Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

अमर सिंह यांची पक्ष सोडण्याची धमकी
जयाप्रदाच्या उमेदवारीवरून समाजवादी पक्षात राडा
नवी दिल्ली, ७ एप्रिल/खास प्रतिनिधी

 

सिनेतारका जया प्रदा यांना उत्तर प्रदेशच्या रामपूर मतदारसंघातून वतीने उमेदवारी देण्याच्या मुद्यावरून पक्षाचे ज्येष्ठ व प्रभावी मुस्लीम नेते आझम खान यांचा विरोध असह्य झाल्यामुळे समाजवादी पार्टीचे सर्वशक्तीमान सरचिटणीस अमर सिंह यांनी पक्ष सोडण्याची धमकी दिली आहे. मात्र, आझम खान यांच्या तुलनेत अमर सिंह यांची उपयुक्तता अधिक असल्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे.
पाच वर्षांंपूर्वी उत्तर प्रदेशात मुलायमसिंह यादव मुख्यमंत्री असताना त्यांच्या आग्रहावरून थेट आंध्र प्रदेशातून उत्तर प्रदेशात दाखल झालेल्या जया प्रदा यांना आझम खान यांनी लोकसभेवर निवडून आणले होते. पण त्यानंतर आझम खान आणि जया प्रदा यांच्यात कमालीचे वैमनस्य निर्माण झाले. अमर सिंह यांचे आझम खान यांच्याशी सुरु असलेले शीतयुद्धच त्यासाठी कारणीभूत ठरले. आझम खान यांचा अपमान करण्याची कोणतीही संधी अमर सिंह आणि जया प्रदा यांनी सोडलेली नाही. त्यामुळे आझम खान आणि अमर सिंह यांच्यातील संघर्ष आणखीच तीव्र होत गेला. आता अमर सिंह यांच्या पूर्ण प्रभावाखाली असलेल्या जया प्रदा यांना रामपूरमधून दुसऱ्यांदा निवडणूक लढू देण्यास आझम खान यांचा विरोध असल्यामुळे त्यांच्यातील संघर्ष चव्हाटय़ावर आला असून त्यात मुलायमसिंह यादव यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. आझम खान यांचा रामपूरच्या गरीब मुस्लीमांवर जबरदस्त पगडा असल्यामुळे त्यांना गमावणे मुलायमसिंह यांना राजकीयदृष्टय़ा महागात पडणार आहे. पण अमर सिंह यांना गमावणे मुलायमसिंह यांना अजिबातच परवडणार नसल्याचे मुलायमसिंहांच्या निकटस्थांचे म्हणणे आहे. अमर सिंह यांच्यामुळेच मुलायमसिंहांना मुख्यमंत्री होणे शक्य झाले आणि दिल्लीच्या वर्तुळात त्यांचा दबदबा वाढला. त्यामुळे आझम खान आणि अमर सिंह यांच्या संघर्षांत मुलायमसिंहांची इकडे आड, तिकडे विहीर झाली आहे.
समाजवादी पार्टीमध्ये बॉलीवूडची झगमगाटी जीवनशैली आणल्यामुळे बेनीप्रसाद वर्मा, के. सी. त्यागी, राज बब्बर, शाहीद सिद्दीकी, सलीम शेरवाणी यांच्यासारख्या समाजवादी व मुस्लीम नेत्यांना बाहेरचा रस्ता धरावा लागला. अमर सिंह यांच्या पंचतारांकित राजकारणाला पक्षात असलेले जनेश्वर मिश्रा, मोहन सिंह, रामगोपाल यादव, आझम खान यांचा तीव्र विरोध आहे. खुद्द मुलायमसिंह यादव यांचे पुत्र अखिलेशसिंह यादव आणि बंधू शिवपालसिंह यादव यांचेही अमर सिंह यांच्याशी मुळीच पटत नाही. पण दिल्लीतील राजकीय मजबुरी आणि अमर सिंहांचे कार्पोरेट घराण्यांशी असलेल्या संबंधांमुळे मुलायमसिंह यादव यांना त्यांच्या इशाऱ्यावरच नाचणे भाग पडत असल्याचे मुलायमसिंहांच्या निकटस्थांना वाटते. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत यादव-मुस्लीम समीकरण मोडीत निघाल्यानंतर मुलायमसिंह यादव यांचा भ्रमनिरास झाला असून आता ते मुस्लीम नेत्यांपासून फटकून वागू लागले आहेत. त्यामुळेच त्यांनी कल्याण सिंह यांच्याशी हातमिळवणी करून यादव-ओबीसी अशा नव्या समीकरणाद्वारे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे. कल्याण सिंहांना समाजवादी पार्टीत घेतल्याने आझम खान नाराज झाले असून त्यासाठी अमर सिंह यांना जबाबदार ठरवित आहेत. त्यामुळेच रामपूरमधून जया प्रदा यांच्या उमेदवारीला विरोध करून आझम खान यांनी अमर सिंह यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असून त्यामुळे समाजवादी पार्टीतील मतभेद विकोपाला पोहोचले आहेत.