Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘महाराष्ट्र दोन वर्षांत वीजकपातमुक्त बनवू’
भोकर, ७ एप्रिल/वार्ताहर

 

राज्यातील आघाडी सरकारने १६ तास वीजकपात करून शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन उद्ध्वस्त केले आहे. जनतेने सत्ता दिल्यास भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती दोन वर्षांत राज्याला वीजकपातमुक्त करील, अशी ग्वाही भा. ज. प.चे प्रदेशाध्यक्ष नितिन गडकरी यांनी आज दिली.
लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातील भा. ज. प.चे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ शहरातील मोंढा मैदानावर आज जाहीर सभा झाली. त्यात श्री. गडकरी बोलत होते. या वेळी संभाजी पवार, भा. ज. प.चे नांदेड जिल्हाध्यक्ष गंगाराम ठक्करवाड, शेतकरी संघटनेचे गुणवंत हंगरगेकर, देवीदास राठोड, शिवसेनेचे धनराज पवार, प्रदीप दौलतदार, सतीश देशमुख, राजू करपे आदी उपस्थित होते.
राज्य सरकारने ९ वर्षांच्या राजवटीत राज्याचे वाटोळे केल्याची टीका करून श्री. गडकरी म्हणाले, ‘‘दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी संस्थेत लाखोंचे घोटाळे केल्याने शेतकऱ्यांचे वाटोळे झाले. मराठवाडय़ातील वक्फ मंडळाच्या जमिनी काँग्रेस नेत्यांनी हडप केल्या असून युतीची सत्ता आल्यास त्या जमिनी परत घेऊन मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलती देऊ.’’
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्यासारखा निष्क्रिय गृहमंत्री आजपर्यंतच्या इतिहासात झाला नाही. आमचा मुस्लिमांना विरोध नसून अतिरेक्यांना विरोध आहे. परंतु काँग्रेसवाले युतीबद्दल मुस्लिमांच्या मनात गैरसमज निर्माण करत आहेत. केंद्रात व राज्यात भयमुक्त सरकार पाहिजे असल्यास युतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन श्री. गडकरी यांनी केले.
‘विषारी प्रचार करणाऱ्या जोड काँग्रेसचा नायनाट करा’
नांदेड/वार्ताहर - देशातील दहशतवाद्यांसोबतच विषारी राजकारण करणाऱ्या जोड काग्रेसचा नायनाट करण्यासाठी संभाजी पवार यांना विजयी करा व देशाच्या पंतप्रधानपदी लालकृष्ण अडवाणी यांना बसवा, असे आवाहन श्री. गडकरी यांनी नायगाव येथील सभेत केले.
श्री. गडकरी म्हणाले, भा. ज. प.ला जातीयवादी ठरविणाऱ्यांनी गुजरातच्या मुस्लिमांचे दरडोई उत्पन्न जास्त आहे, हे ध्यानात ठेवावे. ज्या काँग्रेसने डॉ. अब्दुल कलाम यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती करण्यासाठी विरोध केला .त्यांनी मुसलमानांमध्ये जातीयवादाचे विष पेरू नये.
या वेळी उमेदवा संभाजी पवार, रेखा गोळेगावकर, गंगाराम ठक्करवाड, राम पाटील-रातोळीकर, रवींद्र भिलवंडे, गंगाधर बडूरे, श्रावण भिलवंडे, सुमन डोईफोडे यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन विजय होपळे यांनी केले. व्यंकट चव्हाण यांनी आभार मानले. श्री. गडकरी यांच्या मुदखेड येथे झालेल्या सभेलाही चांगला प्रतिसाद मिळाला.