Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९

राजकीय क्षितीजावर सध्या निवडणुकीचे ढग दाटले असल्यामुळे आग ओकणाऱ्या सूर्यनारायणाची पर्वा न करता उन्हाचा तडाखा सहन करत उमेदवारांसह विविध पक्षाच्या नेत्या-कार्यकर्त्यांना प्रचारासाठी दारोदार फिरावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर पारा ४० अंशाच्या आसपास स्थिरावला असल्याने लोकांच्या भेटी-गाठीसाठी बाहेर पडणारी नेतेमंडळी पुरती हैराण झाली आहेत. परंतु, मंगळवारी सकाळी नाशिकमध्ये झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने वातावरणातील उष्मा काही अंशी कमी झाला आणि नाशिक प्रमाणेच धुळे, जळगाव परिसरातही दिवसभर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे या भागात दररोज उन्हातान्हात फिरावे लागणाऱ्या नेतेमंडळींना थोडासा का होईना, पण दिलासा मिळाला. अर्थात, आकाशात दाटलेल्या या काळ्या ढगांकडे पाहतानाही चर्चा सुरू होती ती राजकीय घडामोडींचीच.

काठावर पास होण्यासाठीही मोठी मजल आवश्यक
अभिजीत कुलकर्णी

डाव्या आघाडीच्या पाठबळावर दिंडोरी मतदारसंघातून माकपतर्फे निवडणूक रिंगणात उतरलेले आमदार जिवा पांडू गावित यांच्याकडे सामान्यपणे ‘तिसरे’ उमेदवार म्हणूनच पाहिले जात असले तरी आपल्या हक्काच्या मतांच्या टक्क्य़ाला अधिकाधिक जोड देऊन विजयाच्या समीप पोहचण्याचा निकराचा प्रयत्न सध्या माकपची मंडळी करीत आहेत. सुरगाणा परिसरातील एकगठ्ठा मते, वनजमीनींच्या प्रश्नामुळे नांदगाव, चांदवड, दिंडोरी भागात विस्तारलेले संघटन, हार्ड कोअर कार्यकर्त्यांचा संच आणि इतरांपेक्षा वेगळी असलेली प्रतिमा या बाबींवर गावित यांचा भरवसा आहे, मात्र मतदारसंघाची व्याप्ती पाहता प्रयत्नांची शर्थ केली तरी माकपला काठावर पास होणेसुद्धा मुश्किल जाणार आहे.

मालिक तो अच्छा है, मगर..
भाऊसाहेब :
निवडनुकीचा टाईम असून सक्काळपास्न गडी येकदम चुपचाप कसा, भावराव?
भाऊराव : भावडय़ाबद्दल म्हणताय ना, काहितरी बिनसलेलं दिसतयं खरं.
भाऊसाहेब : ना रे, भावडय़ा..
भावडय़ा : मूड नाय आपला, त्यात आणखी चर्चा करून डोकं फिरायला नको म्हणून गप्प बसलोय.

‘किमान काही कामे तरी मार्गी लागावीत’
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच सरकारने वृत्तपत्रांमधून पानभर (सरकारी खर्चाने)जाहिराती देवून पाच वर्षांत केलेल्या कामाचे पोवाडे गायले होते. पण अशा चित्रात मालेगावसारख्या ठिकाणची नेमकी स्थिती प्रतिबिंबीत होणे मुश्किल आहे. नव्या रचनेत मालेगावचा समावेश धुळे मतदारसंघात झाला असला तरी आतापर्यंत मालेगाव हा लोकसभेचा मतदार संघ होता. अनेक वर्षे तो ‘राखीव’ स्वरूपाचा होता. या काळात येथे अनेकजण निवडून आले. काँग्रेसचे झेड. एम. कहांडोळे हे त्यातल्या त्यात परिचयाचे नाव! अनेक वेळा त्यांनी मालेगाव मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. जनता दलाचे हरीभाऊ शंकर महाले हेही दोन वेळा निवडून गेले.

नेहरू पुनरुत्थान योजनेच्या कामांत ढिलाई
प्रश्न जिव्हाळ्याचे, प्रतिनिधी / नाशिक

शहराचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत (जेएनएनयुआरएम)स्थानिक खासदाराने ना एखादी नवी योजना सुचविण्याचा प्रयत्न केला, ना महापालिकेने मांडलेल्या योजनेच्या फलिताविषयी कधी चर्चा केली. एकूणच, या प्रक्रियेत त्यांचा सहभाग केवळ दिखाऊपणापुरताच सीमित राहिला. महापालिकेच्या दिरंगाईमुळे जेव्हा या योजनेचे अनुदान मिळण्याची शक्यता धूसर बनू लागली होती,

ढगाळ वातावरण व पावसाच्या शिडकाव्याने वातावरणात बदल
प्रतिनिधी / नाशिक

उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नाशिककरांसाठी मंगळवारची सकाळ काहिशी वेगळी अनुभूती देणारी ठरली. शहर व आसपासच्या परिसरात पुन्हा एकदा बेमोसमी पावसाचा शिडकावा झाल्याने आणि दिवसभर वातावरण ढगाळ राहिल्याने तापमानात एकाएकी बदल झाल्याचे जाणवत होते. या पावसाचा फारसा परिणाम द्राक्षबागांवर होणार नसला तरी गव्हासह अन्य पिकांसाठी तो त्रासदायक ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातही थोडय़ाफार फरकाने असेच वातावरण होते. धुळे शहरात सकाळी ढगाळ वातावरण तर जळगावमध्ये हलक्या सरी बरसल्या.

टपाल कार्यालयातून मुद्रांक शुल्क विक्रीस संघटनेचा विरोध
नाशिक / प्रतिनिधी

टपाल कार्यालयातून मुद्रांक शुल्क विक्री करण्यास येथील शासकीय परवानाधारक मुद्रांक विक्रेता अर्ज व दस्त लेखक संघटनेने तीव्र विरोध केला आहे. शासनाने या योजनेचा फेरविचार करावा यासाठी मुद्रांक विक्रेत्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
शासनाने मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने नियमित नुतनीकरण करू तसेच मुद्रांकाचा नियमित पुरवठा करू, अशी हमी दिलेली आहे. तसेच उच्च न्यायालयाने ‘फ्रॅन्कींग’ ही अतिरीक्त व्यवस्था असून ती प्रचलित मुद्रांकाला पर्याय नाही, असा आदेश दिलेला असतानाही सरकारच्या वतीने पोष्टातून ‘फ्रॅन्कींग’ व्दारे मुद्रांक शुल्क भरण्याची व्यवस्था करणे ही खेदाची बाब आहे, असे मुद्रांक विक्रेत्यांनी म्हटले आहे. पोष्टातून फ्रॅन्कींगद्वारे मुद्रांक शुल्क भरण्याची व्यवस्था म्हणजे मुद्रांक व्यवसाय बंद पाडणे, राज्यातल्या हजारो परवानाधारकांना बेरोजगार करणे ठरेल, तसेच शासनाने हा निर्णय घेताना मुद्रांक विक्रेत्यांच्या कोणत्याही संघटनेला विश्वासात घेतले नाही. प्रचलीत मुद्रांक विक्री व्यवसायाच्या मुळावर येणाऱ्या या निर्णयाचा धिक्कार करण्यात येत असून संघटना परवानाधारकांच्या न्याय हक्कासाठी लढा देईल असा इशारा सचिव हेमंत धांडे यांनी दिला.

गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे गुणवंतांचा गौरव
नाशिक / प्रतिनिधी

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, प्रशासकीय क्षेत्रातील विविध गुणवंतांना येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे गौरविण्यात आले. पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर झेंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त पोलीस उपअधीक्षक अभिमन्यू सूर्यवंशी, अजित बागमार, आनंद आहेर, अभिनेते अरूण नलावडे उपस्थित होते. आपल्याला जर पुनर्जन्म मिळाला तर तो कलाकार म्हणूनच मिळावा, अशा प्रकारच्या पुरस्कारांमुळे माझ्यातील कलावंताला पुढील कामासाठी सतत प्रेरणा मिळते, अशी भावना यावेळी अभिनेत्री तथा दिग्दर्शिका स्मिता तळवळकर यांनी मांडली. समाजासाठी काही तरी विधायक काम करण्यात खरा आनंद आहे. हाच संदेश गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिला जात असून प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे, असे नलावडे यांनी सांगितले. यावेळी तळवळकर यांच्यासह जळगावचे उद्योजक रतनलाल बाफना, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निखील गुप्ता, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कैलास कमोद, प्रा. फ. मु. शिंदे, चांगदेव होळकर, रावसाहेब शिंदे, आ. प्रतापदादा सोनवणे, महेंद्र भामरे, डॉ. शरद पाटील, सुरेश निकम, निंबा कदम, नाशिक महापालिकेचे अभियंता आर. के. पवार, नगरसेविका डॉ. ममता पाटील, लोकसत्ताचे जयप्रकाश पवार, किसनराव क्षीरसागर, दौलत पगार, रत्नाकर पंडित, शैलेश निकम, कैलास जाधव यांना गिरणा गौरवने सन्मानित करण्यात आले. शहीद अरूण चित्ते यांना मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रूपाली देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

जळगाव जनता बँकेचा व्यवसायवृद्धीचा संकल्प
जळगाव / वार्ताहर

येथील जळगाव जनता सहकारी बँकेने आताच संपलेल्या आर्थिक वर्षांत ७३५ कोटींचा व्यवसाय वृद्धीचा टप्पा पार केला असून एन. पी. ए.चे प्रमाणे फक्त तीन टक्यापेक्षा कमी राखण्यात बँकेला यश आले आहे. येत्या आर्थिक वर्षांसाठी एकत्रित व्यवसायातून एक हजार कोटीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक विद्याधर दंडवते यांनी येथे पत्रकाव्दारे दिली. बँकेने सर्व निकष पूर्ण करीत मार्च २००९ अखेर ४६२ कोटी ठेवीचा पल्ला गाठत २७३ कोटी कर्ज वितरित केले आहे. बँकेने तरतुदपूर्व सात कोटी नफा प्राप्त केला असून एनपीएचे प्रमाण अत्यल्प ठेवण्यात यश मिळविले आहे. तसेच बँकेचे भागभांडवल १५ कोटी असून रिझव्‍‌र्ह बँकेच्या तपासणीत बँकेला प्रथम दर्जा व वैधानिक लेखा परीक्षकांनी अ ऑडिट वर्ग दिला असल्याचेही दंडवते यांनी सांगितले. बँकेच्या २४ शाखा व असलेल्या तीन विस्तारित कक्षांचे शाखात रुपांतर करण्यास रिझव्‍‌र्ह बँकेने परवानगी दिली असून कल्याण आणि खामगाव येथे नव्या शाखांसाठी परवानगी उपेक्षित असल्याचे पत्रकात म्हटले आहे. ग्राहकांना अधिकाधिक सेवा देण्याच्या उद्देशातून लवकरच जनता बँक कोअर बँकींग प्रणाली जुन अखेर सुरू करणार व त्या अंतर्गत बँखेच्या सर्व शाखा व मुख्य कार्यालय एकमेकांना जोडले जाणार आहेत. ग्राहकांना एकाच छात्राखाली सर्व सुविधा देण्याच्या उद्देशातून बँकेने एलआयसी व इफ्को टोकियो विमा कंपन्यांशी करार केला आहे. सीडीएसएलशी करार करून बँक डिपॉझिटरी सेवा सुरू करीत आहे. बँकेच्या सर्व शाखेत वीज बिल भरणा करण्याची सुविधा सुद्धा लवकरच सुरू करणार असल्याचे दंडवते यांनी कळविले आहे.