Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

ढगाळ वातावरण व पावसाच्या शिडकाव्याने वातावरणात बदल
प्रतिनिधी / नाशिक

उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नाशिककरांसाठी मंगळवारची सकाळ काहिशी वेगळी अनुभूती देणारी ठरली. शहर व आसपासच्या परिसरात पुन्हा एकदा बेमोसमी पावसाचा शिडकावा झाल्याने आणि दिवसभर वातावरण ढगाळ राहिल्याने तापमानात एकाएकी बदल झाल्याचे जाणवत होते. या पावसाचा फारसा परिणाम द्राक्षबागांवर होणार नसला तरी गव्हासह अन्य पिकांसाठी तो त्रासदायक ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातही थोडय़ाफार फरकाने असेच वातावरण होते. धुळे शहरात सकाळी ढगाळ वातावरण तर जळगावमध्ये हलक्या सरी

 

बरसल्या.
मार्चच्या प्रारंभापासून वाढणारे नाशिक जिल्ह्य़ाचे तापमान एप्रिलच्या पूर्वाधात ४० अंशाचा आकडा पार करेल अशी चिन्हे दिसत आहेत. धुळे, जळगाव भागात तर काही ठिकाणी त्याने आताच हा आकडा पार केला आहे. त्यामुळे उकाडय़ामुळे वैतागलेल्या नागरिकांना मंगळवारी सुखद धक्का बसला. नाशिक शहर व परिसरात तर काही वेळातच पावसाच्या हलक्याशा सरी बरसू लागल्या. शहरातील पंचवटी, गंगापूररोड, नाशिकरोड, सिडको, इंदिरानगर, सातपूर परिसरात पावसाचे तुरळक प्रमाण असले तरी शहरालगतच्या मखमलाबाद, दिंडोरी, मातोरी व वणी परिसरात मात्र त्याचा जोर अधिक होता. हवामानशास्त्र विभागाच्या स्थानिक केंद्रात दोन मिलीमीटर पावसाची तर २१.१ इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.
यावेळी गारा पडल्या नाहीत. त्यामुळे द्राक्षबागांचे फारसे नुकसान होणार नसल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. मात्र गव्हासह कांदा, आंबा आदि पिकांना हा पाऊस चांगलाच तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत.