Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

विकासाच्या धोरणांमुळे समर्थनाची सुप्त लाट

 

काँग्रेसचे सर्व गट-तट कामाला लागले आहेत. काँग्रेस पक्षाचे सहकार्य, खासदार तुकाराम रेंगे यांचा पाठिंबा आणि केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्यांच्या हिताची घेतलेली धोरणे यामुळे परभणी मतदारसंघात विजय आमचाच होईल. केंद्रातल्या आघाडी सरकारने ग्रामीण भागाच्या विकासाला चालना दिली. भारत निर्माण, जलस्वराज्य या सारख्या प्रकल्पांमुळे ग्रामीण भागाचे जनजीवन सुधारले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे कमी झाले. अल्प दरात शेतकऱ्यांना कर्ज मिळू लागले. गेल्या कित्येक वर्षांत शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगले भाव मिळाले आहेत. या धोरणांमुळे सरकारच्या बाजूनेच एक सुप्त अशी लाट ग्रामीण भागात दिसते.
या वेळी शिवसेनेच्या उमेदवाराचे आमच्यासमोर फारसे आव्हान नाही. एवढा दुबळा उमेदवार शिवसेनेने का दिला हे कळायला मार्ग नाही. या वेळी निष्ठावंतांना डावलल्याने त्यांच्यातही अंतर्गत नाराजी मोठी आहे. शिवसेनेच्या उमेदवाराचा ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा संपर्क गेल्या वीस वर्षांत तुटला आहे. त्यामुळे ही उमेदवारी आमच्यासाठी आव्हानात्मक नाही.
खासदार तुकाराम रेंगे यांनी आम्हाला उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या पाठीमागे शिवसेनेतली कार्यकर्त्यांची फार मोठी फळी आहे. त्यांनी उघडपणे आमच्या बाजूने भूमिका घेतली ही आमच्यासाठी मोठीच गोष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांचा तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी दांडगा संपर्क आहे. गावपातळीवरील कार्यकर्त्यांशी त्यांचे थेट नाते आहे. एका बाजूने कार्यकर्त्यांचे प्रचंड जाळे असलेला उमेदवार आणि दुसऱ्या बाजूने अन्य पक्षातून फुटून आलेला आणि कार्यकर्त्यांशी नाळ नसलेला उमेदवार अशी ही लढत आहे. आमच्या बाजूने सगळ्या जमेच्याच गोष्टी आहेत.
गेल्या पाच वर्षांत परभणी जिल्ह्य़ातही मोठय़ा प्रमाणावर झालेली विकासाची कामे, शेतीला समृद्धी आणण्यासाठी गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले बंधारे, खेडय़ापाडय़ात झालेली रस्त्याची कामे या आमच्या दृष्टीने जमेच्या बाजू आहेत. लोक विकासाच्या बाजूने कौल देतील.