Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

चिकलठाण्यातील कारखान्यातून दीड लाखांची दारू पळविली
औरंगाबाद, ७ एप्रिल/प्रतिनिधी

 

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत असलेल्या युनायटेड स्पिरीट प्रायव्हेट लिमिटेड या प्रसिद्ध दारूच्या कारखान्यातूनच चोरटय़ांनी सुमारे दीड लाख रुपयांची दारू पळविली. चोरटय़ांनी अँटीक्वीटी आणि रॉयल चॅलेंज या महागडय़ा ब्रँडचे खोके पळविले. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सुरक्षा विभागाचे प्रदीप किसन राठोड हे सकाळी कारखान्यात गस्त घालत होते. बॉटलिंग विभागाजवळ ते आले असता खिडकी तोडून तीन ते चारजण त्यांना पळताना दिसले. त्यांच्या हातात खोके होते. त्यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र अंधाराचा फायदा घेऊन ते पसार झाले. त्यानंतर व्यवस्थापनाला माहिती देण्यात आली. सुमारे दीड लाखांची दारू चोरटय़ांनी पळविल्याचे राठोड यांनी चिकलठाणा औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
सोनसाखळी पळविली
शिवाजीनगरातील अंबिका ज्वेलर्समधून चोरटय़ांनी १४ हजार रुपये किमतीची सोनसाखळी लंपास केली. ग्राहकांना दाखविण्यासाठी ही साखळी काऊंटरवर ठेवण्यात आली होती. लक्ष दुसरीकडे जाताच काही क्षणातच साखळी बेपत्ता झाली. दुकानमालक वसंत रामचंद्र कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. अन्य एका घटनेत बाबा पेट्रोल पंपाजावळ उतरत असताना अज्ञात चोरटय़ाने प्रवाशाच्या खिशातून ५० हजार रुपये लंपास केले. काल दुपारी ही घडली. यशवंत भगवानराव सारनकर असे त्यांचे नाव असून ते बीड जिल्ह्य़ातील शेतकरी आहेत.