Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना हवे ते प्रश्न विचारा. फक्त प्रश्न व्यक्तिगत, आरोप करणारे नसावेत, एवढे नक्की. प्रश्न कोणाला विचारायचा आहे, याचा उल्लेख करून नेमक्या शब्दांत प्रश्न विचारा. आपले प्रश्न ‘लोकसत्ता’च्या औरंगाबाद कार्यालयात पाठवा. प्रश्नकर्त्यांचे संपूर्ण नाव व पत्ता अवश्य द्यावा. lokmtv@gmail.com या पत्त्यावरही प्रश्नांचे ‘इ-मेल’ पाठवता येईल.
लातूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार जयवंत आवळे यांना.
*लोहा-कंधार तालुक्यांमध्ये रोजगार निर्मितीसाठी कोणती उपाययोजना करणार?
रत्नाकर महाबळे, लोहा.

 


उस्मानाबाद मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना.
*महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे होत आहेत. आपण निवडून आल्यानंतर त्या थांबविण्यासाठी काय प्रयत्न करणार?
मोहन जाधव, उमरगा.
उस्मानाबाद मतदारसंघातील सर्व उमेदवारांना.
*कारखाने व औद्योगिक उद्देशपूर्तीसाठी जमिनी संपादित करू नयेत अशी मागणी करून कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालक आंदोलन करीत आहेत. या उलट उस्मानाबाद जिल्ह्य़ात सरकारची हजारो एकर जमीन पडून आहे. पण दळणवळण, वीज व पाण्याची उणीव यासारख्या कारणामुळे सरकार औद्योगिक विकासाकडे लक्ष देत नाही; त्यामुळे हजारो पदवीधर बेरोजगार आहे. बेरोजगार तरुण व औद्योगिक प्रगतीसाठी आपण काय करणार?
विजय कोडकर, तामलवाडी.
जालना मतदासंघातील सर्व उमेदवारांना.
*जालना शहरासमोर गेली अनेक वर्षे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र स्वरूपात आहे. आठ-आठ आणि कधी तर पंधरा दिवस नळाला पाणी येत नाही. शहरासमोरील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे. त्यासाठी जायकवाडी ते जालना अशी थेट जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव अनुदानासाठी केंद्र सरकारकडे पडून आहे. केंद्र सरकारचे हे अनुदान प्रत्यक्षात मिळून ही योजना पूर्ण व्हावी आणि जालन्याचा पाणीप्रश्न सुटावा यासाठी आपण काय प्रयत्न करणार?
अंकुश के. गायकवाड भाटेपुरीकर, जालना.
लातूर व नांदेड मतदारसंघांतील भारतीय जनता पक्ष व काँग्रेस यांच्या उमेदवारांना.
*महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे भाषणात सांगितले जाते. त्या विधेयकासाठी आपली भूमिका काय आहे?
प्रा. डॉ. वसंत बिरादार, लोहा.
औरंगाबाद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार उत्तमसिंह पवार यांना.
*औरंगाबाद आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ आहे. गेल्या दहा वर्षांत याच्या विकासासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काहीही केले नाही. तुमच्याकडे काय योजना आहेत?
सतीश औरंगाबादकर, उल्कानगरी, औरंगाबाद.
हिंगोली जिल्ह्य़ातील सर्व खासदारांना
*सेनगाव तालुक्यातील पाणी प्रश्न व या भागातील बेरोजगारीचा प्रश्न तुम्ही कधी सोडविणार ?
शेख मोहसीन करीम, हिंगोली.