Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

केंद्रातच नव्हे तर राज्यातही भगवा फडकेल

 

‘ज्यांचे हात रक्ताने माखले आहेत, त्यांच्या हाती सत्ता सोपविणार का?’ हा शरद पवार यांचा कांगावा म्हणजे मतदारांचीच घोर फसवणूक आहे. सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाचे प्रश्न पवारांना महत्त्वाचे वाटत नाहीत. नरेंद्र मोदी यांच्याविषयी द्वेषमूलक प्रचार करून त्यांना निव्वळ मतांचे राजकारण करायचे आहे. मोदी यांनी गुजरातचा चेहरामोहरा बदलला. उद्योगाला चालना दिली याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. मतदारांना मात्र हे राजकारण आता कळू लागले आहे. त्यामुळे केवळ केंद्रातच नव्हे तर राज्यातही येणाऱ्या काळात भगवा फडकेल.
‘लोकसभेची निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्दय़ावर लढवत आहोत,’ असे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सांगत असले तरीही ते विकासाबद्दल मात्र काहीच बोलत नाहीत. जे काही आघाडी सरकारने केले त्याचा मोठा डांगोरा पिटला जात असला तरीही वस्तुस्थिती वेगळी आहे. कर्जमाफीची योजना अतिशय फसवी आहे. एकीकडे खतांचे अनुदान कमी करायचे आणि दुसरीकडे कर्ज माफ करायचे. या कर्जमाफीने फक्त राष्ट्रवादीवाल्यांच्या बँकांचे भले झाले आहे.
स्थानिक पातळीवर शिवसेना-भारतीय जनता पक्षात समन्वय असून भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या उमेदवारासाठी जिवाचे रान करीत आहे. जिल्ह्य़ात पंचायत समितीचे जे १०४ गण आहेत त्या प्रत्येक गणाचा कार्यकर्ता या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे विकासाची दृष्टी आहे. मोदी यांनी जे प्रचंड काम केले त्याला काँग्रेसवाल्यांकडे कोणतेच उत्तर नाही; त्यामुळे ते मोदी यांचे प्रतिमा हनन करून प्रचाराची पातळी खाली आणू लागले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांनाच आजवर सर्वाधिक काळ नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी आपल्या काळात काय केले, याचा त्यांनी मतदारांना जाब द्यावा. या जिल्ह्य़ात सहकार क्षेत्र तर मोडीत निघाले पण आता हे क्षेत्र खासगी कारखानदार ताब्यात घेत आहेत. याचीही कारणे त्यांनी जनतेला सांगावीत.
शिवसेनेचे उमेदवार गणेशराव ुधगावकर यांना अधिकाधिक मताधिक्य मिळावे यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रचार कार्यात उतरले असून हिंदुत्वाची अस्मिता जोपासणारे सरकारच येणाऱ्या काळात दिल्लीवर राज्य करील.