Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पवारांना राज्यातून ताकद द्या - फौजिया खान
परभणी, ७ एप्रिल/वार्ताहर

 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस - आरपीआयच्या आघाडीला सर्वात जास्त जागा मिळणार असून यासाठी सर्वधर्मसमभाव असणाऱ्या पक्षाच्या उमेदवारांनाच मतदारांनी कौल द्यावा, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार फौजिया खान यांनी आवाहन केले.परभणी मतदारसंघातली राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांच्या प्रचारार्थ आमदार फौजिया खान पूर्णा येथे बोलत होत्या. काल पूर्णा तालुक्यात त्यांनी सलग ६ गावांत बैठका व सभा घेतल्या. एरंडेश्वर, कात्नेश्वर, पिंपळगाव, चुडावा आणि पूर्णा येथे त्यांनी सभा घेतल्या.
श्रीमती खान म्हणाल्या की, राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या विचाराशी समरस होऊन त्यांचे हात सर्वानी बळकट करावे. राज्याच्या हितासाठी मागील ५ वर्षांत सर्वात अधिक निर्णय आघाडी शासनाने घेतले आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिलांसाठी बचत गटांना ४ टक्के दराने कर्जपुरवठा, अतिरेकी कारवाया थांबविण्यासाठी झालेले प्रयत्न, देशाची आर्थिक स्थिती मंदीच्या काळातही समतोल ठेवणे, नवीन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी हे निर्णय सरकारने जनतेच्या हितासाठी घेतले. या निवडणुकीतही आघाडीलाच बहुमत मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्णा शहर कार्यालयात झालेल्या बैठकीला बापू घाटोळ, विश्वनाथ थोरे, रमाकांत कुलकर्णी, हाजी कुरेशी, अब्दुल मुजीब, कुंडलिक बोबडे, एन. डी. देशमुख, सुनील डुब्बेवार, सय्यद अली, जलील पटेल आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.