Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार आज ठरणार
औरंगाबाद, ७ एप्रिल/प्रतिनिधी

 

गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी युतीचा उमेदवार उद्या (बुधवार) ठरणार आहे. उद्या अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. सकाळी उमेदवार ठरेल आणि अर्ज सादर करण्यात येईल, असे भारतीय जनता पक्षाकडून सांगण्यात आले. शेवटच्या वर्षांसाठी सभापतिपद भा. ज. प.कडे देण्यात आले आहे.
ही निवडणूक गुरुवारी (दि. ९) सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. भा. ज. प.च्या वतीने या पदासाठी प्रथम भगवान घडामोडे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. मात्र दरम्यानच्या काळात युतीच्या सदस्यांनी बंडखोरी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर सीताराम सुरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. सुरे यांनी युतीची साथ सोडू नये, अशी त्यामागची अटकळ होती. मात्र त्यानंतर सुरेही गायब झाल्याने उद्या दुसऱ्या उमेदवाराची घोषणा करण्यात येणार आहे.१८ सदस्यांच्या या सभागृहात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीला स्पष्ट बहुमत आहे. तरीही दामोदर शिंदे हे गेल्या आठ दिवसांपासून युतीच्या संपर्कात नाहीत तर रविकांत गवळी आणि सीताराम सुरे या अनुक्रमे शिवसेना आणि भा. ज. प. समर्थक अपक्षांनीही युतीची साथ सोडली आहे.
अशा परिस्थितीत सभापतिपद युतीकडे पुन्हा मिळविणे युतीच्याच नेत्यांना अवघड वाटत आहे. उद्या सकाळी भा. ज. प.कडून उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात झाली असल्यामुळे युतीच्या नेत्यांनी या निवडणुकीला फारसे महत्व दिले नसल्याचे बोलले जात आहे.