Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मराठी पंतप्रधान हा महाराष्ट्राचा सन्मान - आर. आर.
अंबड, ७ एप्रिल/वार्ताहर

 

‘‘केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या रूपाने मराठी माणूस देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होत असेल तर, हा संपूर्ण महाराष्ट्राचाच सन्मान आहे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी आज केले.
परभणी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांच्या प्रचारासाठी घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे आज श्री. पाटील यांची सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते.
संपर्कमंत्री राजेश टोपे, माजी खासदार अंकुशराव टोपे, माजी आमदार विलास खरात, विजयअण्णा बोराडे आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले की, देश आज अन्नधान्य, शिक्षण, विज्ञान यात प्रगती साधली आहे. विकासाचा दर आठ टक्क्य़ांपर्यंत वाढवला व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मनामर्यादा मिळवून दिली. भारतीय जनता पक्षाच्या भाजपा सरकारने देशाच्या एकसंघतेवर हल्ला करून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण केले.
वरुण गांधी यांच्या मागचा चेहरा हा अडवाणीच्या भा. ज. प.चा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे.
काँग्रेसच्या मदतीची व्याजासह परतफेड केली जाईल, असेही या वेळी श्री. पाटील म्हणाले. श्री. वरपूडकर यावेळी बोलताना म्हणाले की, घनसावंगी व परतूर हे जालना जिल्ह्य़ात असले तरी त्याच्या विकासाकडे आम्ही दुर्लक्ष करणार नाही.
या वेळी राजेश टोपे, सारंधर महाराज यांचीही भाषणे झाली.