Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘आंबेडकरी चळवळीच्या मारेकऱ्यांना पराभूत करा’
औरंगाबाद, ७ एप्रिल/खास प्रतिनिधी

 

डॉ.आंबेडकर यांचे राजकीय तत्त्वज्ञान मारून, ऐक्याचा बळी देऊन जे रिपब्लिकन गट लोकसभेच्या निवडणुका लढवीत आहेत. अशा आंबेडकर चळवळीच्या मारेकऱ्यांना पराभूत करावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यंग ब्रिगेडने केले आहे.
रामदास आठवले यांचा गट काँग्रेसशी आघाडी करून निवडणूक लढवीत आहे. एका जागेसाठी आठवले यांनी समाजाच्या स्वाभिमानाचा बळी देऊन आंबेडकरी चळवळीचा अपमान केला. दुसरीकडे रामटेक मतदारसंघातून प्रा. जोगेंद्र कवाडे (उमेदवारी मागे घेतली ही बाब वेगळी), सुलेखा कुंभारे ही मामा-भाची जोडी उभी आहे. प्रा. कवाडे यांनी भा.ज.प.शी चुंबाचुंबी करण्याचा प्रयत्न केला तर सुलेखा कुंभारे मातोश्रीवर धडकल्या. कुठेच डाळ शिजेना म्हणून हे नेते मग स्वतंत्र बाण्याचा ढोंगी आव आणून निवडणुकीस उभे आहेत.
रा. सु. गवई यांचे चिरंजीव राजेंद्र गवईही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. टी. एम. कांबळे यांनीही काँग्रेसचे उंबरठे झिजविले. या पुढाऱ्यांना आंबेडकरी जनतेने निवडणुकीत आस्मान दाखवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. आंबेडकर अनुयायांनी आगामी लोकसभा निवडणुकीत या पुढाऱ्यांना पराभूत करून त्यांना जागा दाखवून द्यावी, असे आवाहन यंग ब्रिगेडचे संजय सातदिवे, आनंद दाभाडे, आनंद पगारे यांनी केले आहे