Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

महावीर जयंतीच्या मिरवणुकीत लक्षवेधक देखावे
औरंगाबाद, ७ एप्रिल/प्रतिनिधी

 

भगवान महावीर जयंतीनिमित्त आज सकाळी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. वीज बचाव, दारू बंदी, गुटखा बंदी तसेच आरोग्याच्या विषयावरील देखाव्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या निमित्त शहरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महावीर चौकात सकाळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष आमदार राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. येथे चिकलठाणा, सिडको, हडको, राजाबाजार, शिवाजीनगर, छावणी, वाळूज, पंढरपूर येथील जैन समाजाचे नागरिक वाहन फेरीने येऊन सहभागी झाले होते. सकाळी पैठण गेट येथून मिरवणुकीस सुरुवात झाली. अग्रभागी रथांमध्ये २४ तीर्थकरांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या.
विविध देखावे, शिस्तबद्ध लेझीम आणि झांज पथके या मिरवणुकीचे आकर्षण होती. टिळकपथ, मछली खडक, सिटीचौक, शहागंज, पानदरीबा, गुलमंडी, औरंगपुरा मार्गे ही मिरवणूक सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या मैदानावर पोहोचली. येथे भगवान महावीर फौऊंडेशनच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
संपर्कमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महापौर विजया रहाटकर, आमदार राजेंद्र दर्डा, आमदार किशनचंद तनवाणी, माजी खासदार उत्तमसिंह पवार, माजी खासदार प्रदीप जैस्वाल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उपजिल्हाप्रमुख, नंदकुमार घोडेले, माजी महापौर डॉ. भागवत कराड, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अतुल सावे, काँग्रेसचे शहराध्यक्ष जी. एस. ए. अन्सारी, नगरसेवक वसंत नरवडे पाटील, सकल जैन समाजाचे उपाध्यक्ष विकास जैन, प्रशांत देसरडा, महावीर पाटणी, डी. बी. कासलीवाल, डॉ. प्रकाश झांबड, सुरेश ठोले आदी उपस्थित होते.