Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

शाहरूख-आमिर यांच्यात पॅचअप?
मुंबई, ७ एप्रिल / प्रतिनिधी

 

खासगीत एकमेकांना कोपरखळ्या मारणारे आणि टीका करणारे शाहरूख आणि आमीर खान आज मात्र एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून बसले होते. एवढेच नव्हे तर एकमेकांशी चर्चाही करीत होते. त्यांच्या एकत्र येण्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये उत्सुकता राहिली नसती तर नवलच! हिंदी चित्रपटसृष्टीतील हे दोन प्रवाह एकत्र येण्याचे निमित्त होते हिंदी चित्रपट निर्माते व वितरकांनी मल्टिप्लेक्सविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनाचे. आज शाहरूख आणि आमीर खानने निर्माते-वितरकांची बाजू पत्रकारांसमोर मांडली. गेली सुमारे वीस वर्षे चित्रपटसृष्टीत राहूनही एकत्र चित्रपट न केलेल्या या दोन कलाकारांनी आज मात्र एकाच मुद्दय़ावरील आपली सारखी मते मांडून आपल्यात मतभेद नसल्याचे भासवले.
चित्रपट निर्माते-वितरक व मल्टिप्लेक्सचालक यांच्यात उत्पन्नविभागणीवरून झालेल्या वादानंतर हिंदूी चित्रपट निर्मात्यांनी मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट प्रदर्शित न करण्याचे ठरविले. त्यामुळे हा वाद मिटेपर्यंत एकही हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार नाही, असे आज त्या दोघांनी सांगितले. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आमीर आणि शाहरूखने मल्टिप्लेक्सचालकांविषयी तक्रारीचाच सूर काढला. आमीर म्हणाला की, जुन्या-जाणत्या निर्माते-वितरकांनी चित्रपट प्रदर्शनासाठी एक यंत्रणा आखून दिली होती. त्यावेळी निर्माते-वितरकांना ६५ ते ८० टक्के मिळत होते. अलीकडे मल्टिप्लेक्स सुरू झाल्यानंतर मल्टिप्लेक्स चालकांचा उत्पन्नातील वाटा वाढू लागला. ते रास्तही होते. निर्माते-वितरकांची फक्त एवढीच मागणी आहे की, हे उत्पन्न समसमान वाटून घ्यावे. कमी बजेटच्या अनेक चित्रपटांना तिसऱ्या-चौथ्या आठवडय़ात गर्दी व्हायला लागते. पण तिसऱ्या-चौथ्या आठवडय़ात त्यांना मिळणारा उत्पन्नाचा नफा अत्यंत कमी असतो. त्यामुळे लहान निर्मात्यांचे प्रचंड नुकसान होते. त्याचप्रमाणे काही मल्टिप्लेक्स चालक उत्पन्न कमाविण्यासाठी बेकायदेशीर मार्गाचाही अवलंब करतात. यासाठी दोन्ही बाजूंकडून एकेक समिती तयार करून टक्केवारी ठरविण्याऐवजी दोन्ही बाजूंची मिळून एक समिती तयार करून समस्या शोधून काढणे गरजेचे आहे. मल्टिप्लेक्सद्वारे आकारल्या जाणाऱ्या अव्वाच्या सव्वा तिकीटदरांबाबतही शाहरूख आणि आमीरने नाराजीचा सूर काढला. या वेळी व्यासपीठावर रमेश सिप्पी, रॉनी स्क्रूवाला, यश चोप्रा, मुकेश भट, ज्योती देशपांडे हेही उपस्थित होते. आमीर आणि शाहरूख मध्येच जवळ आले आणि आमीरच्या समोर असलेल्या कागदपत्रांमधील एका मुद्दय़ाबाबत शाहरूख आमीरला काहीतरी म्हणाला आणि तो क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकारांनी लगेचच कॅमेरे सरसावले होते. पत्रकारांच्या मनातील भाव ओळखत शाहरूख म्हणाला की, उद्या वर्तमानपत्रातील तुमच्या बातीमचा मथळा ‘आमीर-एसआरके की दुश्मनी खत्म’ असा असेल किंवा तुम्हाला जशी लिहायची तशी बातमी लिहा पण आमचे म्हणणे प्रेक्षकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे.