Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘हत्ती’ कुणाचे मनसुबे उधळणार?
आज शिवाजी पार्कवर मायावतींची सभा
मुंबई, ७ एप्रिल / प्रतिनिधी

 

आगामी लोकसभा निवडणुकांत परंपरागत समीकरणे उद्ध्वस्त करण्याची क्षमता राखणाऱ्या बहुजन समाज पक्षाची जाहीर प्रचार सभा उद्या शिवाजी पार्कवर दुपारी दोन वाजता होत असून बसपच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बहेन मायावती कोणता नारा देणार, या विषयी औत्सुक्य आहे. एकाही पदाधिकाऱ्याला देण्यात न आलेले तिकीट आणि शून्य टक्के बंडखोरी या पाश्र्वभूमीवर बसपचा ‘हत्ती’ या वेळी भल्याभल्यांचे अंदाज चुकवण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना मुंबईतील मायावतींची ही सभा विक्रमी करण्याचा चंग बसपच्या महाराष्ट्र शाखेने बांधला आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्यानंतर मायावती यांची शिवाजी पार्कवर २५ नोव्हेंबर २००४ रोजी सभा झाली होती. त्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. ‘चलो दिल्ली’ अशी घोषणा त्या सभेत देण्यात आली होती आणि मायावती यांना पंतप्रधान करण्याचा नारा तेव्हा घुमवण्यात आला होता. उद्याच्या सभेसाठी शिवाजी पार्कवर दोन व्यासपीठे बांधण्यात आली असून एका व्यासपीठावर बसपचे राज्यातील उमेदवार तर मुख्य व्यासपीठावर मायावती, प्रदेशाध्यक्ष विलास गरूड आणि प्रदेश निरीक्षक खा. वीरसिंग असणार आहेत. सभेत या तिघांचीच भाषणे होणार आहेत. मायावती बसपच्या उमेदवारांसाठी राज्यात प्रथमच प्रचार सभा घेत असून महाराष्ट्रासाठी त्या फक्त एकच दिवस देणार आहेत. पहिली सभा नागपूर येथे सकाळी ११ वाजता होणार असून मुंबईत दुसरी सभा दुपारी दोन वाजता होणार आहे. ही सभा मायावती यांच्या आधीच्या सभेचा विक्रम मोडण्याची शक्यता असून गेल्या रविवारी झालेल्या सेना-भाजपच्या सभेपेक्षा ही सभा अनेक पटीने मोठी असेल, असा दावा बसपच्या नेत्यांनी केला आहे.