Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

लालू यादव यांनाही तुरुंगात टाकावे - उद्धव ठाकरे
नांदेड, ७ एप्रिल/वार्ताहर

 

निवडणूक आयोगाने ज्याप्रमाणे भाजप नेते वरुण गांधी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला तोच न्याय लावत रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनाही तात्काळ तुरुंगात टाकावे, अशी मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली.
परभणी व हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेसाठी उद्धव ठाकरे यांचे आज दुपारी खासगी विमानाने नांदेडमध्ये आगमन झाले. सायंकाळी हॉटेल चंद्रलोक येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
हिंदूंच्या समर्थनार्थ वरुण गांधी बोलल्यानंतर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्यावर आगपाखड केली. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर (वरुण गांधी) कारवाई केल्यानंतर हा विषय संपला होता. परंतु ‘मी गृहमंत्री असतो तर वरूण गांधीला चिरडले असते’ असे लालूप्रसाद यांनी केलेले वक्तव्य माणूसकीहीन आहे. लालूप्रसाद गृहमंत्री झाले तर न्यायालय बंद होणार आहेत काय, असा सवाल त्यांनी केला. वरुण गांधी यांच्यावर ज्याप्रमाणे कारवाई झाली त्याचप्रमाणे तात्काळ लालूप्रसाद यादव यांना तात्काळ तुरुंगात टाकावे, अशी आमची मागणी आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावर सर्वात जास्त निष्पाप माणसे मारली गेली. रेल्वे पोलीस मोठय़ा प्रमाणावर शहीद झाले. या हल्ल्यानंतर रेल्वे स्थानकाला राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री यांनी भेट दिली, परंतु निर्ढावलेल्या रेल्वेमंत्र्यांनी भेट देण्याचे सौजन्य दाखवले नाही.
आर. आर. पाटील यांनी प्रथम स्वत:चा वकूब पाहावा त्यानंतरच इतरांच्या वकुबाची काळजी करावी, असा टोला त्यांनी लगावला. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे स्पष्ट करून त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला फटकारले. लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान व्हावेत याबाबत कोणतेही मतभेद नाहीत, परंतु एनडीएचे सरकार आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांच्याबाबतीत विचारलेल्या सर्व प्रश्नांना ‘क्षुल्लक गोष्टी जावू द्या’ असे म्हणत त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले. काँग्रेसला ‘आम आदमी’ते कौतुक आता आले आहे, परंतु शेतकऱ्यांच्या तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नावर गेल्या दोन-तीन वर्षांपासून आम्ही संघर्ष करीत आहोत. राज्यातल्या शेतकऱ्यांनी एकजूट दाखवल्याने शासन हलले. परंतु केंद्र व राज्य सरकारची कर्जमाफी निव्वळ धूळफेक आहे. भाजप-शिवसेना युतीत कोणतेही मतभेद नाहीत. आमच्या काही ठिकाणी संयुक्त सभा होणार आहेत. शिवसेना रोखठोक असल्याने ‘राष्ट्रवादी’ किंवा अन्य कोणत्याही पक्षांशी आमची छुपी युती नाही, भाजपसोबत उघड युती आहे.
निवडणुकी दरम्यान आचारसंहिता आवश्यक आहे, पण लोकशाही मारून निवडणुका कशा होतील, असा सवाल त्यांनी केला. लालूप्रसाद यांच्यावर कारवाई करण्याबाबत निवडणूक आयोग न्यायाची भूमिका बजावेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. राज्यात आजपर्यंत कधी मिळाल्या नाहीत त्यापेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला. या वेळी शिवसेनेचे नेते विनायक राऊत, जिल्हाप्रमुख हेमंत पाटील उपस्थित होते.