे यांनी केला.

भाजपच्या वर्धापनदिनी गायकवाड यांच्या प्रचारकार्यालयाचे उद्घाटन
चाकूर, ७ एप्रिल/वार्ताहर
भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनी लोकसभेच्या लातूर मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार डॉ. सुनील गायकवाड यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पक्षाचे प्रदेश प्रवक्तेगणेश हाके, जिल्हा परिषदेचे सदस्य त्र्यंबक गुटे, तालुकाध्यक्ष वसंत डिगोळे, पंचायत समितीचे माजी सभापती भाऊसाहेब माने, तालुका सरचिटणीस मेघराज बाहेती, धनंजय जोशी, गुणवंत जानकर, भीमाशंकर घोसे, नरसिंग पाटील, शहराध्यक्ष पिंटू धोंडगे, नरसिंग कांबळे, सुरेश हाके, बसवराज स्वामी, सिद्धाजी माने, दत्ता मुळे, लहू बोमदरे, विनायक धुमाळ, जिलानी शेख, संजय वाघमारे यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

लोह्य़ातील शतायुषी व्यापारी श्रीराम मोटरवार यांचे निधन
लोहा, ७ एप्रिल/वार्ताहर
जुन्या पिढीतील प्रतिष्ठित व्यापारी श्रीराम सावकार मोटरवार यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय १०४ वर्षे एवढे होते. त्यांच्या मागे सात मुले, सात मुली, सुना, नातवंडे, नातसुना, पतवंडे असा मोठा परिवार आहे. व्यापारी भागवत मोटरवार, प्रसिद्ध डिझाइनर विवेक मोटरवार, शिवाजी मोटरवार हे सावकार मोटरवार यांचे नातू होत. लोहा तालुक्यातील सर्वात वयोवृद्ध असलेल्या श्रीराम सावकार मोटरवार यांची मागील चार वर्षांपूर्वी शताब्दी साजरी झाली होती.

दिवसा ‘थंड’, तर रात्री ‘चिल्ड’ बैठका!
सोनपेठ, ७ एप्रिल/वार्ताहर
निवडणुका म्हणजे जोश आणि जल्लोष. गुपचूप येणारा ‘निधी’ मार्गी लावण्याची कला आता अनेकांना येऊ लागली आहे. उन्हाळ्याच्या तडाख्यात घाम गाळत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला ‘थंडावा’ तर आवश्यक. अन् त्यासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्ते घेऊन नियोजनाचे काम सुरू आहे. यासाठी ‘दिवसा थंड तर रात्री चिल्ड’ बैठका जोरात सुरू आहेत. कार्यकर्तेही आता पक्के राजकारणी झाल्यामुळे अनेक वेळा कार्यकर्ते थेट विरोधी बैठकांमध्ये दिसून येत आहेत. यामुळे प्रचार कार्यालयापेक्षा ‘इतर’ ठिकाणीच जास्त गर्दी झाल्याची दिसून येत आहे. दिवसभराच्या प्रचारकार्यामध्ये काही पट्टीच्या कार्यकर्त्यांचा इतर नियोजनासोबतच रात्री कुठे नियोजन बैठक घ्यायची याचेच नियोजन ठरविण्यावर भर असल्याचे दिसून येत आहे.

बीड मतदारसंघात चार अर्ज बाद
बीड, ७ एप्रिल/वार्ताहर
लोकसभेच्या बीड मतदारसंघातील उमेदवारी अर्जाची काल छाननी झाली. त्यात चार अर्ज बाद झाले व २८ अर्ज वैध ठरले. एकूण ३२ उमेदवारांनी ५६ अर्ज दाखल केले होते.
ज्ञानेश्वर लक्ष्मणराव कांबळे, मेघराज बाबुराव कोकाटे, रोहिदास तात्यासाहेब देशमुख व सोमनाथ मसाजीराव चादर यांचे अर्ज बाद ठरले. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत उद्या (बुधवारी) आहे.

दत्तक घेतलेला असूनही सोयगाव तालुका पोरका!
सोयगाव, ७ एप्रिल/वार्ताहर
विधानसभा तसेच, लोकसभा निवडणुकीच्या वेळी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तालुक्याच्या विकासाची आश्वासने दिली होती. काही नेत्यांनी तर तालुका दत्तकही घेत असल्याचे सांगितले.
निवडणुकीनंतरही हा तालुका विकासापासून दूर राहिला. तर दत्तक घेऊनही पोरकेपण वाटय़ाला आले. आता पुन्हा निवडणूक दारात असून, राजकीय नेते काय आश्वासन देतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

दोन अर्ज अवैध
जालना, ७ एप्रिल/वार्ताहर
जालना मतदारसंघात दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असून २७ उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. चुन्नीलाल मोहन जाधव व अजहरखाँ अकबरखाँ अर्ज अवैध ठरले आहेत.