Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

उमेदवारांची कुटुंबे रंगली प्रचारात!
सतीश टोणगे
कळंब, ७ एप्रिल

 

राजकीय सत्ता मिळविण्यासाठी सर्वच पक्ष, उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करीत आहेत. काहीही झाले तरी ही लोकसभेची निवडणूक जिंकायचीच या जिद्दीपोटी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांचे अख्खे कुटुंब रस्त्यावर उतरून, मतदारांना मतदान करण्याविषयी विनंती करीत आहेत. इतर वेळी घराबाहेर न पडणाऱ्या महिलाही आता ग्रामीण भागात, शेतात, वस्तीवर जाऊन उन्हाचे चटके सहन करीत प्रचारात सहभागी होत आहेत.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटीलव शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्यात काटय़ाची लढत होणार आहे. दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी आमदार राणा जगजीतसिंह पाटील, त्यांच्या पत्नी अर्चना पाटील, मुलगा मल्हार पाटील हे प्रचार यंत्रणा राबवीत आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत. आजोबांच्या प्रचारासाठी मल्हार पाटील स्टार प्रचारक म्हणून चर्चेत आहेत. त्यांनी भेटीवर भर दिला आहे. अर्चना पाटील यांचे ग्रामीण भागात चांगले संघटन असल्याने प्रत्येक गावात पदयात्रा काढून त्यांनी महिलांना प्रचारात सक्रिय करून घेतले आहे.
कळंब हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने ‘राष्ट्रवादी’ने या मतदारसंघाकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचा मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांंनीही प्रचारात हिरिरीने भाग घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रा. रवी गायकवाड यांनीही प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर दिला आहे. पत्राद्वारे संवाद साधत आहेत. त्यांच्या पत्नी उषाताई गायकवाड, मुलगा किरण गायकवाड यांनी प्रचार यंत्रणेची धुरा अंगावर घेतली आहे.
कळंब मतदारसंघ हा अनोळखी असतानाही उषा गायकवाड तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन पक्षाची ध्येय-धोरणे, विकासाची आश्वासने देऊन महिलांना आकर्षित करण्यात यशस्वी झाल्या आहेत. यापूर्वीच्या खासदारांनी कधीच भेट घेतली नाही व विकासही केला नसल्याच्या प्रश्नाला त्या समर्पक उत्तरे देत आहेत. या निवडणुकीत उमेदवारांपेक्षा त्यांच्या कुटुंबांकडेच स्टार प्रचारक म्हणून पाहिले जात आहे. ऐन उन्हाळ्यात चटके सहन करीत, दोन्ही उमेदवारांची कुटुंबे रस्त्यावर उतरल्याने ग्रामीण भागात चर्चा होत आहे.