Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

शेतकरी हीच माझी जात - मुंडे
बीड, ७ एप्रिल/वार्ताहर

 

‘‘शेतकरी हाच माझा धर्म आणि जात आहे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीत, हे मला काशीयात्रेला पाठविणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. पराभव दिसू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पातळी सोडून ‘अरे तुरे’ची भाषा वापरू लागले आहेत. आपण २३ तारखेपर्यंत शांत राहून त्यानंतरच त्यांना उत्तरे देऊ,’’ अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व बीड मतदारसंघातील उमेदवार गोपीनाथ मुंडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा समाचार घेतला.
श्री. मुंडे यांचा दोन दिवसांचा प्रचारदौरा आज सुरू झाला. पहिल्या दिवशी बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्री व पिंपळनेर येथे झालेल्या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेतील टीकेचा आणि
आरोपांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘बीड जिल्हा आपली माउली आहे. त्यामुळे आज तीव्र उन्हातही ढगांच्या गर्दीमुळे सावली पडली आहे. निवडणूक सुरू होताच युतीला भरती आली असून दोन्ही काँग्रेसना ओहोटी लागली आहे.’’ अजित पवार यांच्या (मुंडेंना बांगडय़ा भरा) या वक्तव्याचा संदर्भ देत ते म्हणाले, ‘‘मी मर्द माणूस आहे. एक वेळ काँग्रेसची सत्ता उलथून लावली. मग बांगडय़ा कोणाला भरणार? मला बांगडय़ा भरा म्हणणाऱ्यांनी जिल्ह्य़ाचा अपमान केला आहे. निवडणुकीत मी सर्वाना साहेब म्हणतो. मग ‘अरे-तुरे’ची भाषा कशासाठी? शेतकरी हाच माझा धर्म आणि जात आहे. त्यामुळे कोणाच्याही चिथावणीला बळी न पडता जिल्ह्य़ातील स्वाभिमानी मतदार आपल्या मागे खंबीरपणे उभा आहे.’’
समुद्रात दगड, धोंडे टाकल्याने फरक पडत नाही. मात्र समुद्रात सुनामी आली तर भले भले वाहून जातात. पण २३ तारखेपर्यंत शांत राहून त्यानंतरच आपण सर्वाना उत्तरे देऊ, असेही श्री. मुंडे म्हणाले.
स्वत:ला ‘ह.भ.प.’ म्हणवून घेणारे संपर्कमंत्री बबनराव पाचपुते यांची शिवराळ भाषाही संतपरंपरेचा अपमान करणारी आहे, असेही ते म्हणाले.

काय करणार बारामतीचा काजी..
पिंपळनेर येथे श्री. मुंडे भाषणाला उभे राहताच जोरदार पाऊस सुरू झाला. श्रोते पावसातही बसून राहिले व मुंडे यांनीही पावसातच भिजत भाषण केले. ते म्हणाले, ‘‘मतदार आणि उमेदवार दोघेही परीक्षेत पास झाले आहेत. दोघे राजी असल्यामुळे बारामतीचा काजी काय करणार?’’