Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

जगदीश टायटलर यांना क्लीन चिट दिल्याचा निषेध
पत्रकाराने चिदंबरम यांच्या दिशेने बूट भिरकावला
नवी दिल्ली, ७ एप्रिल/खास प्रतिनिधी

 

शीख विरोधी दंगलीत खासदार जगदीश टायटलर यांना सीबीआयने क्लीन चिट दिल्याच्या निषेधार्थ उत्तर भारतातील प्रतिष्ठित हिंदी वृत्तपत्र ‘दैनिक जागरण’चा पत्रकार जर्नेल सिंग याने आज एका पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या दिशेने जोडा भिरकावून खळबळ उडवून दिली. जर्नेल सिंगला खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लगेच ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले. जर्नेल सिंगला माफ केल्याचे जाहीर करून चिदंबरम व काँग्रेसने या घटनेवर पडदा टाकला, तर तुघलक रोड पोलीस ठाण्यात विचारपूस करून पोलिसांनी त्याला सोडून दिले.
भारतातील सर्वाधिक खपाचे दैनिक असलेल्या ‘जागरण’ व्यवस्थापनाला जर्नेल सिंगच्या या अनपेक्षित वर्तनामुळे जबरदस्त धक्का बसला असून त्यांनी या घटनेचा तात्काळ निषेध करून दिलगिरी व्यक्त केली आहे. खुद्द जर्नेल सिंगनेही आपण चिदंबरम वा सीबीआयचे विरोधक नसल्याचे स्पष्ट करून दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, आपली कृती चुकीची असली तरी भावना योग्यच असल्याचे म्हटले आहे.
सीबीआय गृह मंत्रालयाच्या इशाऱ्यावर काम करीत असून हा टायटलर यांना क्लीन चिट देण्याचा निर्णय गृह मंत्रालयाच्या दबावाखालीच घेण्यात आल्याचा आरोप जर्नेल सिंगने पत्रकार परिषदेत केला. त्यावर उत्तर देताना सीबीआय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येत नसल्याचे चिदंबरम यांनी स्पष्ट केले. सीबीआयवर कोणीही दबाव आणलेला नसून या प्रकरणी न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करणे इष्ट ठरेल, असेही ते म्हणाले. पण चिदंबरम यांच्या उत्तरावर जर्नेल सिंगचे समाधान झाले नाही आणि त्याने उजव्या पायाचा बूट चिदंबरम यांना लागणार नाही, अशा पद्धतीने भिरकावला. हा ड्रामा करण्यासाठी जर्नेल सिंग पूर्वतयारीनिशी आल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसचे वृत्तांकन करण्याची जबाबदारी नसताना जर्नेल सिंग आजच्या पत्रकार परिषदेला हजर होता. पत्रकारांची प्रचंड गर्दी झालेल्या सभागृहात त्याने पहिल्या रांगेत चिदंबरम यांच्या समोरची जागा पटकाविली होती आणि बूटाच्या लेस आधीच सैल करून ठेवल्या होत्या. पण चिदंबरम यांनी कोणतीही तक्रार न नोंदविल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी सोडून दिल्यामुळे हे प्रकरण आणखी तापण्यापूर्वीच थंड झाले आहे.