Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

ग्रामीण भागात रस्ते, पाणी समस्या कायम!
लोहा, ७ एप्रिल/वार्ताहर

 

निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. ग्रामीण भागातील रस्ते व पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. निवडणुका आल्या की, या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले जाते. नंतर त्या समस्येकडे कोणीही पाहत नाही, अशा उघड तक्रारी मतदार करीत आहेत.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवरील प्रचाराचे मुद्दे उपस्थितीत केले जातात. जाहीरनामा काढून मतदारांना आकर्षित केले जाते, पण सामान्य मतदारांना याचे काही देणेघेणे नसते. जाहीरनामा तर गावपातळी मतदारापर्यंत येतच नाही. कोणते आणि कशाचे आश्वासन दिले या विषयी अनभिज्ञ असलेल्या मतदारांना गावात पिण्याचे शुद्ध व मुबलक पाणी आणि चांगले रस्ते पाहिजे असतात.
निवडणुकीत जात, धर्माच्या नावाखाली भावनिकतेला हात घालत उमेदवार मते घेतात. निवडून आल्यानंतर या उमेदवारांना सोयीस्कर विसर पडतो. प्रजासत्ताक सार्वभौम राष्ट्राच्या हीरक महोत्सवातही ग्रामीण भागातील अनेक गावांत जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. रात्रंदिवस पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या मतदारांसमोर पक्षाच्या जाहीरनाम्याचे काही मोल नाही. त्यांना गावात पावसाळ्यात जाता येईल असा पक्का रस्ता पाहिजे असतो. पाणी मुबलक हवे असते. शुद्ध पाणी आहे की नाही, हे तपासून न पाहता पिण्यायोग्य पाणी आहे हे समजून पाणी दिले जाते.
अनेक मोठ मोठी आश्वासने देणाऱ्या राजकीय पक्षांनी गावा-गावांत पक्के रस्ते, पिण्याचे पाणी आणि आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्या तरीही जनसेवा खूप केल्याचे भाग्य लाभणार आहे. पण केवळ आश्वासने दिली जातात, त्याची पूर्तता होत नाही म्हणून वर्षांनुवर्षे गाव, वाडी - तांडे भौतिक सोयींपासून वंचित आहेत.