Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
विशेष

जी व न द र्श न
ऐतरेयोपनिषद: पूर्वार्ध

 

ऐतरेय आरण्यकाचा शेवटचा भाग म्हणजे ऐतरेयोपनिषद. ऋषी महिदास हा या उपनिषदाचा कर्ता होय. विशेष म्हणजे, महिदासाने पृथ्वीची उपासना केली. त्याला वसुंधरा स्वच्छ ठेवावी असे मनापासून वाटे. पृथ्वीने त्याला वर दिला, ‘तू विद्वान होशील. ब्राह्मण ग्रंथ रचशील’. महिदासांनी अभ्याससाधना केली. ‘प्रज्ञानं ब्रह्म’ हे त्यांनी फार महत्त्वाचे सूत्र दिले. पृथ्वी हा विश्वाचा आधार आहे. पृथ्वीतल्या उदकातून एक पुरुष बाहेर काढून त्याला पिंडाचा आकार दिला. आत्म्याने त्या पुरुषाकडे पाहिले. त्याप्रमाणे त्या पुरुषापासून मुख निघाले. मुखापासून वाणी, वाणीपासून अग्नी, त्यापासून प्राण, प्राणापासून वायू निर्माण झाला. डोळय़ांतून दृष्टी, दृष्टीतून सूर्य उत्पन्न झाला. कान, त्यापासून ऐकणे-ऐकण्यापासून दिशा निर्माण झाल्या. त्वचा, त्यापासून केस, केसापासून वनस्पती निर्माण झाल्या. ह्रदय, त्यापासून मन, मनापासून चंद्रमा निर्माण झाला. नाभी, त्यापासून अपान-अपानापासून मृत्यू उत्पन्न झाला. शिश्न, त्यापासून रेत-रेतापासून उदक निर्माण झाले. या साऱ्याचा भावार्थ असा, एका आत्म्यापासून ही विविध सृष्टी निर्माण झाली. याचा शोध या उपनिषदात आहे. सृष्टीच्या शोधाचे विज्ञान काय असावे याचे कुतूहल इथे आहे. सांख्यदर्शनकार कपिल महामुनींनी विज्ञानदृष्टीचा पुरस्कार केलेला आढळतो. या उपनिषदात जगाच्या उत्पत्तीचे कुतूहल आहे. सूक्ष्मातून जड निर्माण झाले आहे. याचाही विचार या उपनिषदात आहे. समष्टीरूप विश्व आणि व्यष्टीरूप माणूस यांच्यातले द्वंद्व इथे टिपले आहे. साधकाने हे शिकायचे, की ‘मी’पणा साधनाने कमी करून आपल्या जिवाची दारे विश्वातील शक्तींना मोकळी करून द्यावी, याने सामथ्र्य वाढेल. योगातल्या सिद्धी प्रकटतील. ‘गीताई’त म्हटलेय,
करुनि करुणा त्यांची हृदयीं राहुनी स्वयें।
तेजस्वी ज्ञान-दीपानें अज्ञान-तम घालवी ।।
हा योगयुक्त विस्तार माझा जो नीट ओळखे ।
त्यास निष्कंप तो योग लाभे हय़ात न संशय ।।
यशवंत पाठक

कु तू ह ल
ग्रहणाचे निरीक्षण
ग्रहणाचे निरीक्षण कसे करावे? त्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश मुळातच तुलनेने मंद असल्यामुळे चंद्रग्रहण साध्या डोळय़ांनी पाहण्यात काहीच गैर नाही. चंद्रग्रहणात खग्रास स्थिती आल्यानंतर अत्यंत अंधूक, लालसर, तांबूस रंगाचा चंद्र साध्या डोळय़ांनी निरखून पाहण्याची मजा काही न्यारीच! पृथ्वीच्या सावलीत शिरणाऱ्या चंद्राच्या बदलत्या रंगछटा पाहायला खरेच खूप मजा येते. पृथ्वीची सावली प्रत्यक्ष पाहण्याचा योग नाही तर केव्हा येणार? सूर्यग्रहण पाहताना मात्र डोळय़ांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. इतर वेळीही आपण सूर्याकडे पाहू शकत नाही. दुर्बिणीतून जर चुकूनही सूर्याकडे पाहू नये. नाही तर कायमचे अंधत्व येऊ शकेल. सूर्यग्रहणाच्या खंडग्रास स्थितीत हळूहळू ‘काळा’ होणारा सूर्य पाहण्यासाठी विशिष्ट प्रकारचा खास ‘ग्रहण-चष्मा’ वापरणे अत्यावश्यक आहे. दुर्बिणीमधून सूर्यग्रहण पाहायचे असेल तर दुर्बिणीच्या नळीच्या तोंडाशी खास सौर फिल्टर लावायलाच हवा. खग्रास स्थिती येण्याच्या काही क्षण आधी दिसणारी मण्यांची माळ, हिऱ्याची अंगठी या वेळीही ग्रहण चष्मा डोळय़ांवर असणे आवश्यक आहे. खग्रास स्थिती सुरू झाल्यानंतर मात्र ग्रहण चष्मा बाजूला करून काळय़ा सूर्याभोवती दिसत असलेले अप्रतिम प्रभामंडल डोळे भरून पाहायचे. खग्रास स्थिती केव्हा संपणार हे आपल्याला आधीपासूनच माहीत असते. खग्रास स्थिती संपायच्या काही सेकंद आधीच पुन्हा ग्रहण चष्मा डोळय़ांवर चढवणे अत्यावश्यक आहे. सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती येण्याच्या १५-२० मिनिटे आधी आपल्या आजूबाजूचा परिसर न्याहाळायला विसरू नका. जसजसा सूर्य झाकला जातो, तसतशी सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी होते. कमी होणारे तापमान, सैरभैर झालेले प्राणी-पक्षी, दाटून आलेला सभोवताल, झाडांची मिटणारी पाने, पश्चिमेकडून आपल्या दिशेने चालून येणारी चंद्राची सावली या सर्वाचा अनुभव चित्तथरारक असतो.
प्रदीप नायक
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
कुमार गंधर्व

शिवपुत्र सिद्धरामय्या हे त्यांचे मूळ नाव. तथापि, सारा भारत त्यांना ओळखत होता पंडित कुमार गंधर्व या नावाने! त्यांचा जन्म कर्नाटकातील सुलेभावी या गावी ८ एप्रिल १९२४ रोजी झाला. प्राथमिक शाळेच्या चौथ्या इयत्तेपर्यंतही त्यांनी शिक्षण घेतले नाही, तथापि लहानपणापासून त्यांना गायनात गती विलक्षण, तेव्हा त्यांच्या वडिलांनी गायनकलेत प्रभुत्व मिळवण्यासाठी त्यांना मुंबईला प्राध्यापक बी. आर. देवधर यांच्याकडे पाठविले. देवधरांनी त्यांची उपजत गायनकला तर विकसित केलीच, पण त्याचबरोबर ग्वाल्हेर घराण्याची गायकी दिली. दरम्यानच्या काळात त्यांना क्षयाच्या व्याधीने ग्रासले. तेव्हा प्रकृतीला आराम पडावा म्हणून डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ते मध्य प्रदेशातील देवास येथे वास्तव्यास गेले. देवास येथे त्यांनी डॉ. वसंतराव देशपांडे, पंडित कोल्हापुरे, पंडित वाडीकर आदी कलावंतांना मार्गदर्शन केले. नादब्रह्मातून संगीताची उत्पत्ती झाली असल्याने त्या नादत्वाचा शोध घेत संगीताच्या मूलस्रोताकडे जावे असे त्यांचे म्हणणे होते. संगीताच्या क्षेत्रात पारंपरिक संगीताला फाटा देऊन टीकेची पर्वा न करता जुन्या आणि नव्याचा मिलाफ साधत एक नवी वाट भारतीय संगीताला दिली. गीत वसंत, गीत वर्षां, गीत हेमंत, त्रिवेणी, भजने, तुकाराम, तुलसीदास दर्शन, गीत मल्हार, गांधी मल्हार इ. रागांची निर्मिती त्यांनी केली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ या किताबाने सन्मानित केले. याशिवाय गांधर्व महाविद्यालय, विक्रम विश्वविद्यालय, भारत भवन या संस्थांनीही त्यांचा गौरव केला. हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रात आपला वैशिष्टय़पूर्ण ठसा उमटवलेल्या या थोर कलाकाराचे १२ जानेवारी १९९२ रोजी निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
खराखुरा मित्र झिपरू
घराशेजारच्या मैदानावर निखिलला एक कुत्रा सापडला. भटका असावा बहुधा! कारण त्याच्या गळय़ात पट्टा नव्हता. पांढऱ्या मळकट रंगाचा तो कुत्रा लोकरीच्या भेंडोळय़ासारखा दिसत होता. डोके कुठे अन् शेपूट कुणीकडे तेच मुळी कळत नव्हते. निखिलने हाक मारली,‘‘झिपरू’’ आणि केसाळ मान उंचावून तो हळूच भुंकला. त्याला उचलायला निखिल वाकला, पण झिपरूला ते आवडले नाही. तो भुंकला. निखिल हिरमुसून घराच्या दिशेने निघाला. थोडय़ा वेळाने थांबून पाहतो तो झिपरू त्याच्या मागे पळत येत होता. निखिल थांबला. तो चालू लागला तर झिपरूही पुन्हा त्याच्यामागे चालू लागला. निखिल एक डोळा झिपरूकडे ठेवून थोडा चाले. पुन्हा थांबे. मागे पाही, तर झिपरूही त्याच्यामागून येताना थांबलेला असे. घर येईपर्यंत हा प्रकार चालू होता. बेल वाजवल्यावर आईने दार उघडले. निखिलच्या मागे असलेले झिप्रे कुत्रे पाहून तिने विचारलं,‘हे कुत्रं उलटं का चालतेय?’ आई कामासाठी माघारी फिरली. पाठोपाठ निखिल आणि झिपरू आत शिरले. संध्याकाळी बाबा घरी आले तेव्हा झिपरू त्यांच्या आरामखुर्चीत पहुडला होता. बाबांनी विचारलं,‘‘ही मळकट उशी माझ्या खुर्चीत कुणी ठेवली.’’ ते खुर्चीत बसणार, एवढय़ात निखिल ओरडला,‘बसू नका, तो माझा मित्र झिपरू आहे.’ बाबा गोंधळून गेले. तेवढय़ात झिपरूने उडी मारली. बाबा ओरडले,‘कुत्रं पाळायचं नाही, एकदा सांगितलंय ना?’ ‘फक्त एक रात्र’, निखिल गयावया करीत म्हणाला. रात्री झिपऱ्याची सोय हॉलमध्ये केली गेली, पण त्याला ती व्यवस्था मान्य नव्हती. तो सतत भुंकत राहिला. शेवटी बाबांनी वैतागून त्याला बाथरूमध्ये बंद केले. हा गप्प काय करतोय ते पाहायला जरा वेळाने बाबांनी दार किलकिले केले. आता नॅपकीन, टॉवेल, साबण आणि स्लीपरच्या चिंध्या पडल्या होत्या. ‘मी रस्त्यावर फेकतो याला,’ बाबा किंचाळले. निखिल धावत आला. त्याला पाहून झिपरू त्याच्या पायात जाऊन उभा राहिला. ‘मी माझ्या खोलीत नेतो त्याला,’ निखिल म्हणाला. आई म्हणाली,‘‘ने बाबा. झोपेचं खोबरं झालं.’’ निखिलच्या बिछान्याशी पोहोचल्यावर झिपरूने अंगाई गायला सुरुवात केली. निखिलने घाईने त्याच्या तोंडावर हात ठेवला, पण झिपरूचे शेपूट त्याच्या हातात आली. झिपरूचा सूर आणखीन वाढला. आई धावत आली. पाहते तो निखिलचा हात झिपरूचे शेपूट आणि दोघांची फुगडी चालू. आईने टय़ूब चालू केली, तसा झिपरू घाबरून पलंगाखाली शिरला. दिवा बंद करून आई निघून गेली आणि निखिलला पलंगाखालून कुरुकुरु कुरतडण्याचा आवाज येऊ लागला. त्याने पलंगावरून उडी मारली. पाहतो तर शाळेच्या बुटांचा फडशा सुरू होता. आई-बाबाही दाराशी येऊन उभे होते. आईच्या हातात दुधाची बशी आणि बाबांच्या हातात पाव होता. ‘अरे, भूक लागली असेल रे त्याला’ म्हणत दूधपाव ठेवल्यावर हां हां म्हणता झिपरूने सगळे गट्ट केले. त्याचे डोळे पेंगुळले आणि काही वेळात तो गाढ झोपून गेला. तेव्हापासून आई न चुकता झिपरूला खायला देऊलागली. बाबा पेपर आणायला, बॉल पकडायला शिकवू लागले. निखिलला खराखुरा मित्र मिळाला. तोही सगळय़ांना आवडणारा. तुम्हाला प्रत्येकजण आवडतोच असे नाही. काही वेळा तुम्हाला जमवून घ्यावे लागते न आवडणाऱ्यांशी. त्यामुळे तुम्हाला आणि त्यांनाही परिस्थिती त्रासदायक होत नाही. दुसऱ्यांच्या भावनांची कदर करावी. त्यामुळे न आवडणाऱ्या व्यक्तींशीही आपल्याला जुळवून घेता येते. आजचा संकल्प- इतरांचा राग येत असेल तरी मी जमवून घेईन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com