Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मालिक तो अच्छा है, मगर..
भाऊसाहेब :
निवडनुकीचा टाईम असून सक्काळपास्न गडी येकदम चुपचाप कसा, भावराव?
भाऊराव : भावडय़ाबद्दल म्हणताय ना, काहितरी बिनसलेलं दिसतयं खरं.
भाऊसाहेब : ना रे, भावडय़ा..
भावडय़ा : मूड नाय आपला, त्यात आणखी चर्चा करून डोकं फिरायला नको म्हणून गप्प बसलोय.

 

भाऊसाहेब : पर, झालं काय त्ये तर बोलशील.
भाऊराव : उमेदवारांनी विचारलं नसेल यांना किंवा यांच्या भाऊंना..
भावडय़ा : ..उमेदवाराचा काय संबंध?
भाऊराव : मग झालं काय?
भावडय़ा : उमेदवाराचा काही प्रश्न नाही. पण, जाऊद्या ..
भाऊराव : नक्की काय म्हणायचंय तुला?
भावडय़ा : स्पष्टच सांगायचं तर ‘मालिक तो अच्छा है, मगर चमचोंसे परेशान है’ अशी स्थिती आहे.
भाऊराव : सध्या इलेक्शन दौरे जोरात सुरू असल्यामुळे तुला ट्रकच्या पाठीमागे लिहिलेले शेर चांगलेच पाठ झालेले दिसतात. पण, ते सोड कुठला चमचा आडवा आला तुम्हाला?
भावडय़ा : आम्हाला आडवं यायची काय बिशाद आहे कुणाची, आम्हीच सगळ्यांना आडवं करून टाकू.
भाऊसाहेब : त्ये जाऊद्ये, कोन काय बोल्लं तुला सांग की जरा.
भावडय़ा : बोलायची हिंमत आहे का कुणामध्ये..
भाऊराव : पण मग काय ते सांग ना.
भावडय़ा : उमेदवाराच्या अवती-भोवती जे चमचे असतात, ते उमेदवारापर्यंत पोहचूच देत नाहीत कुणाला.
भाऊराव : पण, तुम्हाला कशाला पोहचायचं असतं तिथं ?
भावडय़ा : व्वा, असं कसं, आम्हीही फिरतो इकडं-तिकडं, लोकं काय बोलतात, काय सांगतात, त्याचा ‘फिडबॅक’ द्यायला नको..
भाऊसाहेब : आरं, पन त्येला गरज आसलं तर इचारील की त्यो तुमाला.
भावडय़ा : एकदा आपला उमेदवार म्हटल्यावर असं कसं करता येईल, आपल्याला त्यांना काही सांगणं जरूरी असतं.
भाऊराव : फक्त सांगायचं असतं ?
भावडय़ा : म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला..
भाऊराव : .. फक्त सांगायचं असतं की मागायचं असतं?
भावडय़ा : आम्हाला इतरांच्या तागडय़ात तोलू नका, एवढी वाईट वेळ आली नाही अजून. मागायचा काय संबंध, आपल्याला वाटतं, जे काय आहे ते त्यांना स्पष्ट सांगावं. त्यातून त्यांनी बोध घ्यावा, चुका टाळाव्यात.. पण, त्यांच्या अवतीभोवती फिरणारे फक्त खुशमस्करे आहेत. त्यांच्यामुळे उलट ते गाफील राहणार आणि..
भाऊराव : जे तुला समजतं ते त्यांना समजत नसेल तर ते त्यांचचं दुर्दैव म्हणायला हवं.
भावडय़ा : पण मग आपण काय करायचं?
भाऊसाहेब : येवडं मनावर न्हाई घ्यायचं. येकतर आपन चमचा बनून जायचं, न्हायतर गप घरात बसून राह्य़चं.
भावडय़ा : जसं तुम्ही दोघं बसता तसं.
भाऊराव : यस, करेक्ट!
पॉलिटिशन