Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९

जोरदार वाऱ्यासह नगरमध्ये पाऊस
नगर, ७ एप्रिल/प्रतिनिधी

रखरखत्या उन्हामुळे त्रासलेल्या नगरकरांवर आज बेमोसमी पावसाचा सुखद शिडकावा झाला. दुपारी दोनच्या सुमारास शहरासह जिल्ह्य़ाच्या काही भागात वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. पावसामुळे काही वेळ दिलासा मिळाला. मात्र, सायंकाळी अधिक उकाडय़ाचा सामना नागरिकांना करावा लागला. आज दिवसभर पावसाळी वातावरण होते. पारा काल-परवा ४१ अंशावर गेला होता.

दोषींवर कारवाई नाही; गॅसग्राहक मात्र वेठीला!
टाक्यांच्या वितरणात गोंधळ

नगर, ७ एप्रिल/प्रतिनिधी

शहरातील स्वयंपाकाच्या गॅसटाक्या वितरणातील गोंधळाला जबाबदार असणाऱ्या ग्राहक भांडारच्या व्यवस्थापक, संचालक यांच्यावर कसलीही कारवाई न करता त्यांचा परवाना रद्द करून ते ग्राहक दुसऱ्या एजन्सीकडे वर्ग केल्याने गॅस वितरणाचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. गॅसग्राहकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी आहे. गैरव्यवस्थापन, आर्थिक गैरव्यवहार अशा कारणांनी गॅस कंपनीने ग्राहक भांडारचा परवाना रद्द केला. त्यांच्याकडील तब्बल १५ हजार ग्राहक सावेडीतील ममता गॅस कंपनी व शहाजी रस्ता (घासगल्ली) येथील देशमुख यांच्या अहमदनगर गॅस कंपनीकडे वर्ग करण्यात आले. या दोन्ही कंपन्यांकडे त्यांची स्वतची ग्राहकसंख्याच मोठी आहे. त्यात ग्राहक भांडारच्या नव्या ग्राहकांची भर पडल्याने त्यांना काम करणे अडचणीचे झाले आहे.

नगरमधील प्रचाराच्या प्रारंभालाच गांधी अनुपस्थित
नगर, ७ एप्रिल/प्रतिनिधी

उमेदवार दिलीप गांधी कर्जत येथील प्रचारदौऱ्यात अडकल्याने त्यांच्या अनुपस्थितीतच भाजप-सेनेच्या शहरातील प्रचारास विशाल गणपतीचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. आमदार अनिल राठोड, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अभय आगकरकर यांनी गणपतीची पूजा केली. दोन्ही पक्षांचे शहराध्यक्ष संभाजी कदम, अनंत जोशी, तसेच सर्व नगरसेवक, युवा मोर्चाचे ज्ञानेश्वर काळे, सुधीर पगारिया, अनिल सबलोक, मिलिंद गंधे आदी प्रमुख कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

रस्ता रुंदीकरणात पुन्हा खोडा पुनर्वसनाचा प्रश्न गुंतागुतीचा
नगर, ७ एप्रिल/प्रतिनिधी

दिल्ली दरवाजासमोरच्या रस्ता रुंदीकरणाला गाळ्यांच्या प्रश्नावरून शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विरोध केल्याने महापालिका प्रशासन चक्रावले आहे. बहुसंख्य गाळ्यांमध्ये मूळ मालक नसल्याने पुनर्वसनाचा प्रश्नही गुंतागुंतीचा होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रस्त्यालगतचे हे गाळे मनपाचेच आहेत. सन १९८७मध्ये ज्यांना ते देण्यात आले. त्यापैकी बऱ्याचजणांनी मनपाला न कळवता परस्पर ते दुसऱ्यांना भाडेतत्त्वावर दिले. अशा परिस्थितीत पुनर्वसनाचा निर्णय झाला, तरी गाळ्यात प्रत्यक्ष जो व्यवसाय करतो त्याचे करायचे की गाळा ज्याच्या नावावर असल्याची मनपाकडे नोंद आहे त्याचा प्रश्न निर्माण होईल, असे अधिकाऱ्यांना वाटते.

बबनराव ढाकणे सक्रिय होणार, ‘शेविद’चा शुक्रवारी मेळावा
पाथर्डी, ७ एप्रिल/वार्ताहर

गेली अनेक वर्षे राजकीय अज्ञातवास स्वीकारलेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांनी पुन्हा राजकीय आखाडय़ात उतरण्याचे ठरविले आहे. ते संस्थापक असलेल्या शेतकरी विचार दलाचा मेळावा शुक्रवारी (दि. १०) संध्याकाळी येथील वीर सावरकर मैदानावर आयोजित केला असून, कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर आपली राजकीय भूमिका ढाकणे स्पष्ट करणार आहेत. त्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्य़ाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

---------------------------------------------------------------------------

सेनेच्या भगव्याशी पहिले नाते - गाडे
नगर, ७ एप्रिल/वार्ताहर

राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांचे आपण नातेवाईक असल्याचा प्रचार विरोधक करीत आहेत. सुख-दुखात नातेवाईक, परंतु आपले पहिले नाते शिवसेनेच्या भगव्या झेंडय़ाशी, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (दक्षिण) शशिकांत गाडे यांनी केले. नगर मतदारसंघातील, तसेच तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या प्रचार नियोजन सभेत श्री. गाडे बोलत होते. आमदार अनिल राठोड व विजय औटी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, महिला जिल्हा प्रमुख स्मिता अष्टेकर, जि. प. सदस्य संजय कार्ले, प्रा. मधुकर राळेभात, मोहन पालवे आदी उपस्थित होते.

निवडून देऊन मला मंत्री करा, मीही तुम्हास बांधिल - आठवले
राजूर, ७ एप्रिल/वार्ताहर

या निवडणुकीत निवडून देऊन मला मंत्री करा. मीही तुम्हाला मंत्रिपद मिळवून देण्यास बांधिल आहे, असे उद्गार शिर्डी मतदारसंघातील रिपब्लिकन उमेदवार रामदास आठवले यांनी येथे काढले. आगामी निवडणुकांमध्ये तुम्हाला निवडून यायचे असेल, तर या निवडणुकीत मला निवडून द्यावेच लागेल. सोनिया गांधी यांनी माझी उमेदवारी निश्चित केली. त्यामुळे सर्वानी मला मदत करणे भागच आहे, असेही आठवले यांनी येथे काँग्रेस, राष्ट्रवादी व रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना सांगितले. आपण काँग्रेस आघाडीची साथ सोडावी, म्हणून एका पक्षाने मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. मात्र, आपण ती धुडकावली, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

अभ्यासू खासदार हवा!
समाजहिताचे उत्तरदायित्व मानणारी व्यक्तीच खासदार म्हणून संसदेत गेली पाहिजे. खासदार हा केवळ मतदारसंघाचेच नव्हे, तर देशाचेही प्रश्न मांडणारा असावा; मौनी नसावा. राष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय धोरण आदी विषयांवर त्याचे ‘स्वत’चे मत असावे. तेवढा त्याचा अभ्यास असावा. अधिवेशन काळात त्याने संसदेत हजेरी लावावी, चर्चेत सहभागी व्हावे. देशाची अर्थव्यवस्था कृषी आधारित आहे. त्यामुळे शेतीमालाला हमीभाव देऊ शकेल, अशी ‘पॉलिसी’ आणण्याचा प्रयत्न करावा. सिंचन, रस्ते आदी ग्रामीण विकासाच्या योजना केंद्राच्या निधीतून करून घ्याव्यात.

सुगीतही पाखरांचा किलबिलाट!
कार्यकर्त्यांचे अमाप पीक आले आहे. खादीचा पांढराशुभ्र शर्ट, जीन्सची पँट, डोळ्यावर गॉगल, हातात ब्रेसलेट घातले आणि लोकप्रतिनिधी अथवा नेत्यांच्या अवतीभोवती फिरू लागला, पक्ष संघटनेत एखादे पद मिळाले की झाला पुढारी! पूर्वी कार्यकर्त्यांला सामाजिक कार्य करावे लागे. लोकमताच्या पाठिंब्यावर निवडणुका लढवून जिंकावे लागत असे. निवडणुका लढविल्या नाही, तरी चळवळीत काम करणारा, सामाजिक प्रश्नात झोकून देणारा, पक्षनिष्ठा असणारा कार्यकर्ता अशी त्याची ओळख असे.

..की तोंड उघडतं!
त्यांच्या नाकाला काय झालं? दोघंही अचानक नाकावर रूमाल ठेवून येरझऱ्या का घालू लागले?
अजून काही नाही झालं, पण ही त्यांची ‘प्रिकॉशनरी’ कृती दिसते! कसली ‘प्रिकॉशन’ घेताएत ते? उन्हाची? छे, छे! अहो, आबा चिडले ना तेव्हापासूनच ते दोघंही नाकाची काळजी घेतायेत. अच्छा, त्यांना नकटं होण्याची भीती वाटते की काय? आजच त्याचा उलगडा होईल. आज शेवटची तारीख आहे. सारं चित्र स्पष्ट होईल. पण आबांना बहुदा धारदार नाकाचे आकर्षण असावे. ते जाऊ द्या, बायकांमध्ये काही नकटय़ा असतात हे माहिती होतं. पुरुष कसे काय नकटे होतात बुवा? निवडणुकीला उभे राहिले की होतात ना!

कोणत्याही उमेदवारास पाठिंबा न देण्याचा मनसेचा निर्णय
नगर, ७ एप्रिल/प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगर व शिर्डी मतदारसंघातील कोणत्याही उमेदवारास पाठिंबा न देण्याचा, तसेच त्यांचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे जिल्हा संघटक सचिन डफळ यांनी ही माहिती दिली. पक्षाने नगर व शिर्डी मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला होता. इतर कोणत्याही उमेदवारास पाठिंबा न देण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
यासंदर्भात मुंबईत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली. त्यात इतर कोणत्याही उमेदवारास पाठिंबा न देण्याचा निर्णय जाहीर केल्याचे डफळ यांनी सांगितले. बैठकीस जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर, सचिन पोटरे, आनंद शेळके, डॉ. अरुण इथापे, कैलास गिरवले, सतीश मैड यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच होणारी विधानसभेची निवडणूक लक्षात घेता, आता पाठिंबा दिलेल्या उमेदवारांच्या पक्षाविरुद्ध लढत होऊ शकते, या विचारातून पाठिंबा न देण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.
मनसेचे नगरसेवक, पदाधिकारी किंवा कार्यकर्ते इतर कोणत्या उमेदवाराचा प्रचार करताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा डफळ यांनी दिला. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी काँग्रेसचे आमदार राजीव राजळे यांच्याशी संपर्क साधून उमेदवारीची ‘ऑफर’ दिली होती.

निघोज, कोळगावला आज भुजबळ यांची जाहीर सभा
निघोज, ७ एप्रिल/वार्ताहर

राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची सभा कोळगाव (तालुका श्रोगोंदे) येथे उद्या (बुधवारी) सकाळी १० वाजता, तर निघोजला दुपारी १२ वाजता होणार आहे. राष्ट्रवादीचे श्रीगोंदे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव काकडे व जिल्हा बँकेचे संचालक उदय शेळके यांनी ही माहिती दिली. जिल्हाध्यक्ष दादा कळमकर, माजी आमदार वसंतराव झावरे, महानगर बँकेचे अध्यक्ष गुलाबराव शेळके, ज्येष्ठ नेते बाबासाहेब कवाद, प्रभाकर कवाद, जि. प.चे उपाध्यक्ष सुजित झावरे, सभापती पोपटराव पवार, जि. प. सदस्य मधुकर उचाळे, पं. स. सदस्य खंडू भुकन, तालुकाध्यक्ष तुकाराम मते, ‘युवक’चे तालुकाध्यक्ष सुनील पवार आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत. सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन बाळासाहेब लामखडे यांनी केले. कोळगावच्या सभेस वनमंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव नागवडे उपस्थित राहणार आहेत.

आचारसंहितेतही सहीसलामत!
निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांच्या, राजकीय पक्षांच्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या फलकांवर, फोटोंवर, तसेच पुतळ्यांवर आचारसंहितेमुळे संक्रांत येते. नगर शहरातील सर्जेपुरा चौकात असलेला हत्ती त्यामुळेच महापालिकेला झाकावा लागला. पण सगळीकडेच अशीच झाकाझाक करता येते का? आता हेच बघा, महापालिकेच्या महावीर कलादालनावर ‘हत्ती’ आणि ‘कमळा’चे चित्र रेखाटलेले आहे. ही चित्रे राजकीय पक्षांची चिन्हे आहेत, हे महापालिका प्रशासनाच्या किंवा निवडणूक अधिकाऱ्यांच्या अजून लक्षात आले नाही म्हणून बरे; अन्यथा तिथेही फडके टाकलेले दिसले असते! विधानसभेची तयारी! राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारसभेसाठी आर. आर. पाटील नगर तालुक्यातील वाळकीला आले होते. सर्वच वक्तयांना थोडक्यात भाषण करण्यास सांगण्यात आले होते. श्रीगोंद्याचे माजी आमदार शिवाजीराव नागवडे मात्र नेहमीप्रमाणे संथ गतीने भाषण करीत होते. स्वत ‘शिवाजी’ असलेल्या बापूंनी नंतर मात्र भाषण लवकर आटोपण्याच्या गडबडीत ‘शिवाजीराव नागवडे यांनाच विजयी करावे’ असे आवाहन केले. उपस्थितांनी झालेली चूक लगेच ध्यानात आणून दिली. ‘बापू बहुतेक विधानसभेची तयारी करीत असावेत,’ अशी टिपण्णी लगेच एकाने केली.

भाजप-सेनेची कामरगाव शाखा बरखास्त
नगर, ७ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील कामरगाव येथील भाजप व शिवसेनेची शाखा बरखास्त करीत राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारात सहभागी होण्याचे शाखाप्रमुख संदीप लष्करे व भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विलास झरेकर यांनी जाहीर केले. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नगर मतदारसंघाचे अस्तित्व संपुष्टात आल्याने तालुक्याच्या भवितव्यासाठी कर्डिले यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे लष्करे व झरेकर यांनी सांगितले. गावातील सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी या वेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या वेळी सरपंच वसंत ठोकळ, नगर कारखान्याचे माजी संचालक रावसाहेब साठे, अनिल ठोकळ, श्रीराम कातोरे, दादाभाऊ झरेकर, इंटकचे तालुकाध्यक्ष अशोक ठोकळ, बाबाजी भुजबळ, दत्ता झरेकर, गोरख कातोरे उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------
मोबाईलवर बोलणाऱ्याचा विजेने घेतला बळी!
नगर, ७ एप्रिल/प्रतिनिधी

पावसात झाडाखाली थांबलेल्या दुचाकीस्वाराचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. आज दुपारी अडीचच्या सुमारास नगर-पाथर्डी रस्त्यावर शहापूर गावाजवळ ही दुर्घटना घडली. ही व्यक्ती मोबाईलवरून बोलत असताना वीज पडल्याचे समजते. या प्रकरणी भिंगार ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुधाकर दिनकर किलबिले (३४ वर्षे, रा. औरंगपूर, ता. पाथर्डी) असे मृताचे नाव आहे. ग्रामसेवक असलेले किलबिले मोटरसायकलवरून पाथर्डीला निघाले होते. अडीचच्या सुमारास त्यांना शहापूर गावाजवळ वादळी पावसाने गाठले. ओढा ओलांडून काही अंतर गेल्यानंतर गाडी उभी करून ते झाडाखाली थांबले. तेवढय़ात त्यांच्या अंगावर वीज पडली. त्यांच्या हातात असलेला मोबाईल जळून खाक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. किलबिले यांच्याजवळ २२ हजार रुपये होते. हे पैसे सुरक्षित राहिले. ते त्यांच्या नातलगांना देण्यात आले. तपास हवालदार मांडगे करीत आहेत.

महावीर जयंतीदिनी मांसविक्री; संतप्त जैन समाजाचा संगमनेरमध्ये मोर्चा
संगमनेर, ७ एप्रिल/वार्ताहर

महावीर जयंतीच्या दिवशीही शहरातील कत्तलखाने आणि मांसविक्रीची दुकाने चालूच ठेवल्याने येथील जैन समाजाने काढलेल्या मिरवणुकीचे रूपांतर मोर्चात झाले. संतप्त समाजबांधवांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन संतप्त भावना व्यक्त केल्या. नगराध्यक्षा अंजली तांबे यांनी दिलगिरी व्यक्त करीत दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा थांबविण्यात आला. महावीर जयंतीच्या पाश्र्वभूमीवर येथील जीवदया मंडळ आणि जैन संघटनेच्या वतीने दोन दिवसांपूर्वीच पोलीस आणि पालिका प्रशासनाला निवेदन दिले होते. किमान महावीर जयंतीच्या दिवशी कत्तलखाने, मांसविक्रीची दुकाने बंद ठेवून समाजाच्या भावना जपण्याची विनंती केली होती. जयंतीदिनी आज जैन बांधवांनी भगवान महावीरांच्या प्रतिमेची सजविलेल्या रथातून मिरवणूक काढली. मिरवणुकीत मोठय़ा संख्येने महिलाही सहभागी झाल्या होत्या. येथील पाश्र्वनाथ गल्लीतून सुरू झालेली मिरवणूक उत्साहात बाजारपेठ, तेलीखुंटमार्गे सय्यदबाबा चौकात आली. तेथील सर्वच मांसविक्रीची दुकाने उघडी असून, विक्रीही केली जात असल्याचे दिसल्यानंतर जैन बांधवांच्या भावना तीव्र झाल्या.
येथूनच मिरवणुकीचे रूपांतर धडक मोर्चात झाले. तो पोलीस ठाण्यावर आला. तेथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पाऊण तासाने वीजकपात कमी केल्याने समाधान
राहुरी, ७ एप्रिल/वार्ताहर

ऐन उन्हाळ्याच्या मध्यावर वीज कंपनी व मुळा-प्रवरा वीज संस्थेकडून शहराची वीजकपात पाऊण तासाने कमी करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शहर व परिसरात पूर्वी ८ तास, नंतर साडेसहा तास वीजकपात होत होती. शहराच्या बहुतांश भागात उन्हाळ्याच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात वीजपंपांचा सर्रास वापर व छुप्या पद्धतीने वीजवापर होत होता. मात्र, त्याकडे हेतुत दुर्लक्ष केले जात होते. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत येथे कार्यरत असणाऱ्या पथकाच्या एकतर्फी कारभाराबद्दल ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत. वीजकपातीचे नवे वेळापत्रक असे - सोमवार - सकाळी ५.३० ते ८.३०, दुपारी २.४५ ते ५.३०. मंगळवार - सकाळी ९.३० ते १२.१५, दुपारी ५ ते ८. बुधवार - ६.३० ते ९.३०, दुपारी २.१५ ते ५. गुरुवार - ८.३० ते ११.१५, दुपारी ५.३० ते ८.३०. शुक्रवार - ५.३० ते ८.३०, दुपारी २.४५ ते ५.३०. शनिवार ९.३० त १२.१५, दुपारी ५ ते ८. रविवार ६.३० ते ९.३०, दुपारी २.४५ ते ५.

‘साईबाबा संस्थानने गुलकंद निर्मिती प्रकल्प सुरू करावा’
कोपरगाव, ७ एप्रिल/वार्ताहर

शिर्डीच्या साईबाबा संस्थानने गुलकंद व गुलाबपाणी प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी अध्यक्ष जयंत ससाणे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे. त्यात म्हटले आहे की, श्रीसाईबाबांच्या समाधीवर भक्त गुलाबपुष्प, गुच्छ वाहतात. भक्तांच्या वाढत्या गर्दीबरोबर हा साठा सारखा बाहेर फेकून द्यावा लागतो. समाधीवरील फुले अनेकवेळा पायाखाली येतात. बाजारात गुलाबपाणी, गुलकंदाला वाढती मागणी आहे. साईचरणी वाहिलेल्या गुलाबपुष्पांपासून गुलकंद व गुलाबपाणी निर्मितीचा प्रकल्प सुरू करावा. त्याच्या विक्रीतून संस्थानला उत्पन्न मिळेल.

डॉ. आंबेडकर व फुले जयंतीनिमित्त राहुरीला विविध कार्यक्रम
राहुरी, ७ एप्रिल/वार्ताहर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून महोत्सव समितीच्या वतीने दि. ११ ते दि. १४ एप्रिलदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष छगन सगळगिळे यांनी दिली. ते म्हणाले की, संयुक्त जयंती महोत्सव समितीची स्थापना करण्यात आली आहे. येथील प्रगती शाळेच्या पटांगणात दि. ११ ते १४ एप्रिलदरम्यान सायंकाळी ७ ते १० या वेळेत व्याख्याने होणार आहेत. दि. १३ रोजी धम्मचारी प्रशील (दापोली) यांचे ‘महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांचे राष्ट्रीय कार्य’, दि. १२ रोजी इतिहास संशोधक डॉ. आ. हं. साळुंके यांचे व्याख्यान, दि. १३ रोजी प्रोग्रेसिव्ह थिएटरनिर्मित ‘रमाई’ नाटक, तोफांची सलामी व मिठाईवाटप, डॉ. आंबेडकर यांना अभिवादन, दि. १४ रोजी सकाळी ८.३० वाजता डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण, तसेच गोटुंबे आखाडा येथे अभिवादन सभा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव एस. के. कांबळे व प्रा. व्ही. बी. गोंधळी यांनी केले आहे.

‘महावीरांचा जनकल्याणाचा संदेश आचरणात आणावा’
श्रीरामपूर, ७ एप्रिल/प्रतिनिधी

जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांनी अखेरच्या श्वासापर्यंत भक्तांना जनकल्याणाचा संदेश दिला. भक्तांनी त्याचे आचरण करावे, असा उपदेश प्रवीणऋषीजी यांनी दिला. महावीर जयंतीनिमित्त जैन स्थानकात दिलेल्या प्रवचनात त्यांनी हा उपदेश केला. शहरात जैन समाजाने या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले. दिगंबर जैन समाज, संभवनाथ मूर्तिपूजक संघ व स्थानकवासी जैन संघ यांनी एकत्रितरित्या महावीरांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढली. प्रवीणऋषीजी, अक्षयऋषीजी यांनी मंगलपाठ दिला. आमदार जयंत ससाणे, नगराध्यक्ष संजय फंड, उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी, सचिन गुजर, सिद्धार्थ मुरकुटे, अंजुम शेख आदींनी महावीरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दर्शन घेतले. महावीरांच्या सिद्धांताचे सर्वानी चिंतन करावे, असे प्रवीणऋषीजी व अक्षयऋषीजी यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल पांडे, रमेश गुंदेचा, रमेश कोठारी, सर्व विश्वस्तांनी परिश्रम घेतले.

अवैध वाळूवाहतूक करणारा डंपर जप्त; एकास अटक
राहुरी, ७ एप्रिल/वार्ताहर

मुळा नदीपात्रातून विनापरवाना अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारा डंपर पोलिसांनी जप्त केला. त्यातील एकाजणास अटक करण्यात आली असून, एकजण फरार झाला. आज पहाटे राहुरी खुर्द-देसवंडी शिवारात डंपर (एमएच १७ टी ९८१४)मधून तीन ब्रास वाळूची चोरटी वाहतूक होत होती. याचा सुगावा लागताच पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले. या प्रकरणी सतीश शंकर पेंढारे यास अटक करण्यात आली असून, अशोक सीताराम खेवरे हा फरार झाला. पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ सोनवणे यांनी रितसर फिर्याद दाखल केली. संगनमत करून विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत महसूल व पोलीस यंत्रणा व्यस्त आहे. याचा फायदा वाळूसम्राट घेत आहेत. त्यामुळे केवळ पोलीस खात्यानेच नव्हे, तर महसूल खात्यानेही याकामी सक्रिय होण्याची गरज आहे.

कोपरगावला महावीर जयंती उत्साहात साजरी
कोपरगाव, ७ एप्रिल/वार्ताहर

भगवान महावीरांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. तसेच जागतिक आरोग्य दिनही साजरा झाला. महावीर जयंतीस विविध राजकीय पुढाऱ्यांनी आपली वर्णी लावली. जैन समाजाच्या वतीने शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. शेकडो युवकांनी त्यात सहभाग घेतला. भगवान महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक जैन मंदिरापासून काढण्यात आली. रॅलीत आमदार अशोक काळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव बिपीन कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, नगराध्यक्ष मंगेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, लोकसभेचे सेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे सहभागी झाले होते. दिगंबर जैन मंदिरात फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पंच पी. सी ठोळे, केशरचंद ठोळे, शांतिलाल लोहाडे आदी या वेळी उपस्थित होते. लायन्स क्लबच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

माळीवाडा वेशीसमोरील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार
नगर, ७ एप्रिल/प्रतिनिधी

माळीवाडा वेशीसमोरील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून, हनुमान जयंतीला (गुरुवारी) मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यानिमित्ताने माळीवाडा देवस्थानतर्फे आजपासून प्राणप्रतिष्ठा व हनुमान जयंती उत्सवाला सुरुवात झाली, अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब सुडके यांनी दिली. आज देवतेला जलाधिवास, अग्निमंथन, नवग्रह हवन आदी धार्मिक कार्यक्रम झाले. उद्या (बुधवारी) प्रधान देवतेला १०८ कलशांचा महास्नान विधी, महान्यास विधी, धान्यधिवास आदी कार्यक्रम होतील. गुरुवारी पहाटे मूर्तीस्थापना, ध्वजारोहण, कलशारोहण, महाआरती, महाबली पूर्णाहुती, महाप्रसाद (भंडारा) वाटप आदी कार्यक्रम होणार आहेत. मुकुंदशास्त्री मुळे (नाशिक) यांच्यासह ११ पुरोहित पौरोहित्य करणार आहेत. बापूसाहेब एकाडे व नीता एकाडे हे यजमान असतील. भाविकांनी उत्सवकाळातील कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष जगन्नाथ आगरकर यांनी केले. संगमनाथमहाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टी पंडित खरपुडे, अशोक कानडे, रामकृष्ण राऊत, शिवाजी शिंदे आदी उत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

जळीतप्रकरणी नुकसानभरपाई देण्याचा महाराष्ट्र बँकेला आदेश
नगर, ७ एप्रिल/प्रतिनिधी

दुकान जळीतप्रकरणी महाराष्ट्र बँकेने ५ लाख ७५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दिला. बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथे गेल्या वर्षी दुकान जळून ८ लाखांचे नुकसान झाले होते. न्याय मंचाचे अध्यक्ष सुधाकर बिनवडे, सदस्य प्रा. पी. ई. भराडी यांनी हा निकाल दिला. फिर्यादी शुभम प्लायवूड हार्डवेअर दुकानाचे मालक राजेंद्र नथुलाल शर्मा यांच्यातर्फे वकील श्याम असावा यांनी काम पाहिले. त्यांना वकील विनायक सांगळे, दीपक धिवर यांनी सहकार्य केले. बेलापूर येथील शुभम प्लायवूड हार्डवेअर व शुभम ट्रेडर्स या दुकानात २९ एप्रिल २००८ रोजी आग लागून ८ लाखांचे नुकसान झाले. या दुकानासाठी शर्मा यांनी महाराष्ट्र बँकेच्या बेलापूर शाखेकडून कर्ज घेतले होते व त्या पोटी दुकानातील सामान तारण ठेवले होते. या सामानाचा विमा उतरवला नसल्याने विमा कंपनीने नुकसानभरपाई देण्यास नकार दिला. हा विमा उतरविण्याची जबाबदारी बँकेची होती, पण बँकेने ती टाळली. त्यामुळे दुकानाचे मालक शर्मा यांनी बँकेविरुद्ध ग्राहक न्याय मंचात धाव घेतली. सुनावणीत शर्मा यांच्यातर्फे युक्तिवाद करताना विमा उतरविण्याची जबाबदारी बँकेची होती हे निदर्शनास आणून देण्यात आले. हा युक्तिवाद न्याय मंचाने मान्य करून महाराष्ट्र बँकेने दुकानदार शर्मा यांना ५ लाख ७५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश देण्यात आला.

सर्वागीण विकासासाठी संधी द्या झ्र् कर्डिले
श्रीगोंदे, ७ एप्रिल/वार्ताहर

नगर मतदारसंघाचा सर्वागीण विकास साधण्यासाठी खासदारकीची संधी देण्याचे आवाहन आघाडीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी आज सारोळे सोमवंशी येथील प्रचारसभेत केले.
श्री. कर्डिले यांच्या प्रचारासाठी आज वनमंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव नागवडे, प्रदेश सरचिटणीस घनश्याम शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत सारोळे, सुरेगाव, मुंगूसगाव, विसापूर, कोंडेगव्हाण, निंबवी, अरणगाव, ढवळगाव आदी गावांचा दौरा केला. या वेळी‘श्रीगोंदे’चे उपाध्यक्ष केशवराव मगर, नामदेव गोंटे, विलास वाबडे आदी उपस्थित होते. कर्डिले म्हणाले की, आमदारकी व मंत्रिपदाच्या माध्यमातून नगर तालुक्यात पायाभूत सुविधा देताना महत्त्वाच्या समस्या मार्गी लावल्या. याच धर्तीवर आता नगर दक्षिणमधून खासदार झाल्यास सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध राहील. या वेळी श्री. नागवडे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी करणाऱ्यांकडून मतदारसंघातील समस्या सुटू शकत नाहीत. त्यामुळे कर्डिलेंना लोकसभेवर पाठवा.

पत्रकार चौकात तरुणाला बेदम मारहाण; तिघांना अटक
नगर, ७ एप्रिल/प्रतिनिधी

भावाला का मारहाण केली, याची विचारणा करायला आलेल्या युवकाला सहाजणांनी बेदम मारहाण केली. ही घटना आज सकाळी ११ वाजता पत्रकार चौकात घडली. कुमार दादू गायकवाड (वय २०, रा. गायकवाड मळा) हा जबर जखमी झाला आहे. या प्रकरणी रात्री उशिरा ३ आरोपींना अटक करण्यात आली. सिद्धार्थ साळुंके, विशाल बबन वाकळे, कुमार बबन वाकळे, गोरक्षनाथ आरगडे, संकेत व्यवहारे, भरत वाकळे (सर्व रा. सावेडी गाव) या सहाजणांनी लाकडी दांडके, लोखंडी पाईपने कुमारला जबर मारहाण केली. कुमारचा भाऊ ऋषिकेश यास या युवकांनी सोमवारी मारहाण केली होती. त्याचे कारण विचारायला कुमार गेला होता. या घटनेमुळे धावपळ होऊन वातावरण तणावपूर्ण झाले होते. कुमारच्या फिर्यादीवरून वरील सहाजणांविरुद्ध तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी ३ आरोपींना अटक झाली असून, ३ फरारी आहेत. तपास सहायक उपनिरीक्षक बारसे करीत आहेत.

नेप्ती शिवारातील छाप्यात २५ हजारांची गावठी दारू जप्त
नगर, ७ एप्रिल/प्रतिनिधी

नगर तालुका पोलिसांनी नेप्ती शिवारात छापा घालून २५ हजार रुपयांची गावठी दारू व अन्य साहित्य जप्त केले. आज पहाटे ही कारवाई करण्यात आली. दिलीप विष्णू रानवडे (वय ४७ वर्षे, राहणार नेप्ती) यास अटक करण्यात आली असून, बाबा बाजीराव पवार फरारी आहे. जमिनीत गाडलेल्या ड्रममधील ५ हजार रुपयांची २८० लिटर गावठी दारू, तसेच २० हजारांचे कच्चे रसायन असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सहायक निरीक्षक भोसले यांच्या नेतृत्वाखाली हवालदार खैरे, शिपाई एम. ए. थोरात, समीर सय्यद यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.

प्रा. दरेकर यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार
श्रीगोंदे, ७ एप्रिल/वार्ताहर

राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्यासाठी झालेल्या प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांच्या प्रचारसभेत जिल्हा सरचिटणीस प्रा. तुकाराम दरेकर यांनी केलेल्या भाषणावर आक्षेप घेत शिवसेनेचे नेते नंदकुमार कोकाटे यांनी ही आचारसंहिता भंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे.
कोकाटे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रा. दरेकर हे येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात उपप्राचार्य आहेत. त्यांनी महाविद्यालयातून काल रजा न काढता आर. आर. पाटील यांच्या सभेत भाषण व सूत्रसंचालन केले. सरकारी पगार घेऊन राजकीय भाषण करणे हा आचारसंहिता भंग असल्याने प्रा. दरेकर यांच्यावर कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली.
दरम्यान, प्रा. दरेकर यांनी कोकाटे यांचा हा आरोप अज्ञानपणाचे लक्षण असून महाविद्यालयीन वेळेनंतर मी भाषण केले. ते नियमानुसार असल्याचे स्पष्ट केले.