Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

किमान काही कामे तरी मार्गी लागावीत’
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच सरकारने वृत्तपत्रांमधून पानभर (सरकारी खर्चाने)जाहिराती देवून पाच वर्षांत केलेल्या कामाचे पोवाडे गायले होते. पण अशा चित्रात मालेगावसारख्या ठिकाणची नेमकी स्थिती प्रतिबिंबीत होणे मुश्किल आहे. नव्या रचनेत मालेगावचा समावेश धुळे मतदारसंघात झाला असला तरी आतापर्यंत मालेगाव हा लोकसभेचा मतदार संघ

 

होता. अनेक वर्षे तो ‘राखीव’ स्वरूपाचा होता. या काळात येथे अनेकजण निवडून आले. काँग्रेसचे झेड. एम. कहांडोळे हे त्यातल्या त्यात परिचयाचे नाव! अनेक वेळा त्यांनी मालेगाव मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. जनता दलाचे हरीभाऊ शंकर महाले हेही दोन वेळा निवडून गेले. भाजपचे कचरूभाऊ राऊत हेही एकवेळा निवडून आले. या मतदारसंघापुरते बोलायचे तर लोकसभेची निवडणूक कधी जाहीर व्हायची अन पार पडायची हेही सर्वसामान्य जनतेला कळायचे नाही.फक्त काही जाहिरसभा अन मोजक्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक पार पडायची.
पण, अशा वातावरणामुळेच मालेगावचा विकास खुंटला. कोणतीही योजना दिल्लीहून मालेगाव पर्यंत पोहोचली नाही. राखीव म्हणून सतत या मतदारसंघाची उपेक्षाच झाली. इतर मतदार संघांची खासदारांच्या मदतीने होणारी भरभराट पाहून मत्सर वाटायचा. परंतु मालेगांवचे भाग्य कधी उजळलेच नाही. ‘दंगा करणारे शहर’ अशी (कु) ख्याती असल्यामुळे कोणीही शहराकडे लक्ष दिले नाही. वरवरची मलमपट्टी करून फक्त वेळ काढण्याचे धोरण राबविल्याने या मतदारसंघात कोणतेही लक्षात ठेवण्यासारखे काम झाले नाही. हे या शहर व परिसराचे दुर्दैव म्हणावे लागेल. निवडून आल्यावर उमेदवार कधी स्थानिक जनतेशी संपर्क ठेवायचेच नाहीत. त्यामुळे जनतेला गाऱ्हाणे घेवून कोठे जावे, कोणाला भेटावे हे कधीच समजले नाही. अनेक प्रश्न असताना केंद्राकडून कोणतीही मोठी योजना या शहरासाठी आली नाही. उद्योग व्यवसाय वाढीसाठी या शहरात सर्व गोष्टींची उपलब्धता असूनही परंपरागत पॉवरलूम शिवाय येथे इतर व्यवसायाचे स्वरूप वाढले नाही. औद्योगिक क्षेत्रासाठी ‘डी झोन’ जाहीर होवूनही त्या ठिकाणी अद्याप एकही कारखाना सुरू झालेला नाही. केंद्रातर्फे अनेक योजना या शहरासाठी आणता आल्या असत्या. परंतु आपसात मेळ नसल्याने व राजकीय इच्छाशक्ती प्रबळ नसल्याने पंचवीस वर्षांपासूनची जिल्हा निर्मितीची मागणीही अद्याप पूर्ण होवू शकलेली नाही. एवढय़ा वर्षांमध्ये खासदार निधीचा वापर ही कुठे झाला हेही कळत नाही. एकूणात हा मतदारसंघ वाऱ्यावर सोडल्यासारखाच राहिला. या पाश्र्वभूमीवर कामाची धडाडी, कल्पकता व आपल्या वरिष्ठांकडे पाठपुरावा करून मतदारसंघाचे चांगले भले करणारा खासदार निवडून जाणे अपेक्षित आहे. आता तर ‘धुळे’ हा खुला मतदार संघ अस्तित्वात आल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. पण, काही ठिकाणी प्रांतवाद सुरू झाला आहे. खरे तर खासदार कोणत्याही भागाचा असो, कोणत्याही पक्षाचा असो त्याने या मतदारसंघासाठी ठोस व भरीव कार्य केलेच पाहिजे. आता मतदारांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता असलेल्या खासदाराची निवड व्हावी व याभागाची अनेक वर्षांपासून असलेली उपेक्षा थांबावी हीच या भागातील जनतेची अपेक्षा आहे. फक्त खोटी व पोकळ आश्वासने न देता जे शक्य आहे ते मनापासून करण्याची इच्छा असणारा खासदार असावा. आज खासदारांना अनेक सोयी सवलती उपलब्ध आहेत. पगाराव्यतिरिक्त अनेक सोयी दिमतीला आहेत. नंतर निवडून आले नाही तर पेंशन योजना आहेच. ‘इतर’ जे काही चांगभलं होईल त्याच्यापाशी जनतेला काही देणे घेणे नाही. त्यांना फक्त काम करणारा, मतदारांशी संपर्क ठेवून त्यांच्या अचडणी समजावून घेणारा व जनतेच्या उपयोगात येणाऱ्या विविध योजना आणणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. आधीच्या लोकप्रतिनिधींनी न केलेल्या कामाची कसर काढून फक्त दिल्ली मुक्कामी न थांबता मतदारसंघातही वेळोवेळी येऊन सुसंवाद साधणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. टेक्सटाईल उद्योगाच्या ऊर्जितावस्थेसाठी प्रयत्न करून या व्यवसायासाठी केंद्राकडून भरीव मदत आणणारा प्रतिनिधीची गरजेचा आहे. शिक्षणक्षेत्र व वैद्यकिय क्षेत्रासाठी येथे काम करण्यास भरपूर वाव आहे. सर्व प्रकारचे शिक्षण देणारी महाविद्यालये येथे होणे गरजेचे आहे. रोजगार निर्मिती होण्यासाठी वेगवेगळे उद्योग या ठिकाणी स्थापन होऊ शकतात.. अपेक्षा तर खूप आहेत, त्यापैकी थोडय़ा तरी पूर्ण करणारा प्रतिनिधी असावा.
सतीश कलंत्री
अध्यक्ष, मालेगांव र्मचटस् को-ऑप बँक