Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९

जेएनपीटीचे खासगीकरण संघटितपणे रोखण्याचा कामगार संघटनेचा इशारा
उरण/वार्ताहर -
जेएनपीटीने बंदरातील कामे खासगीकरणातून चालविण्याचा प्रयत्न केल्यास तो डाव संघटितपणे उधळून लावण्यात येईल, असा गंभीर इशारा डॉ. शांती पटेलप्रणीत न्हावा- शेवा पोर्ट अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स युनियनचे महादेव घरत यांनी बैठकीतून दिला. जेएनपीटी बंदरातील डॉ. शांती पटेलप्रणीत कामगार संघटनेच्या कामगारांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत जेएनपीटीने बंदराचा चालविलेला खासगीकरणाचा प्रयत्न व कामगार हिताविरोधात घेतलेल्या निर्णयाबाबत चर्चा करण्यात आली. जागतिक स्पर्धेत टिकण्याच्या व बंदराच्या सर्वागीण
विकासाच्या नावाखाली जेएनपीटीने बंदराचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. मात्र जेएनपीटीने साधनसामुग्री खरेदी करून होऊ घातलेले चौथे कंटेनर बंदराचे खासगीकरण न करता स्वत: चालवावे, अशी आग्रही मागणीही महादेव घरत यांनी बैठकीतून केली.

आगामी साहित्य संमेलन दिल्लीत?
दोन महिन्यांत निर्णय होणार

प्रतिनिधी

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची अध्यक्षपदाची कारकीर्द पुढच्या वर्षी संपत आहे. आगामी ८३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाले-पाटील यांच्याच अधिपत्याखाली पार पडणार असून ठाले-पाटील यांची कार्यपद्धती आणि राजकीय वजन पाहता हे संमेलन नवी दिल्लीतच होण्याची दाट शक्यता साहित्य वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१० मध्ये जानेवारी महिन्यात होईल.
महाबळेश्वर येथे ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. ८२ व्या साहित्य संमेलनासाठी रत्नागिरी, ठाणे, परभणी आदी ठिकाणांहून निमंत्रणे आली होती. मात्र ठाले-पाटील यांनी हे ८२ वे मराठी साहित्य संमेलन सॅनहोजे येथे भरविण्याचा घाट घातला होता. त्यांच्या या निर्णयावर मराठी साहित्य आणि प्रकाशन वर्तुळातून तीव्र नाराजीची प्रतिक्रिया उमटली होती. तरीही ठाले-पाटील सॅनहोजे येथे संमेलन घेण्यावर ठाम होते.

वाशीत गळफास घेऊन चालकाची आत्महत्या
बेलापूर/वार्ताहर -
कर्नाटक येथे राहणाऱ्या ट्रकचालकाने वाशीत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. शरणप्पा कल्लारे (४०) असे मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील ट्रकवर बदली चालक म्हणून कल्लारे काम करीत होता. एपीएमसीतील विसावा हॉटेलच्या मागे झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत तो आढळून आला. आत्महत्येचे कारण अद्याप कळले नसून, एपीएमसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

जेएनपीटीच्या कंटेनर माल हाताळणीमध्ये वाढ
उरण/वार्ताहर :
जागतिक आर्थिक मंदीची झळ सर्वच व्यावसायिकांना बसली असतानाही जेएनपीटी बंदराने गत आर्थिक वर्षांत ५७.२८ मिलियन टन मालाची हाताळणी केली असून, ती मागील वर्षांपेक्षा तुलनेत २.५८ टक्क्यांनी अधिक आहे. जेएनपीटीच्या २००८-०९ या आर्थिक कामकाजाची आढावा बैठक नुकतीच प्रशासन भवनात पार पडली. बंदराच्या प्रशासन भवनात आयोजित बैठकीत बंदराचे चेअरमन यांनी बंदराच्या कामकाजाची माहिती दिली. याप्रसंगी सीमा शुल्क विभाग, खासगी कंपनीचे व बंदराचे उपभोक्ता अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
जेएनपीटीने मागील वर्षी ५५.८४ मिलियन टन कंटेनर मालाची हाताळणी केली होती. २००८-०९ या मंदीच्या वर्षांतही मागील वर्षांपेक्षा २.५८ टक्के ज्यादा कंटेनर मालाची हाताळणी केली आहे. तरल पदार्थांची हाताळणी करण्यात आली आहे. लिक्वीड कार्गो जेट्टीची उत्पादन क्षमता ५.५ मिलियन टन असतानाही या आर्थिक वर्षांत ५.८ मिलियन टन इतकी तरल पदार्थांची हाताळणी करण्यात आली आहे.

‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे जर्नल्स डीव्हीडी रूपात
प्रतिनिधी

‘‘पुण्यातील २० पक्षीनिरीक्षकांच्या चमूने शहरात पक्षीगणना करावयाचे ठरवले. त्यानुसार दोन-दोनच्या गटाने ही मंडळी पुण्याच्या विविध भागात फिरून पक्षी मोजू लागली.. आठवडाभर निरीक्षणे नोंदविल्यावर त्यांना आढळले की, १३० प्रकारचे २२ हजारांहून अधिक पक्षी शहरात आहेत. त्यातही ९० प्रजाती या पाहुण्या पक्ष्यांच्या आहेत; आणि कावळा, चिमणी, कबुतरे अशा माणसाच्या जवळ आढळणाऱ्या पक्ष्यांचा आकडा मोठा आहे.. अशारितीने मार्च १९७९ च्या पहिल्या आठवडय़ात ही पक्षीगणना पूर्ण झाली.. - लेखक प्रा. प्रकाश गोळे’’. १९७९ मधील जुन्या नोंदी इथे देण्याचे प्रयोजन म्हणजे, अशा विविध अ‍ॅक्टिविटीज्च्या नोंदी असलेले ‘जर्नल्स ऑफ बीएनएचएस’ डीव्हीडी रूपात बाजारात आले आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने एक हजार रुपयांना ही डीव्हीडी उपलब्ध करून दिली आहे. ‘जर्नल्स ऑफ बीएनएचएस’या नावाने असलेल्या या डीव्हीडीमध्ये १८८६ पासून प्रकाशित झालेल्या सुरुवातीच्या शंभर भागांचा समावेश आहे. त्यात ‘नॅचरल हिस्ट्री’विषयक विविध लेख, संशोधन कार्याची माहिती आहे. ‘जिम कॉर्बेट’ यांनी नोंदविलेल्या वन्यजीवनाच्या तसेच ‘डॉ. सलीम अली’ यांच्या पक्षीनिरीक्षणाच्या नोंदी हे यातील काही विशेष. खेरीज हुमायून अब्दुलअली, एच. जी. चॅम्पिअन आदी पर्यावरण अभ्यासक, संशोधकांचे लेखन यामध्ये आहे. बीएनएचएसच्या जर्नल्समधील जुन्या नोंदींचे वाचन करताना मनोरंजन तर होतेच; शिवाय यातील नोंदींमुळे त्या त्या काळातील नैसर्गिक इतिहासाची माहितीही मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणीय ऱ्हासाचा लेखा-जोखा मांडताना आधुनिकतेच्या भरात आपण काय काय गमावून बसलोय याचाही अंदाज या नोंदींमुळे पर्यावरणप्रेमींना येऊ शकतो. संपर्क-बीएनएचएस, हॉर्नबिल हाऊस, शहीद भगतसिंग मार्ग, मुंबई, ४००००१. दूरध्वनी- २२८२१८११.