Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कुंडलवाडीचे शासकीय विश्रामगृह खासगी गुत्तेदाराच्या ताब्यात
बिलोली, ७ एप्रिल/वार्ताहर

 

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शासकीय विश्रामगृहे व इतर शासकीय निवासस्थाने यांच्या वापरावर बंदी असतानाही कुंडलवाडी विश्रामगृहाच्या शासकीय जागेवर तालुक्यातील पुनर्वसित गावाच्या अंतर्गत रस्ते व नालीसाठीचे साहित्य तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. हा विकासनिधी विद्यमान आमदाराने आणल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे प्रचार केला जात आहे. तेव्हा शासकीय जागेवरील ही कामे त्वरित थांबवून संबंधित कंत्राटदाराची चौकशी करून त्याच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादीस काँग्रेससह विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
कुंडलवाडी येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात शिवसाई कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून विना परवाना गटार साहित्याची निर्मिती करण्यात येत आहे. या कामासाठी आवारातच एक विंधण विहीरही खोदण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही कामे सुर असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने बांधकाम विभागाकडे केली होती.
तसेच ही जागा ठेकेदारास कोणत्या नियमानुसार देण्यात आली, त्याच्या करारपत्रांची सत्यप्रती, भूजल सर्वेक्षण विभागाचा विंधण विहिरीबाबतचा अहवाल, गटार बांधकाम साहित्य तयार करण्याबाबतचा कार्यारंभ आदेश आदी माहिती त्यांनी माहिती अधिकाराखाली उपविभागीय अभियंता, बिलोली यांच्याकडे मागितली. परंतु या नियमबाह्य़ कामात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी ६० दिवसांनंतरही अद्यापि माहिती न दिल्याने अर्जदाराने त्यावर अपीलही केले आहे.
लोकसभा निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता जारी झाली आहे. त्यामुळे या कालावधीत शासकीय ठिकाणे खासगी ठेकेदारांना देता येत नाहीत. शिवाय बिलोली तालुक्यातील पुनर्वसित गावातील अंतर्गत रस्ते व नाली बांधकामासाठी विद्यमान आमदार भास्करराव पाटील-खतगावकरांनी ७१९ लाख ६२ हजारांचा निधी प्राप्त करून घेतला.
निवडणुकीच्या काळातही ही कामे सुरू आहेत. मात्र या कामासाठीच्या साहित्याची निर्मिती शासकीय जागेत करून, ही कामे आमदारांच्या प्रयत्नामुळे होत असल्याचा प्रचारही काही मंडळी करीत आहेत. तेव्हा शासकीय विश्रामगृहाच्या आवारातील चालू असलेली ही कामे त्वरित थांबवून या कंत्राटदारावर व संबंधित अधिकाऱ्यांवर आचारसंहितेच्या भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आहे. याबाबत आपण चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन तहसीलदार बी. डी. आत्राम यांनी दिले.