Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

बालेकिल्ला अभेद्यच राहील

 

परभणी मतदारसंघातील जनतेने शिवसेनेवर कायम विश्वास टाकला आहे. या विश्वासाच्या जोरावरच शिवसेनेचा हा बालेकिल्ला याही निवडणुकीत अभेद्य राहील. या जिल्ह्य़ाला विकासाभिमुख चेहरा देण्यासाठी आणि जिल्ह्य़ात कृषिऔद्योगिक समाजरचना उभी करण्यासाठीच शिवसेना मैदानात उतरली आहे. निवडणुकीत गणेश दुधगावकर मोठय़ा मताधिक्क्य़ाने विजयी होतील.
शिवसेनेकडे निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी आहे. स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची अभेद्य वज्रमूठ या जोरावर शिवसेनेचा बालेकिल्ला कायम राहील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत आमचा उमेदवार हा विकासाभिमुख दृष्टीचा आहे. दुधगावकरांनी ‘ज्ञानोपासक’सारखी शिक्षणसंस्था उभारून जिल्ह्य़ात चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण केले आहे. या संस्थेची उभारणी आणि तिचा विस्तार पाहू जाता हे कार्य महत्त्वाचे आहे. जिल्ह्य़ाच्या विकासासाठी विधायक कामे करण्याचा संकल्प आणि विकासाचा आराखडा आमच्याकडे आहे.
‘पॅफ्को’ हा खताचा कारखाना आमचे उमेदवार चालवू शकले नाहीत असा आरोप आमच्यावर होत असला तरीही त्यात तथ्य नाही. ‘पॅफ्को’ होऊ नये म्हणून सुरेश वरपूडकर यांनीच खोडा घातला होता. वरपूडकर त्या वेळी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. बँकेने त्या वेळी मदतीची भूमिका घेतली असती तर विकासप्रक्रियेत हा कारखाना जिल्ह्य़ासाठी एक वरदान ठरला असता. दुर्दैवाने तसे घडले नाही. जिल्ह्य़ात एकही सहकारी प्रकल्प नीट चालवायचा नाही आणि कुणी चांगले काही करत असेल तर त्यात अडथळे कसे आणता येतील हेच वरपूडकर यांनी आजवर केले. गेली वीस-पंचवीस वर्षे वरपूडकर जिल्ह्य़ाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांनी या काळात नेमके काय केले याचा लेखाजोखा त्यांनी मतदारांना द्यावा. आपल्या कारकीर्दीत जिल्ह्य़ात कोणते प्रश्न सोडविले याचे आत्मपरीक्षणही त्यांनी करावे.
देशपातळीवर धोरणे ठरविताना खासदारांच्या भूमिकेला महत्त्व असते. शिवसेनेच्या आजवरच्या खासदारांनी त्यांच्या-त्यांच्या परीने कामे केलेली आहेत. स्वार्थापायी पक्षाशी द्रोह करणारे कुठेही गेले तरीही जिल्ह्य़ातील जनता मात्र निष्ठेने शिवसेनेची साथ सोबत करीत आहे. या भगव्या शक्तीच्या जोरावरच आमचा विजय अंतिम आहे. जिल्ह्य़ातल्या प्रस्थापित राजकारण्यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून निवडणुकांमध्ये चुकीचे पायंडे रचले आहेत. शिवसैनिक मात्र आपल्या इमानापासून आजवर कधीही ढळला नाही. त्यामुळे या निवडणुकीतही या शिवसैनिकांचीच भूमिका निर्णायक राहणार आहे. लोकसभेच्या विजयाची परंपरा यापुढेही चालू राहील.