Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी पवारांना शक्ती द्या - आर. आर.
जालना, ७ एप्रिल/वार्ताहर

 

महाराष्ट्राच्या अस्मितेची जाणीव ठेवून मराठी माणसाची मान दिल्लीत ताठ ठेवण्यासाठी शरदचंद्र पवार यांना या निवडणुकीत शक्ती द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी आज केले.
परभणी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांच्या प्रचारासाठी तालुक्यातील विरेगाव येथे श्री. पाटील यांची आज सभा झाली.
ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने जातीपातीच्या राजकारणास थारा देऊ नये. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय झाला. लालकृष्ण अडवाणी आज काहीही आरोप करीत असले तरी ते केंद्रीय गृहमंत्री असताना संसदेवर हल्ला झाला होता, हे जनतेच्या लक्षात आहे. अफजल गुरूच्या फाशीबद्दल शिवसेनेची नेतेमंडळी बोलतात; परंतु याच अफजल गुरूचे वकीलपत्र घेणाऱ्याच्या मुलास शिवसेनेने उमेदवारी दिली, हे मात्र ते विसरतात!
या वेळी संपर्कमंत्री राजेश टोपे, आमदार अरविंद चव्हाण, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) मराठवाडा सरचिटणीस ब्रह्मानंद चव्हाण, उमेदवार वरपूडकर आदींची भाषणे झाली. काँग्रेस पक्षाचा एकही पदाधिकारी या वेळी उपस्थित नव्हता.
‘भूलथापांना बळी पडू नका’
परतूर/वार्ताहर - सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र करून सर्वधर्मसमभाव या नात्याने मागील पाच वर्षांत केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावण्याचे काम केले आहे. जातीयवादी शक्तींच्या भूलथापांना बळी न पडता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन श्री. पाटील यांनी मंठा येथे केले. या वेळी मंत्री राजेश टोपे, बाबासाहेब आकात, उमेदवार सुरेश वरपूडकर, धोंडीराम राठोड आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले की, आता डोळसपणे मतदान करण्याची वेळ आली आहे. कुणाला मत दिले तर देश समृद्ध होईल, याचा विचार करून मत दिले पाहिजे. भारताची वाटचाल सध्या महासत्तेच्या दिशेने सुरू आहे. जाती-धर्मात राजकारण करून सत्तेसाठी दंगली पेटविणाऱ्यांच्या भूलथापांना बळी न पडता वरपूडकर यांनाच निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. श्री. पाटील यांनी भा. ज. प.चे नेते लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली. बाजार समितीच्या मैदानावर आज सायंकाळी झालेल्या या सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.