Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९

महावीर जयंती - महावीर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेतील भगवान महावीरांची मूर्ती ठेवलेला चित्ररथ.

‘मायावती विरुद्ध सोनिया’विदर्भात रंगणार प्रचारलढा
नागपूर, ७ एप्रिल / प्रतिनिधी

काँग्रेसच्या पारंपरिक मतांना छेद देत मुसंडी मारणाऱ्या बहुजन समाज पार्टीच्या विदर्भातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाच्या सर्वोच्च नेत्या मायावती व पक्षापासून दूर जात असलेली पारंपरिक मते रोखण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी या राजकीयदृष्टय़ा शक्तीशाली दोन महिला नेत्यांच्या सभा विदर्भात होत आहेत. या प्रचारलढय़ाचे स्वरूप मायावती विरुद्ध सोनिया असेच राहणार असल्याने त्या काय बोलतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांचे २ मुलांना जीवनदान
नागपूर, ७ एप्रिल / प्रतिनिधी

अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन तलावाच्या मध्यभागी बुडत असलेल्या दोन मुलांचा प्राण वाचवला. मंगळवारी दुपारी सक्करदरा तलावाच्या काठावर उभ्या असलेल्या अनेकांनी हा प्रसंग श्वास रोखून बघितला. अमित विनोद मसे व निखील वासुदेव गावंडे ही वकीलपेठेतील नऊ वर्षांची दोन मुले सक्करदरा तलावात बारा वाजताच्या सुमारास पोहण्यासाठी गेली होती. तलावात कमळाची उगवलेली फुले या मुलांनी काही महिन्यांपूर्वी पाहिली होती. पाण्याखाली फुले आहेत का, असा विचार या मुलांच्या मनात आला आणि दोघेही पोहता पोहता तलावाच्या मध्यभागी पोहोचले. मात्र, तेथे जाईपर्यंत त्यांना धाप लागली. मध्यभागी पाणी खोल असल्याने ही मुले गटांगळ्या खाऊ लागली.

रेल्वेत ‘रिफन्ड’ घोटाळा; तीन कर्मचारी निलंबित
नागपूर, ७ एप्रिल/ प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ‘रिफन्ड’ घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणात आज चौकशीअंती ३ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या घोटाळ्यात संशयाची सुई रेल्वेच्या बडय़ा अधिकाऱ्यांच्या दिशेने वळली असल्याने त्यांच्या नावांबाबत अत्यंत गुपप्ता बाळगण्यात येत आहे.
रेल्वे प्रवास केल्यानंतरही एका प्रवाशाच्या नावाने ‘रिफन्ड’ घेण्यात आल्याचा प्रकार नागपूर विभागात घडला आहे. या प्रकरणात रवी कौशलेश, राहुल यादव आणि जावेद खान यांना निलंबित करण्यात आले. यासंदर्भात बोलताना मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, या प्रकरणात तिकीट तपासणीस दिलावर खान यांना निलंबित करण्यात आले होते. परंतु, त्यांच्या विरोधात पुरावे न मिळाल्याने दक्षता विभागाच्या चौकशीत ते निर्दोष ठरले. त्यामुळे सन्मानाने त्यांना नोकरीवर परत घेण्यात आले आहे.

वरूडजवळ विचित्र अपघात; मिनी ट्रक उलटून ५ ठार, ४ जखमी
वरूड, ७ एप्रिल / वार्ताहर

वरूड-नागपूर मार्गावर दादाजी धुनीवाले मठाजवळ सोमवारी रात्री झालेल्या विचित्र अपघातात ५ ठार, ४ जखमी झाले. या घटनेने वरूड तालुक्यात शोककळा पसरली आहे.
वरूडवरून रात्री १० वाजता चांदस वाठोडा येथे जाणारी टाटा सुमो झाडावर आदळली. त्यात चालक भूषण कनाटे हा किरकोळ जखमी झाला. त्याने अपघाताची सूचना वरूड पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी भूषणला वरूडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ही घटना भूषणच्या मित्रांना कळल्याने त्यांनी भूषणची विचारपूस करीत घटनास्थळ गाठले. नेमक्या त्याचवेळी वरूडवरून नागपूरकडे संत्रा घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रकच्या चालकाला वळणानंतर अचानक गर्दी दिसली.

मुत्तेमवार यांनी श्रेय लाटू नये -मानकर
नागपूर, ७ एप्रिल / प्रतिनिधी

दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न विलास मुत्तेमवार यांनी करू नये, तो प्रयत्न त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन अशोक मानकर यांनी केले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान, मिहान आणले, गोसीखुर्द धरण पूर्ण झाले, विशेष आर्थिक क्षेत्रही प्रत्यक्षात आले, असा दावा एसएमएसच्या माध्यमातून मुत्तेमवार करीत आहेत. प्रत्यक्षात या तिन्ही गोष्टींची स्थिती काय आहे, हे सर्वानाच माहीत आहे. उलट मुत्तेमवार मिहानलाच विरोध करीत होते. विदर्भात भारनियमनाचे संकट तीव्र झाले असताना विदर्भातील जनतेला दिलासा देण्यासाठी मुत्तेमवार यांच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने कोणतेच प्रयत्न केले नाही. खरे म्हणजे विदर्भातील भारनियमनाचे संकट मंत्रालयाच्या माध्यमातून मुत्तेमवार काही प्रमाणात कमी करू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही, असा आरोप आमदार मानकर यांनी केला आहे. मुत्तेमवार स्वत:चा निधीही पूर्णपणे खर्च करू शकले नाही. त्यांना विकासाबाबत बोलायचा काहीच अधिकार नाही. भाजपा नेत्यांना आणि उमेदवारांवर खोडसाळ टीका करण्याऐवजी मुत्तेमवार यांनी पक्षांतर्गत विरोधकांना सांभाळावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

सरस्वतीचंद्र शिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थीना निरोप
नागपूर, ७ एप्रिल / प्रतिनिधी

न्यू नंदनवन मधील सरस्वतीचंद्र शिक्षण संस्थेद्वारा संचालित ब्युटिकल्चर, प्री.डी.एड. फॅशन डिझाईन आणि अंगणवाडी प्रशिक्षणार्थीचा नुकताच निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालिका अंजली खोब्रागडे होत्या. प्रमुख पाहुणे सेवादलचे प्रमुख रामगोविंद खोब्रागडे, अरुण शास्त्रकार, सुनील घोरपडे, डॉ. भोयर आणि अश्विनी भोपळे उपस्थित होते. प्रशिक्षणार्थितर्फे निर्मला श्रीपाद, रोशनी महल्ले, रूपाली जीवनापूरकर आदींनी संस्थेसंदर्भात अनुभवकथन केले. संस्थेच्या संचालक अंजली खोब्रागडे यांनी संस्थेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. संचालन नंदा बडवाईक यांनी केले. अश्विनी मोहाडीकर यांनी आभार मानले. यावेळी भाग्यश्री नेवारे, संगीता गभने, सोनम वानखेडे, सोनाली तायवाडे, वर्षां गायधने, नंदा तितरमारे, प्रीती देशपांडे, मीना आकरे आदी उपस्थित होते.

बुद्ध, आंबेडकरांच्या छायाचित्रांचे अनावरण
नागपूर, ७ एप्रिल / प्रतिनिधी

संजय गांधी नगरातील कौसल्याबाई सोमकुंवर कॉन्व्हेंटमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष ओमप्रकाश सोमकुंवर यांच्या हस्ते गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी भदन्त नागदिपांकर, प्रा. सुरेश पानतावणे, मिलिंद गोंडाणे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अतुल गोंडाणे यांनी केले. कार्यक्रमासाठी कृष्णा सालोडकर, रतनलाल बोरकर, तेजराज चवरे, श्यामराव भगत, राजश्री हेडाऊ, श्वेता गेडाम, मनोज गजभिये, कविता नागदिवे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

सुधा चौधरी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
नागपूर, ७ एप्रिल / प्रतिनिधी

नगर नागसेन स्पोर्टिग क्लबद्वारा संचालित मिलिंद उच्च प्राथमिक शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुधा चौधरी यांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पी.बी. ढाकणे आशा कार्लेवार, मोहन सोमकुवर, संध्या वैद्य, अन्नपूर्णा वाघमारे, प्रमुख पाहुणे विठ्ठल डांगरे यांची भाषणे झाली. संस्थेचे ज्येष्ठ सदस्य हरेश्वर चहांदे, ताराचंद पाटील, लहू गाणार, सोपान नगरारे, आनंद सोनटक्के, हरिचंद पाटील, सत्यभामा नगरारे, उषा शिर्के आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.बी. ढाकणे यांनी माहिती दिली. संचालन मालती तोडसाम यांनी केले. स्वागत गीत व समारोप गीत शाळेच्या शिक्षकांनी सादर केले. कविश्वर बोढे यांनी आभार मानले. संस्थेचे सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य दिले.

‘लग्नाची बेडी’ नाटकाचा प्रयोग आज
नागपूर, ७ एप्रिल / प्रतिनिधी

आचार्य अत्रे लिखित ‘लग्नाची बेडी’ या विनोदी नाटकाचा प्रयोग उद्या, बुधवारी रात्री ९ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या नाटकामध्ये सिनेस्टार अविनाश खर्शीकर, सिनेतारका अश्विनी कुळकर्णी, टी.व्ही. स्टार अतुल अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका असल्याची माहिती आयोजक बाळासाहेब भांबुरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२८ ऑगस्ट १९३६ मध्ये पुणे येथे या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. गेल्या ७६ वर्षांत या नाटकाचे दहा हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत. या नाटकात पाच हजारांपेक्षा अधिक प्रयोगात भूमिका केल्याचे अविनाश खर्शीकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. नागपूरमध्येही पुणे, मुंबईसारखेच मराठी नाटकाचे रसिक आहेत. चांगली नाटके आली की ते घराबाहेर पडतात, असे ते म्हणाले. मराठी चित्रपट मोठय़ा प्रमाणावर निघत आहेत; त्या मानाने फार कमी चित्रपटांना यश मिळते असेही त्यांनी सांगितले. या नाटकाची तिकिट विक्री डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात उद्या, बुधवारी सकाळपासून सुरू राहणार आहेत. तिकिट दर १५०, १०० व ८० रुपये आहेत. या दर्जेदार नाटकाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजक भांबुरकर यांनी केले. पत्रकार परिषदेला अतुल अभ्यंकर, समीर पंडित प्रामुख्याने उपस्थित होते.

साहेबराव पाटील, श्रीहरी घोनमोडे यांनी पदभार स्वीकारला
नागपूर, ७ एप्रिल / प्रतिनिधी

साहेबराव पाटील यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून तर, सहायक पोलीस निरीक्षक श्रीहरी घोनमोडे यांनी शहर पोलीस दलाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून मंगळवारी सायंकाळी पदभार स्वीकारला. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त कोमलसिंह ठाकूर यांच्याकडे परिमंडळ चारची जबाबदारी देण्यात आली. कोल्हापूरहून आलेले पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली. भंडाऱ्याहून आलेले सहायक पोलीस निरीक्षक श्रीहरी घोनमोडे हे पोलीस माहिती कक्षाचे प्रमुख राहतील. पोलीस निरीक्षक गवरी हे सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त होते. मूळचे मूलसावलीचे घोनमोडे १ फेब्रुवारी १९७६ला शिपाई म्हणून पोलीस दलात रुजू झाले. १९९४साली उपनिरीक्षक तर, डिसेंबर २००५ला सहायक पोलीस निरीक्षक म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. लाखांदूर, पलांदूर, साकोली, गडचिरोली, शेगाव, चंद्रपूर व भंडारा येथे त्यांनी काम केले आहे. गडचिरोली जिल्ह्य़ातील नक्षलवाद प्रभावित क्षेत्रात त्यांनी सर्वाधिक काळ काम केले.

डॉ. मायी ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ने सन्मानित
नागपूर, ७ एप्रिल / प्रतिनिधी

कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष आणि कापूस संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. सी.एस. मायी यांना बिहार विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानित करण्यात आले. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी डॉ. मायी यांना हा पुरस्कार देण्यात आला. डॉ. मायी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील पीक सुरक्षा वैज्ञानिक आहेत. याचबरोबर डॉ. मायी यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे उपकुलपती, कृषी आयुक्त आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक म्हणून कार्य केले आहे. यापूर्वीही मायी यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. मायी यांचा जन्म १५ जुलै १९४७ साली विदर्भातील अकोला जिल्ह्य़ात झाला. त्यांनी अकोला आणि नागपुरातून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. यापूर्वी त्यांना नरसिंहन अकादमी पुरस्कार, एचएआर अ‍ॅन्ड डीएफ पुरस्कार, व्ही.पी. गोखले पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कापूस संशोधन संस्थेतील संचालक पदाच्या कार्यकाळात त्यांनी ५०पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एमएससी आणि डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन केले आहे. डॉ. मायी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्या सहकार्यानी त्यांचे अभिनंदन केले आहे.

वृंदा भुसारी पं. सोहनलाल द्विवेदी पुरस्काराने सन्मानित
नागपूर, ७ एप्रिल / प्रतिनिधी

राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे वृंदा भुसारी यांच्या ‘टफी ने बचाई राजू की जान’ या बालकथासंग्रहाला पं. सोहनलाल द्विवेदी पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. मुंबईच्या पाटकर सभागृहात झालेल्या एका सोहोळ्यात गीतकार गुलजार यांच्या हस्ते वृंदा भुसारी यांना हा पुरस्कार देण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि २५ हजार रुपये रोख, असा हा पुरस्कार आहे. अकादमीचे अध्यक्ष पं. नंदकिशोर नौटियाल यांनी अध्यक्षस्थान भूषवले. बिर्ला उद्योग समूहाच्या राजश्री बिर्ला आणि गायक उदित नारायण प्रमुख पाहुणे होते. पुरस्कारप्राप्त साहित्यिकांमध्ये वृंदा या सर्वात कमी वयाच्या आहेत. रामटेकच्या किटस्मधून अभियांत्रिकी पदवी संपादन केल्यानंतर पुण्याच्या एका संस्थेत त्या आहेत. शरद पवार कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. किशोर आणि डॉ. जयश्री भुसारी यांच्या त्या कन्या आहेत. संचालन किशन शर्मा यांनी केले. आभार डॉ. केशव फाळके यांनी मानले.