Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

एक गाडी बाकी अनाडी

 

*एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांला स्वत:स नेता म्हणून घ्यायची तीव्र इच्छा होती. जनता मात्र त्याला नेता म्हणत नव्हती. वैतागला बिचारा आणि गेला राजकीय गुरूकडे गेला. गुरुमंत्र मिळाला. ‘लोकसभा निवडणुका आल्यात. हात धुवून घे. उमेदवारास गाडी माग आणि गाडीत बसून मतदारांना हात करीत फिर. मतदार तुला नेता म्हणतात की नाही बघ.’ मंत्राप्रमाणे त्याने उमेदवाराकडे गाडी मागितली. उमेदवारानेही मागणी लगेच पूर्ण केली. कार्यकर्ता सकाळ, संध्याकाळ गाडीतून हात करीत नळदुर्गमधून फिरू लागला. मतदार बुचकाळ्यात पडले. गाडीला कोण्या पक्षाचा झेंडा नाही, फलक नाही, पोस्टर नाही. भानगड काय? ‘काही तरी असणारच,’ म्हणून एका मतदाराने गाडीचा पाठलाग केला. हा कार्यकर्ता शहराबाहेर शेतातील आंब्याच्या झाडाखाली गाडी लावून झोपला होता. हा प्रकार त्याने सर्वाना सांगितला. तेव्हापासून मतदार म्हणतात ‘एक गाडी, बाकी अनाडी’.
बंद काचांचीच गाडी हवी
*निवडणुकीत सभा आल्याच. सभेसाठी कार्यकर्ते व मतदारांना नेण्यासाठी गावपातळीवरील पुढाऱ्यांना वाहनाची सोय करावी लागते. पूर्वी कार्यकर्ते, मतदार मालमोटर, टेम्पो अशा कुठल्याही वाहनात बसून सभेला जायचे. परंतु या वेळेस नेत्यांच्या वागणुकीमुळे ट्रक, टेम्पो म्हटले की एकही कार्यकर्ता फिरकत नाहीत. कार्यकर्ते बंद काचाच्या गाडीचीच मागणी करीत आहेत. ‘जागरूक’ मतदारांच्या या मागणीमुळे पुढाऱ्यांची चांगलीच पंचाईत होत आहे.
शंभर घ्या अन् टेम्पोत बसा!
*ज्यांना सगळे ‘युवराज’ म्हणतात त्यांची नांदेडमध्ये सभा होणार होती. मतदारसंघातील शेवटच्या टोकाला मतदार आणण्यासाठी कार्यकर्त्यांना टार्गेट दिलेले. वाहन आले पण गावातून मतदार काही निघेनात. कार्यकर्ते हैराण झाले. त्यांनी बोटांनी काही मोजल्याच्या खुणा केल्या. ‘शंभर शंभर घ्या. शिवाय रस्त्यात जेवण, चहा, पाणी आमच्याकडं.पण टेम्पोत बसा,’ असे त्यांनी सांगताच गावातील काही वृद्ध, तरुण मंडळी टेम्पोत बसली. कार्यकर्ता खुश. हळूच त्यातला म्हणाला, ‘उद्या कमळवाले आले तर तिकडंही जावं लागतं बरं का साहेब!’
‘तम-तम मंदी’
*ही ती ‘मंदीबाई’ नाही बरं का. आपण मंदीबाईचा फेरा जिला म्हणतो ती ही नव्हे. ही मंदी रविवारी रात्री अवतरली आणि शुक्रवापर्यंत ठाण मांडून होती. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या जिल्ह्य़ातील वरिष्ठ मंडळींच्या डोक्यात नवा भुंगा सोडला. रात्री उमरगा, औसा, निलंगा, अणदूर, बार्शी भागात ‘मंदीबाई’ अवतरली. कानडी भाषेतील ‘तम तम’ मंदी म्हणजे ‘आपली-आपली माणसं’! काँग्रेसचे नेते बसवराज पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी असा सूर आळवला गेला. ते बंडखोरी करणार, अशी बातमी पसरली. त्यांच्या राजकारणाचा बाजही शिवराज पाटील चाकूरकरांसारखा म्हणजे तम तम मंदीचा. त्यामुळे हा संदेश रात्री चटकन फिरला. या ‘मंदीबाईचा फेरा’ राष्ट्रवादी काँग्रेसवर की शिवसेनेवर याची आकडेमोड दिवसभर सुरू होती. शुक्रवारी नेत्यांनी आता आपण सगळे एकच असल्याचा नारा दिला आणि मंदीबाईचा ‘फेरा’ शिवसेनेकडे सरकला.
‘साहेब, थोडा उशीर झाला’
*एका अपक्ष आमदाराने लोकसभेची दिशा ठरविण्यासाठी रविवारी कार्यकर्त्यांची बैठक बोलाविली. सकाळी एका लग्नासाठी ते बोरीत आले. विश्वासू कार्यकर्त्यांला त्यांनी विचारले, ‘‘वातावरण काय म्हणतंय?’’ तो म्हणाला, ‘‘साहेब, निर्णय घ्यायला थोडा उशीरच झाला.’’ ‘‘कसं काय?’’ त्यावर तो कार्यकर्ता म्हणाला, ‘‘साहेब बऱ्याच कार्यकर्त्यांनी गळ्यात भगवा रुमाल घातलाय!’’
कोल्हापुरी साज
*‘एक हौस पुरवा महाराज, मला आणा कोल्हापुरी साज’ हे गाणं आता लातूर मतदारसंघात वाजू लागलं आहे. ‘कोल्हापुरी साज औंदा पडेल सालामुळे जमणार नाय. पर तुझी विच्छा काँग्रेस पक्षानं पुरी केली हाय. कोल्हापूरचा उमेदवार लोकसभेसाठी दिला हाय. तोच ‘साज’ समजू,’ असे सांगत नवरा आपल्या बायकोची समजूत काढत आहे.
चिडचिड
*भूम-परंडय़ात ‘घडय़ाळाचे काटे’ कसे फिरणार यावरून सध्या बरीच चर्चा सुरू आहे. तेथे म्हणे परवा सभा झाली. नेत्यांना कार्यकर्ते भेटले. मनातलं बोलले. मनापासून सांगितलं. जिल्ह्य़ाच्या नेत्यांसमोर नवे विषय चर्चेला आले. मग नेत्यांची गोची झाली. स्थानिक आमदारांची चिडचिड झाली. आता घडय़ाळाला ‘चावी’ देण्याचं काम सुरू झालं आहे.
(लेखन : संदिपान तोंडे/धारूर, प्रदीप नणंदकर, लातूर, सुहास सरदेशमुख/उस्मानाबाद, हरिहर धुतमल/लोहा, नेताजी मुळे/नळदुर्ग आणि नेमीनाथ जैन/बोरी.)