Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९

‘समाजकारण करण्यासाठी निवडणुकीत’
मी एक समाजसेवक आहे. समाजसेवेच्या कक्षा रुंदावण्यासाठी त्याला राजकारणाची जोड द्यावी लागते. म्हणून मी राजकारणात उतरलो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी असल्याने समाजकारण हेच राजकारण आणि राजकारण हेच समाजकारण हे सूत्र मानतो. त्यानुसारच माझे कार्य सुरू आहे. मुंबईकरांच्या समस्या संसदेच्या पटलावर मांडून, त्यांना वाचा फोडण्यासाठी मी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेला आणि सामान्यपणे राहणारा कार्यकर्ता म्हणून मुंबईकर मला ओळखतात. मुंबईतील प्रत्येक झोपडपट्टीत एकनाथ गायकवाड कोण हे माहीत आहे.

टेट्रा संपर्क योजनेचा गोलमाल
खास प्रतिनिधी

मुंबईसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या १०० कोटी रुपयांच्या आपत्कालीन दूरसंचार प्रणाली ‘टेट्रा संदेश दळणवळण प्रकल्पा’साठी जागतिक निविदा काढून अत्यंत घाईने निविदा निश्चित करण्याचे काम सुरू असल्यामुळे पालिका वर्तुळात ‘अर्थपूर्ण संशय’ व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम होणे अशक्य असतानाही निवडणूक आयोगाकडे या प्रस्तावाला मान्यता मिळावी यासाठी प्रशासनातील उच्चपदस्थांची धडपड सुरू असतानाच पालिकेच्याच कायदा विभागाने या निविदेतील ‘टीसीएस’ या पालिकेचे संगणकीय सल्लागार असलेल्या कंपनीला हे काम देता येणार नाही, असे सांगितल्यामुळे प्रशासनातील उच्चपदस्थांना ‘घरचा आहेर’ मिळाल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जे. कुमारचेच लाड का ?
प्रतिनिधी

‘एमएमआरडीए’ची वादग्रस्त योजना म्हणजे स्कॉयवॉक. कोणतेही नियोजन नाही, स्थानिकांना विश्वासात घेणे नाही किंवा खरेच स्कॉयवॉकची गरज आहे का याची कोणतीही ठोस परिमाणे नाहीत. तरीही स्कॉयवॉकचे बांधकाम अनेक ठिकाणी धुमधडाक्यात सुरू आहेत. विशेष म्हणजे सुमारे ६०० कोटींच्या या योजनेचा ठेका जे. कुमार या बांधकाम कंपनीलाच देण्यात आला असून ही कंपनीच ‘एमएमआरडीए’ची लाडकी का, असा सवाल आता विचारला जात आहे. अनेक ठिकाणी या कंपनीचे अधिकारी स्थानिक नागरिकांना दमदाटी करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

कांजूरमार्ग, ठाणे येथील स्कायवॉक अयोग्य ठिकाणी!
कांजूरमार्ग रेल्वेस्टेशन तसे शापित स्टेशन म्हणावे लागेल. या स्टेशनला मध्य रेल्वेने कायम दुय्यम स्थान दिले आहे. कांजूर, भांडुप गावाकडे जाणारा ठाणे दिशेकडील पूलही कित्येक वर्षांनंतर झाला. सीएसटी दिशेकडील पूलही पूर्व- पश्चिम सुरू झाला. पूल सुरू झाल्याबद्दल द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. ते द्यावेच लागतील. १९९० पूर्वीदेखील या स्थानकावरून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या नगण्य नव्हती. कारण आयआयटी, निटी, एल अ‍ॅण्ड टी, जॉलीबोर्ड, क्रॉम्प्टन ग्रीव्हज् या कंपन्यांकडे जाण्याचे सर्वात जवळचे स्टेशन म्हणजे कांजूरमार्ग.

‘सेलिब्रेशन’च्या ग्राहकांची एकजूट!
प्रतिनिधी

खारघर येथील सिडकोच्या ‘सेलिब्रेशन’ गृहनिर्माण योजनेत फ्लॅटची ‘लॉटरी’ लागलेले ग्राहक आता मंदीच्या पाश्र्वभूमीवर सदनिकेची किंमत कमी करावी, यासाठी एकत्रित आले असून, या ग्राहकांनी ‘सिडको सेलिब्रेशन कृती समिती’ स्थापन केली आहे. सिडकोचे मार्केटिंग मॅनेजर मूर्ती यांच्याशी या ग्राहकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. १४ एप्रिलनंतर सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांसमवेत या प्रश्नावर बैठक बोलविण्याचे आश्वासन मूर्ती यांनी शिष्टमंडळास दिले. दुसरीकडे सिडकोने या योजनेतील फ्लॅट्सच्या किमती किमान ३५ टक्क्यांनी कमी कराव्यात, असा ग्राहकांचा आग्रह असून, प्रसंगी तीव्र लढा उभारण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे.

आवश्यक नसताना कोटय़वधींचा खर्च!
मुलुंड पूर्व येथील रस्ते अरुंद आहेत. या अरुंद रस्त्यांवर स्कायवॉकसाठी उभारण्यात येणारे खांब (पीलर) हे अर्धा रस्ता व्यापून टाकतील व रस्ता आणखी अरुंद होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण होईल. मुलुंड पूर्व परिसरात बेस्ट परिवहनाच्या व्यतिरिक्त अवजड वाहनांचे येणे- जाणे नाही. स्कायवॉक बनवल्यास बसेस चालवण्यासाठी रस्ताच राहणार नाही. त्यामुळे स्कायवॉकची आवश्यकताच नाही. स्कायवॉक बनवल्यास तात्काळ सेवेच्या जसे अ‍ॅम्बुलन्स, फायर ब्रिगेड वाहनांस मार्ग राहणार. मुलुंड पूर्व परिसरात कुठेही मॉल नाही किंवा कारखाने नाहीत, त्यामुळे येथे वर्दळ नसते. रस्त्यावरील हॉकर्स व रिक्षा स्टॅण्डना जागाच मिळणार नाही. एम.एम.आर.डी.च्या उच्च अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष परिसराची पाहणी करते वेळेस परिसरातील नागरिकांनी स्कायवॉकला तीव्र विरोध दर्शवलेला आहे. याबाबत आपण बैठक आयोजित करून परिसरातील नागरिकांच्या भावना समजून घेतल्या. मुलुंड परिसरात स्कायवॉक प्रकल्प बनवण्यात येऊ नये असे पत्र एम.एम.आर.डी.ए.चे आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना प्रत्यक्ष भेट घेऊन दिले.
आमदार चरणसिंग साप्रा, मुलुंड.

माधवराव मुळ्ये चरित्रग्रंथाचे गुरूवारी पाल्र्यात प्रकाशन
प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह माधवराव मुळ्ये यांच्या जीवनकार्याचा परिचय घडविणाऱ्या थोर संघव्रती माधवराव मुळ्ये या चरित्रग्रंथाचे प्रकाशन गुरूवार, ९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता विलेपाल्र्यातील पु. ल. देशपांडे सभागृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे हस्ते होत आहे. चिपळूण येथील उद्योग-व्यावसायिक सुरेश साठे यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून देवरुखच्या कोकण विकास प्रतिष्ठानतर्फे ते प्रकाशित होत आहे. प्रतिष्ठानतर्फे संगमेश्वर तालुक्यात ओझरखोल येथे प्राथमिक शाळा चालविण्यात येते, त्या शाळेच्या मदतीसाठी या पुस्तकाच्या विक्रीतून येणारा निधी दिला जाणार आहे. प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव या कार्यक्रमास प्रमुख अतिथी या नात्याने उपस्थित राहणार आहेत. माधवराव मुळ्ये संघाच्या ज्येष्ठ दिवंगत प्रचारकांपैकी एक असून १९४२ साली ज्या चार प्रचारकांना प्रथम पंजाबात पाठविण्यात आले त्यात मुळ्ये यांचा समावेश होता. मुळ्ये यांचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने दिल्ली, राजस्थान, पंजाब व काश्मीर होते. सप्टेंबर १९७८ मध्ये त्यांचे निधन झाले, तेव्हापासून आजवर अनेक संघ कार्यकर्त्यांची जीवनचरित्रे प्रसिद्ध झाली, परंतु मुळ्ये यांच्यावर लिहिले गेले नव्हते. पुस्तकाचे स्वागतमूल्य १५० रुपये आहे.

महेश केळुस्कर यांचे ‘झिनझिनाट’ आणि ‘मस्करिका’ प्रकाशित
प्रतिनिधी

कवी महेश केळुस्कर यांच्या ‘झिनझिनाट’ आणि ‘मस्करिका’ या काव्यसंग्रहांचे प्रकाशन अनुक्रमे ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक आणि ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना कर्णिक म्हणाले की, निर्भयता आणि निर्भिडता हा कुठल्याही कवीचा खरा बाणा असला पाहिजे. केळुस्कर यांच्या सोमवारी प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहातून तो दिसून येतो. दादर येथील वनमाळी सभागृहात ‘ग्रंथायन’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कर्णिक बोलत होते. १९९० मध्ये रत्नागिरी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन केळुस्कर यांच्या एका कवितेमुळे शिवसेनेकडून उधळले जाणार होते. मात्र केळुस्कर यांनी शेवटपर्यंत माफी मागितली नाही आणि कविकुळाची लाज राखली, या घटनेची आठवणही कर्णिक यांनी यावेळी करुन दिली. या वेळी मंगेश पाडगावकर, ज्येष्ठ हास्यकवी रामदास फुटाणे, कवी प्रा. अशोक बागवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तर विश्वास पाटील यांनी ‘झिनझिनाट’चा इंग्रजी अनुवाद सादर केला. प्रकाशन समारंभानंतर दीपाली केळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘संगीत मस्करिका’ हा विडंबन गीतांचा कार्यक्रम सादर केला.

वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर
प्रतिनिधी

साप्ताहिक ‘मावळ मराठा’ अलीकडेच घेण्यात आलेल्या शिवचरित्र वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. पहिल्या गटात मीरारोड येथील सेंट झेविअर्स हायस्कूलमधील हर्षद प्रदीप गुरव यांने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. तर मानखुर्द येथील मातोश्री विद्यालयातील तुषार सुखदेव शिंदे आणि सांताक्रूझ (प.) येथील गोदावरीबाई पोदार मराठी शाळेतील श्वेता सुनीर रेवाळे यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देण्यात आले आहे. नेहरू नगर, कुर्ला येथील प्रदीप दत्तात्रय सामंत विद्यालयातील सौरभ रवींद्र शेळके आणि दादरच्या आयईएसव्हीएन सुळेगुरुजी शाळेतील कस्तुरी महेश तावडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. दुसऱ्या गटातील प्रथम पारितोषिक उरण येथील जवाहर विद्यामंदिरमधील जाई ठाणेकर हिने पटकावले असून द्वितीय व तृतीय पारितोषिक अनुक्रमे वरळीच्या मराठा हायस्कूलमधील स्वाती लाखण व टिळकनगर, चेंबूरच्या आमची शाळामधील करण माळवे यांना मिळाले. वरळी येथील मराठा हायस्कूलमधील धनश्री राऊळ हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. परिक्षक म्हणून राजेंद्र वाकोडे, रोहिणी भिसे यांनी काम पाहिले. विद्युत सामंत यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.