Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आचारसंहितेमुळे मिरवणुकांवर कडक निर्बंध
औरंगाबाद, ७ एप्रिल/प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ात वेगवेगळे सण, जयंती उत्सवाच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या मिरवणुका, धरणे, मोर्चे, निदर्शने आणि रास्ता रोको यासारख्या आंदोलनांवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध घातले आहेत.
निवडणूक असल्यामुळे विविध पक्षांची चिन्हे, फलक अशा कोणत्याही वस्तूंचे प्रदर्शन या काळातील मिरवणुकांमध्ये करता येणार नसल्याचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी डॉ. एन. आर. शेळके यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. अन्य व्यक्ती, समाजाच्या भावना दुखावतील असे भाष्य करणे तसेच वाद्य वाजविण्यासही या आदेशामुळे बंदी घालण्यात आली आहे.
संपूर्ण जिल्ह्य़ात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे, निदर्शने करणे, धरणे धरणे, मोर्चा तसेच मिरवणुका काढण्यासही मनाई करण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. गुरुवारी हनुमान जयंती, शनिवारी कन्नड तालुक्यातील औराळा येथील लक्ष्मी देवाची यात्रा, १० एप्रिलपासून शेंद्रा येथील मांगिरबाबाची यात्रा, १२ एप्रिलपासून पंधरा दिवस लासूर येथील दाक्षायिणी देवीचा सण आदी उत्सव या काळात साजरे होणार आहेत. या धार्मिक उत्सवामध्येही संबंधितांनी काळजी घ्यायची आहे.
दरम्यान जिल्ह्य़ात शस्त्र बाळगणे, इजा होईल अशी वस्तू सोबत ठेवणे, दाहक पदार्थ, दगड किंवा क्षेपणास्त्रे बाळगता येणार नाही, अन्य व्यक्तींच्या भावना भडकतील असे भाष्य करणे अथवा वाद्य वाजविण्यासही मनाई करण्यात आली आहे.