Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

लढतीचे चित्र आज स्पष्ट होणार
औरंगाबाद, ७ एप्रिल/प्रतिनिधी

 

लोकसभेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद मतदारसंघात बहुरंगी लढत होणार असा अंदाज असूनी खरे चित्र उद्या (बुधवारी) दुपारी तीन वाजता स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. कोणते उमेदवार अर्ज मागे घेतात याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.
शांतिगिरी महाराज यांनी कालच निवडणूक लढविण्याचा निर्धार जाहीर केला आहे. उद्या चित्र नक्की झाल्यानंतर उमेदवारांकडून दिशा नक्की होईल आणि प्रचाराच्या रणधुमाळीसही खऱ्या अर्थाने सुरुवात होईल.
निवडणूक जाहीर झाल्यापासून औरंगाबाद मतदारसंघात गेल्या गुरुवापर्यंत रंगत नव्हती. शिवेसेनेकडून अपेक्षेप्रमाणे चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर झाली. काँग्रेसचा उमेदवार मात्र ठरत नव्हता. अखेर बुधवारी उत्तमसिंह पवार यांना उमेवारी जाहीर झाली. त्यानंतरच काँग्रेसकडून प्रचाराची तयारी सुरू झाली.
वेरुळ मठाचे शांतिगिरी महाराज यांनीही उमेदवारी जाहीर केल्याने ही लढत होणार कशी यावर मतदारसंघात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. या तिघा उमेदवारांबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुभाष पाटील, बहुजन समाज पक्ष, भारिप-बहुजन महासंघ समाजवादी पक्षाचे उमेदवारही रिंगणात असल्याने ही लढत बहुरंगी होणार हे नक्की आहे. अर्जाच्या छाननीत ७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यामुळे आता ३१ उमेदवार शिल्लक आहेत.