Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

काठावर पास होण्यासाठीही मोठी मजल आवश्यक
अभिजीत कुलकर्णी

डाव्या आघाडीच्या पाठबळावर दिंडोरी मतदारसंघातून माकपतर्फे निवडणूक रिंगणात उतरलेले आमदार जिवा पांडू गावित यांच्याकडे सामान्यपणे ‘तिसरे’ उमेदवार म्हणूनच पाहिले जात असले तरी आपल्या हक्काच्या मतांच्या टक्क्य़ाला अधिकाधिक जोड देऊन विजयाच्या समीप पोहचण्याचा निकराचा प्रयत्न सध्या माकपची मंडळी करीत आहेत. सुरगाणा परिसरातील एकगठ्ठा मते, वनजमीनींच्या प्रश्नामुळे नांदगाव, चांदवड, दिंडोरी भागात विस्तारलेले संघटन, हार्ड कोअर कार्यकर्त्यांचा संच आणि इतरांपेक्षा वेगळी असलेली प्रतिमा या बाबींवर गावित यांचा भरवसा आहे, मात्र मतदारसंघाची व्याप्ती पाहता प्रयत्नांची शर्थ केली तरी माकपला काठावर पास होणेसुद्धा

 

मुश्किल जाणार आहे.
उमेदवारीच्या घोषणेत आणि प्रचारात गावित यांनी प्रतिस्पध्र्यावर आघाडी घेतली असली तरी ही बाब त्यांना प्रत्यक्ष मतदानातही आघाडी मिळवून देईल, असे नाही. भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण व राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ या तगडय़ा प्रतिस्पध्र्याचे आव्हान समर्थपणे पेलण्यासाठी गावित यांना केवळ आपल्या ‘अ‍ॅश्युअर्ड व्होटस्’वर भिस्त ठेवून भागणार नाही. मतदारसंघात एकूण नऊ तालुक्यांचा भाग समाविष्ट आहे. त्यापैकी सुरगाणा हा माकपचा पर्यायाने गावितांचा अभेद्य असा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यात ते आघाडी मारतील, यात त्यांच्या विरोधकांनाही शंका नाही. इथल्या मतांचा मोठा गठ्ठा गावितांच्या पारडय़ात पडणार आहे. शिवाय गेल्या काही दिवसांत सहयोगी किसान सभेनेही विशेषत: चांदवड, दिंडोरी व नांदगाव भागात आपला पाया रुंदावला आहे. त्याचाही लाभ गावित यांना होईल. मनमाड मधील रेल्वे, भारतीय अन्न महामंडळाची गोदामे या ठिकाणी अजूनही मूळ धरून असलेल्या माकपच्या कामगार चळवळी ही सुद्धा त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.
माकपने सातत्याने लावून धरलेल्या वनजमीनींच्या प्रश्नाचे दृष्य स्वरुपातले लाभ आता आदिवासींसमोर येऊ लागल्याने भूमीहीन आणि निम्न आर्थिक स्तरातल्या आदिवासींना माकपचे अधिकच आकर्षण वाटू लागले आहे. सुरगाण्यातून आमदार म्हणून सातत्याने निवडून येत असल्यामुळे कामकाजाचा असलेला प्रदीर्घ अनुभव आणि एवढय़ा वेळा निवडून येऊनही अद्याप फारशी न डागाळलेली प्रतिमा हे मुद्देही गावितांच्या पथ्थ्यावर पडणारे आहेत. त्यातच डाव्या आघाडीचा पाठींबा मिळाल्याने गावितांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळेच की काय, वृन्दा करात, सीताराम येचुरी प्रभुतींच्या जाहीर सभा अखेरच्या टप्प्यात आयोजित करून मतदारसंघातील कार्यकर्त्यांना ‘चार्ज’ करण्याचाही माकपचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्रात माकपच्या दृष्टीने या एकमेव जागेवर आशेचा अंधुकसा किरण दिसण्याजोगी स्थिती असल्याने माकपने आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. पण, एवढे करूनही विजयाला गवसणी घालण्याएवढे बळ गावितांच्या पंखात येईलच, याची शाश्वती नाही. याचे कारण म्हणजे मुळात माकपची जी हक्काची मते आहेत त्यांचा गठ्ठा एवढाही मोठा नाही की तो लोकसभा मतदारसंघासारख्या व्यापक क्षेत्राचे पारडे आपल्या बाजुला झुकवू शकेल. त्यामुळे त्यांना डावी आघाडी आणि काठावरच्या मतांवर अवलंबून रहावे लागेल. पण डावी आघाडी केवळ आपले अस्तित्व राखून आहे, त्यामुळे त्यांची ताकद वगैरे आहे असे म्हणणे धाडसाचेच ठरेल.
निहाल अहमद यांच्या रुपाने मालेगाव विधासभा मतदारसंघात धर्मनिरपेक्ष जनता दलाची असलेली हक्काची मते प्राप्त परिस्थितीत गावित यांच्याकडे वळणे शक्य होते, परंतु आता मतदारसंघ फेररचनेत मालेगाव विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभेत गेल्याने माकपला तीही आशा नाही. नव्या रचनेत सुरगाणा व त्या लगतचा परिसर या बालेकिल्ल्यासह चांदवड, दिंडोरी, नांदगाव येथे माकपला स्थान असले तरी मतदारसंघातील उर्वरित भागात पक्षाची वाट बिकट आहे. विशेषत: येवला आणि निफाड भागात तर पक्षाचे नामोनिषाणही नसल्यासारखी स्थिती आहे. भाजप-सेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीतल्या स्थानिक नेतेमंडळींमध्ये आपसात कुरबुरी असल्या तरी त्यामुळे कुणी आपली शक्ती गावितांसाठी लावेल, अशी सुतराम शक्यता नाही. हे पाहता, गतवेळी लाखभर मते मिळविण्यापर्यंत मजल मारलेल्या गावित यांची गोळाबेरीज यंदाही थोडय़ाफार फरकाने तशीच राहील, अशी चिन्हे आहेत. साहजिकच विजयापर्यंत पोहचायचे तर त्यांना त्याहून कितीतरी अधिक मजल मारणे भाग आहे.