Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
प्रादेशिक

बॉम्बस्फोट आरोपींच्या मुदतपूर्व सुटकेविषयी निर्णय घेण्याचा आदेश
मुंबई, ७ एप्रिल/प्रतिनिधी

मार्च १९९३ मधील मुंबईतील बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यातील जन्मठेप झालेल्या चार आरोपींची किती वर्षे तुरुंगवास भोगून झाल्यानंतर सुटका करायची याचा निर्णय राज्य सरकारने येत्या दोन महिन्यांत घ्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. जन्मठेप भोगत असलेल्या कैद्यांना खरोखरीच आजन्म तुरुंगात न ठेवता त्यांनी केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन त्यांची १४ ते ३० वर्षांचा कारावास भोगल्यानंतर सुटका करण्यासंबंधीचे नियम राज्य सरकारने केले आहेत.

तोंडी संमती घेऊन केलेल्या तीन पोलिसांच्या बदल्या रद्द
मुंबई, ७ एप्रिल/प्रतिनिधी

कोकण परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून तोंडी संमती घेऊन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी दीड वर्षांपूर्वी काशीमिरा पोलीस ठाण्यातील तीन पोलिसांच्या अन्यत्र केलेल्या बदल्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाने (मॅट) बेकायदा ठरवून रद्द केल्या आहेत.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
मुंबई, १२ एप्रिल / प्रतिनिधी

तब्बल १२ वर्षांंनंतर होणाऱ्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निवडणुकीसाठी डॉक्टरांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून या निवडणुकीत राज्यातील काही डॉक्टरांनी डॉ. आंबेडकर मेडिकोज् कम्यूनची स्थापना करून स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रस्थ डॉक्टरांच्या ताब्यात कौन्सिलची मक्तेदारी जाऊ नये यासाठी हे पॅनेल उभे केल्याचेही मुख्य निमंत्रक डॉ. तुषार जगताप यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितले.

अंधेरी आरटीओमध्ये स्मार्ट कार्ड चालक परवाना घोटाळा उघडकीस
* सहा परवानाधारकांविरुद्ध गुन्हा
* ‘स्मार्ट’ मास्टरमाइंड अद्याप अज्ञात

कैलास कोरडे
मुंबई, ७ एप्रिल

हजारो बोगस चालक परवाने व रिक्षा-टॅक्सी बॅचेस बनविणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी नुकतीच अटक केली असताना, अंधेरी आरटीओत एक मोठा स्मार्ट कार्ड चालक परवाना घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्यामध्ये आरटीओमध्ये कोणतीही नोंद नसताना अनेकांना स्मार्ट कार्ड चालक परवाने देण्यात आले आहेत. गेल्या आठवडय़ाभरापासून या घोटाळ्याची व्याप्ती आणि सूत्रधार शोधण्याचे काम सुरू आहे. मात्र अद्यापही त्यामध्ये यश आलेले नाही.

पाकिटमारी : कार्यकर्त्यांचा ‘साइड बिझिनेस’!
मुंबई, ७ एप्रिल / प्रतिनिधी

कडक इस्त्री केलेला खादीचा पांढरा शर्ट किंवा झब्बा घालून राजकीय पक्षांच्या रॅलीमध्ये तसेच सभांमध्ये सामील व्हायचे, इतर कार्यकर्त्यांमध्ये मिसळून त्यांच्यासोबत उमेदवाराच्या नावाचा जयघोष करायचा आणि तोच मोका साधत हातचलाखी करून पाकीट मारून तेथून पोबारा करणाऱ्या सात जणांच्या टोळीला पोलिसांनी आज गजाआड केले. लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यापासून या टोळीने सभांमध्ये पाकिटमारीचे सत्र सुरू करून पोलिसांसमोर नवे आव्हान उभे केले होते.

‘महाबळेश्वर साहित्य संमेलनाचा खर्च महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून वसूल करा’
मुंबई, ७ एप्रिल / प्रतिनिधी

अखिल भारतीय साहित्य महामंडळाने महामंडळाच्या घटनेचे उल्लंघन केल्यामुळे महाबळेश्वर येथे नुकत्याच पार पडलेल्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अध्यक्ष मिळाला नाही. त्यामुळे हे संमेलन रद्द करण्यात येऊन या संमेलनासाठी झालेला सर्व खर्च महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावा, तसेच राज्य शासनाकडून देण्यात आलेले २५ लाख रुपयेही त्यांच्याकडूनच वसूल करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे आजीव सदस्य प्रा. जवाहर मुथा यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे.

उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र आयोगाचा विचार - प्रा. यशपाल
मुंबई, ७ एप्रिल / प्रतिनिधी

उच्च शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारमार्फत ‘उच्च शिक्षण आयोग’ नेमण्याचा विचार असल्याची माहिती ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. यशपाल यांनी आज राजभवनमध्ये दिली. उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रा. यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. त्याअनुषंगाने प्रा. यशपाल यांनी आज राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंशी सविस्तर चर्चा केली. यावेळी राज्यपाल एस. सी. जमीर, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव जे. एस. सहारिया आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वयंवर..
राखी सावंतचे!
मुंबई, ७ एप्रिल / प्रतिनिधी

राखी सावंतची पाश्र्वभूमी पाहता तिची प्रत्येक कृती हा पब्लिसिटी स्टंटच असल्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये असते. आता तर राखी सावंतने चक्क आपले स्वयंवर रचले आहे. हे स्वयंवर खासगीत होणार नसून ‘एनडीटीव्ही इमॅजिन’ या वाहिनीवर रंगणार आहे. एका रिअॅलिटी शोच्या माध्यमातून राखी सावंत आपल्या भावी वराची निवड करणार आहे. आपल्या नेहमीच्या तोऱ्यात तिने याची माहिती दिली. ती म्हणाली की, करिना कपूरच्या ‘झीरो फिगर’चा ट्रेन्ड होतो. त्याप्रमाणे मीसुद्धा हे स्वयंवर रचून एक नवा ट्रेन्ड सुरू करणार आहे. हा सुद्धा एक पब्लिसिटी स्टंट आहे का, अशी विचारणा केल्यावर तिने सांगितले की, अक्षयकुमारने रॅम्पवरून चालताना जे केले तो पब्लिसिटी स्टंट होता. मला मात्र चांगल्या पतीचा शोध घ्यायचा आहे.अभिषेकशी फाटल्यानंतर आपण लग्न करणार नसल्याचे राखी सावंतने ‘कॉफी वुईथ करन’ या कार्यक्रमात सांगितले होते. परंतु आता आपल्याला संसार करावासा वाटत असल्याचे राखी सावंत आज म्हणाली. यासाठी भारतभरातील उपवरांना आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्यापैकी १५ जणांची निवड अंतिम फेरीसाठी केली जाईल. या १५ उपवरांना निरनिराळी आव्हाने पार करत राखी सावंतला ‘इम्प्रेस’ करायचे आहे. विजेत्यासोबत राखी सावंतचे लग्न होणार आहे. हा पूर्ण लग्नसोहळा टीव्हीवरून प्रसारित करण्यात येणार आहे. नावनोदंणी करण्यासाठी २६००००३३ या क्रमांकावर अथवा www.ndtvimagine.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

तेलगीच्या साथीदाराला तीन वर्षांची शिक्षा
मुंबई, ७ एप्रिल / प्रतिनिधी

बनावट मुद्रांक घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल तेलगी याचा साथीदार मुरगोड के. दस्तगीर याने गुन्हा कबूल केल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्याला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. दस्तगीर याला १९९८ मध्येच अटक करण्यात आली असून तो तीन वर्षांहून अधिक काळ कारागृहात असल्याने त्याला शिक्षा भोगावी लागणार नाही. दस्तगीर याने गुन्हा कबूल करताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश चित्रा बेदी यांना सांगितले की, खटल्याच्या प्रत्येक सुनावणीच्या वेळी कर्नाटकातून मुंबईत हजर राहणे हे खर्चिक असून सध्या मी बेरोजगार आहे आणि कुटुंबाची जबाबदारीही माझ्यावर आहे. गुन्हा कबूल केल्यास हा खटला लवकर संपेल असे वाटले, असेही तो म्हणाला. दस्तगीर हा तेलगीचा जवळचा साथीदार असून त्याचा व्यवस्थापक म्हणूनही काम पाहात होता.

लग्नास नकार देणाऱ्या तरुणीची हत्या
ठाणे, ७ एप्रिल/प्रतिनिधी

चार वर्षांच्या प्रेमानंतर संसार थाटण्यास सातत्याने नकार घंटा वाजविणाऱ्या प्रेमिकेची गळा चिरून हत्या करणाऱ्या तरूणाला ठाणे रेल्वे पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अटक केली. ही दुदैवी घटना आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास ठाणे ते कोपरी रेल्वे पटरी दरम्यान घडली. रेखा विल्सन तोंडे (२३) ही मृत तरुणी असून ती लोकमान्यनगरमध्ये राहत होती. मुलुंडच्या मिठाघरमध्ये राहणारा बबन गुलाबराव आडीळकर (२६) याला अटक करण्यात आली आहे. झाडू मारण्याचे काम करणारी रेखा व बिगारी बबन यांचे मागील चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. प्रेमाचे रुपांतर लग्नात व्हावे, अशी जबरदस्त इच्छा मनाशी बाळगून बबने तिला लग्नास राजी करण्याचे प्रयत्न केले. परंतू तिच्या मागणी सातत्याने फेटाळण्यात आल्याने तिच्याबद्दल संशय निर्माण झाला. आज ते दोघे ठाणे रेल्वे स्थानक ते कोपरीतील सिद्धार्थनगर झोपडपट्टीच्या दिशेकडील रेल्वे पटरीवर आले. पोलिसांनी त्यांना दोनदा हाकलवून दिल्यानंतर पुन्हा ते पटरीवर आले.अखेर त्याने तिचा गळा चिरला आणि तिचा मृत्यू झाला. हा प्रकार पाहिल्यानंतर नागरिकांनी पळून जाणाऱ्या बबन पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचखोर पोलीस निरीक्षकावर गुन्हा
ठाणे, ७ एप्रिल/प्रतिनिधी

खुनाचा गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपीच्या भावाकडून २० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) भगवान दराडे व पोलीस नाईक सुनिल मोडक यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. मुंब्रा येथील नदीम सय्यद याचा भाऊ मोहमंद सय्यद याच्यावर गेल्यावर्षी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या खुनाचा आरोप काढण्यासाठी दराडे आणि पोलीस नाईक मोडक यांनी २० हजाराची लाच मागितली. तडजोडीनंतर १५ हजारावर सौदा पक्का करण्यात आला. याबाबत नदीम यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर काल रात्री सापळा रचण्यात आला. मात्र दराडे यांनी लाच न घेता त्यांना परत पाठविले. मात्र लाच मागितल्याच्या संभाषणावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.