Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नांदेडमध्ये तिसरी आघाडी प्रीती शिंदे यांच्या पाठीशी
नांदेड, ७ एप्रिल/वार्ताहर

 

माजी खासदार केशवराव धोंडगे यांनी निवडणुकीपूर्वीच माघार घेतल्यानंतर, सक्षम उमेदवारच सापडू न शकलेल्या तिसऱ्या आघाडीने आपला पाठिंबा ‘जनसुराज्य’च्या प्रीती शिंदे यांच्या बाजूने वळवला आहे.
नांदेड मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याचा निर्धार आघाडीच्या साडेतीन कार्यकर्त्यांच्या पहिल्या बैठकीत करण्यात आला होता. त्यापाठोपाठ केशवराव धोंडगे यांचे नाव पुढे आल्यामुळे ते तिसऱ्या आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरतील अशी शक्यता होती. पण मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर धोंडगे यांनी अर्जच भरला नाही आणि अन्य कोणी उमेदवार आघाडीकडे गेला नाही.
निवडणुकीचा अर्धा प्रचार संपत आला असताना ‘जनसुराज्य’च्या प्रीती शिंदे व बसपाचे मकबूल सलीम यांनी तिसऱ्या आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत पाठिंब्याबाबत चर्चा केली. सोमवारी पार पडलेल्या बैठकीत या दोन्हीही नावांवर चर्चा झाली आणि शेवटी प्रीती शिंदे यांना पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. धर्मनिरपेक्ष जनता दल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनी ही भूमिका घेतली असताना, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विजय गाभणे यांनी आपला पाठिंबा अन्य एका उमेदवाराला दिल्याने आघाडीतील बिघाडीही समोर आली. दरम्यान, जनसुराज्यचे सर्वेसर्वा विनय कोरे ९ ते ११ एप्रिलदरम्यान नांदेडला तळ ठोकणार आहेत. त्यांच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळणार असल्याची हवा तयार करण्यात आली; पण त्या दृष्टीने कोणताही संदेश आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार भास्कररावांच्या प्रचारार्थ येत्या १० तारखेला नांदेड दौऱ्यावर येत असल्याचे सांगण्यात आले.