Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

भंगार मार्केट हलविण्याची नागरिकांची मागणी
लातूर, ७ एप्रिल/वार्ताहर

 

शहरातील डालडा फॅक्टरी परिसरातील ‘उस्ताद स्क्रॅप मार्केट’ येथील ध्वनी व वायूप्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे हा बाजार न हलविल्यास आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मागील अनेक वर्षांपासून डालडा फॅक्टरी परिसरात भंगार बाजार आहे. या बाजारातील ध्वनी-वायूप्रदूषणामुळे परिसरातील रहिवासी अतिशय त्रस्त झाले आहेत. शिवाय छोटे-छोटे लोखंडाचे तुकडे दाबून त्याचा मोठा गोळा तयार करण्याचा कारखानाही येथे आहे. तसेच रबरी टायरातील तारा काढून घेण्यासाठी पूर्ण टायरच जाळले जाते; त्यामुळे वायूप्रदूषण होते. या होत असलेल्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे येथील भंगार मार्केट एमआयडीसी भागात हलवावे.
लोखंडी पत्रा डांबरापासून वेगळा करण्यासाठी डांबराचे बॅरेल जाळून परिसरात दरुगधी पसरविली जात आहे. लोखंड तोडीचे काम सतत चालू असते. चोरीची वाहने तोडून, मोडून त्याचे भंगार केले जाते असे आरोप येथील नागरिकांनी या निवेदनात केले आहेत. हे भंगार मार्केट एमआयडीसी भागात नाही हलविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर कय्यूा शेख, राजू कय्यूम, गणेश मोरे, अल्ताफ शेख, प्रकाश पोटभरे, सादिक चौधरी, यासिन शेख, दत्ता सरवदे, चाँदपाशा बागवान, डॉ. एस. एस. पाटील, मिलिंद निल्ले, डॉ. विजय नलगे, सिद्धेश्वर जगताप, इसाक शेख, राज टोंपे, अबू कुरेशी, विश्वनाथ ढगे, एस. जी. अपसिंगे, जय ढगे, सतीश मुळे, सरस्वती गरड, कलावती ढावारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.