Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

औरंगाबाद परिसरात मेघगर्जनेसह पाऊस
औरंगाबाद, ७ एप्रिल/प्रतिनिधी

 

शहराचे तापमान गेल्या काही दिवसांत ४० अंश सेल्सियसच्याही वर जाऊ लागले होते. गेल्या दोन दिवसांपासून मात्र तापमानात घट झाली आणि आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस झाला. पंधरा मिनिटे पाऊस पडला. विजांचा कडकडाट चालू असला असला तरी सुदैवाने कोठेही वीज कोसळल्याचे वृत्त नाही. आजच्या पावसामुळे वातावरणातील असह्य़ होणारा उकाडा काही अंशी कमी झाला आहे.
सकाळी वातावरण ढगाळ होते; तरीही पावसाच्या सरी कोसळतील असे वाटत नव्हते. साडेअकरानंतर अचानक वातावरणात बदल झाला. आभाळ भरून आले आणि सुमारे पंधरा मिनिटे टपोऱ्या थेंबासह सरी कोसळल्या. या पावसामुळे दुपारनंतर उन्हाचा कडाका कमी झाल्याचे जाणवले. आज कमाल तापमान ३६ अंश सेल्सियस नोंदविले गेले.
अवकाळी पावसाने आंब्याचे नुकसान
बीड/वार्ताहर - परिसरात आज सायंकाळच्या सुमारास जोराचा वारा आणि अवकाळी पाऊस आल्याने आंबा व इतर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्य़ात गेल्या चार दिवसांपासून उकाडय़ात प्रचंड वाढ झाली. तापमान ४२ अंशांवर गेले. दुपारी रस्ते, कार्यालये, बाजारपेठा पूर्णपणे निर्मनुष्य झाल्या. वीजकपातीने शहरी आणि ग्रामीण भागातील माणसालाही उकाडय़ाने भाजून काढले. आज सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. दुपारी उकाडा वाढला तसा वाराही जोराचा वाहू लागला. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जिल्ह्य़ातील अनेक भागात जोराचा पाऊस बरसला. या अवकाळी पावसाने आंबा, द्राक्ष या प्रमुख पिकांसह इतरही पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
पावसामुळे उदगीरकरांना दिलासा
उदगीर/वार्ताहर - वाढत्या उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या उदगीरकरांना पावसाच्या सरींनी थोडा दिलासा दिला. आज सायंकाळी ४ वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तब्बल अर्धात तास कमी-जास्त प्रमाणात पाऊस चालू होता. त्यानंतर पुन्हा सायं. ६.३० वाजता पावसाने १५ मिनिटांसाठी हजेरी लावली. तालुक्याच्या पश्चिम भागातील देवर्जन, गंगापूर भागातही पावसाने हजेरी लावली. तर नळगीर भागात पावसाने तोंडही दाखविले नाही. पावसापेक्षा विजांचा कडकडाटच जास्त होता. त्यामुळे वीजपुरवठाही बंद झाला.
लोह्य़ात पावसामुळे वातावरणात गारवा
लोहा/वार्ताहर - शहर व परिसरात आज सकाळी मेघ गर्जनेसह पाऊस पडला. पंधरा-वीस मिनिटे झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. सकाळी ढगाळ वातावरण होते. दहा वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला. दुपारनंतर पुन्हा उन्हाची तीव्रता वाढली.
परळीमध्ये पाऊस
परळी वैजनाथ/वार्ताहर - शहर व परिसरामध्ये आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी आल्या. त्यामुळे हवेतील उकाडा कमी झाली. काल सायंकाळपासून वातावरणात गारवा निर्माण झाला होता, तर रात्री पावसाच्या हलक्या सरी आल्या. आज सकाळपासून वातावरण ढगाळ होते, तर अधूनमधून मेघगर्जनाही चालू होती. दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही.