Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी पवारांचे हात बरबटलेले!
परभणी, ७ एप्रिल/वार्ताहर

 

‘ज्यांचे हात रक्ताने बरबटलेले आहेत त्यांच्या हाती सत्ता सोपविणार काय?’, असे म्हणणाऱ्या शरद पवार यांचेही हात महाराष्ट्रात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी बरबटलेले आहेत अशी थेट टीका करीत आज शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर थेट हल्ला चढविला.
स्टेडियम मैदानावर श्री. ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग, कृषीमंत्री शरद पवार, लालूप्रसाद यादव यांच्यावर टीका करीत देशात असलेले नाकर्त्यांचे सरकार हाकला असे आवाहन शिवसैनिकांना केले. निवडणुकीतली मराठवाडय़ातली ही पहिलीच सभा असल्याने श्री. ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष लागले होते.व्यासपीठावर उमेदवार गणेश दुधगावकर, खासदार जयसिंग गायकवाड, संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर, विनायक राऊत, जिल्हाप्रमुख डॉ. शिवाजी दळणर, राजू कापसे, जालना जिल्हाप्रमुख शिवाजी चोथे, हिंगोलीचे बालाजी देसाई, आमदार संजय जाधव, माजी आमदार विजय गव्हाणे, अनिल मुदगलकर, प्रताप बांगर, आमदार सुरेश जेथलिया, मधुसूदन केंद्रे, आमदार अर्जुन खोतकर आदी उपस्थित होते.
श्री. पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढविताना श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘सात-बारा कोरा करण्याची भाषा आम्ही करतो; तर पवार म्हणतात सात-बारा कोरा करून त्यावर उद्धव ठाकरे यांचे नाव लावायचे काय? जमिनी ढापायला मी काही पवार नाही, मी शिवसेनाप्रमुखांचा मुलगा आहे. ‘आम्हाला शेतीतलं काय कळतं’ असं पवार विचारतात. मग पवारांना तरी क्रिकेटमधलं काय कळतं? त्यांना तर निवडणुकीतही ‘आयपीएल’चीच चिंता लागलीय. कृषिमंत्री म्हणून तुमची कारकीर्द कशी आहे? पावणेदोन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे पुसलेल्या महिला भगिनींच्या कुंकवाने तुमचे हात बरबटलेले आहेत.’’
केंद्रातील यूपीए सरकारवरही ठाकरे यांनी तोफ डागली. जे सरकार वीज, पाणी, सुरक्षितता देऊ शकत नाही अशा नालायकांचे सरकार बोडक्यावर बसलेले आहे, असे ते म्हणाले. श्री. दुधगावकर यांच्यासह खासदार गायकवाड, श्री. गव्हाणे, श्री. बांगर, श्री. चोथे, जिल्हाप्रमुख डॉ. दळणर आदींची या वेळी भाषणे झाली.