Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

विकासाच्या मुद्दय़ावर मुंडेंना विजयी करा - शिवाजीराव पंडित
गेवराई, ७ एप्रिल/वार्ताहर

 

‘‘राष्ट्रवादी काँग्रेस लबाडांचा पक्ष असून तिथे मी इमाने-इतबारे काम केले. इमानदारांचे या पक्षात मोल होत नाही. राष्ट्रवादीवाले बोलतात एक आणि वागतात दुसरे. त्यामुळे जिल्ह्य़ातील जनतेने जाती-पातीच्या व नातेसंबंधाच्या राजकारणाला थारा न देता विकासाच्या मुद्दय़ावर गोपीनाथ मुंडे यांना विजयी करावे,’’ असे आवाहन माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी विविध गावांतील प्रचारदौऱ्यात केले.
बीडमधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ श्री. पंडित यांनी तालुक्यातील विविध गावांचा दौरा केला. ठिकठिकाणी त्यांनी २३ कोपरा बैठका घेतल्या. त्यांच्या समवेत बीडचे प्रा. सतीश पत्की, विश्वासराव मानसबदार, जय भवानी कारखान्याचे उपाध्यक्ष पाटीलबा मस्के, संचालक अप्पासाहेब औटी, विठ्ठलराव गोर्डे, भा. ज. प.चे तालुकाध्यक्ष शेख जमादार आदी उपस्थित होते.
श्री. पंडित म्हणाले की, जिल्ह्य़ाचा विकासासाठी मुंडे यांनी निवडून देणे गरजेचे आहे. त्यामुळे जागरूक मतदारांनी पाहुणे-रावळे, नातेसंबंध व जातीपातीच्या राजकारणाला अजिबात थारा देऊ नये. गेवराई हा सर्वात जास्त कापूस पिकविणारा तालुका आहे. या तालुक्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी कॉटन झोन न कापड गिरण्या सुरू करायच्या आहेत. हजारो लोकांच्या हातांना काम मिळण्यासाठी मुंडे यांना दिल्लीला पाठविणे गरजेचे आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास बीड रेल्वे व कापड गिरण्यांचाही प्रश्न मार्गी लागेल.