Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

दिंडोरीत मित्रपक्षांच्या सहकार्याच्या प्रतीक्षेत आघाडी व युती
घडामोडी, नाशिक / प्रतिनिधी

काँग्रेस-राष्ट्रवादी प्रमाणेच भाजप-शिवसेना यांच्यातील रूसव्या-फुगव्याचे नाटक अद्यापही दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सुरू असून सर्वच पक्षांचे बडे नेते त्यामुळे वैतागले आहेत. मित्रपक्षांच्या सहकार्याशिवाय संपूर्ण मतदारसंघात प्रचार यंत्रणा राबविणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभांवर आघाडी तसेच युतीच्या उमेदवारांना अवलंबून

 

राहावे लागणार आहे.
पेठ-सुरगाण्यामध्ये माकपचे उमेदवार जी. पी. गावीत यांचे असलेले वर्चस्व, नांदगाव मतदारसंघात काँग्रेस-रिपाइंची नाराजी, कळवणमध्ये आ. ए. टी. पवार यांचा अलिप्तपणा अशी स्थिती असल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांची बरीचशी भिस्त निफाड, येवला व दिंडोरी या मतदारसंघावर राहणार आहे. त्यामुळेच या तीन तालुक्यांमध्ये प्रचार यंत्रणा अधिक गतीमान करण्याकडे राष्ट्रवादीकडून लक्ष देण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री छगन भुजबळ यांचा येवला मतदारसंघ दिंडोरीतच येत असल्याने त्यांच्यासाठी झिरवाळ यांची उमेदवारी प्रतिष्ठेची झाली आहे. येवला तालुक्यातील काँग्रेसचे नेते व पदाधिकारी यांना प्रचारासाठी विशेष आमंत्रित केले जात असून ते कोणत्याही प्रकारे नाराज होणार नाहीत, याची काळजी घेण्यात येत आहे. कळवणमध्ये मात्र पवार समर्थक प्रचारात सहभागी होत नसल्याचे उघडपणे दिसून येत असल्याने राष्ट्रवादीपुढील समस्या वाढल्या आहेत. चांदवड, निफाड तालुक्यातही त्यांना गटबाजीला सामोरे जावे लागत आहे. जनतेमध्ये निवडणुकीविषयी कोणत्याही प्रकारची उत्सुकता नसल्याने दिंडोरी मतदारसंघात निवडणूकमय वातावरण अद्यापही जाणवत नाही.
युतीचे उमेदवार खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या प्रचारात अनेक ठिकाणी अद्यापही शिवसेनेची फारशी साथ मिळत नसल्याने भाजपकडून स्थानिक पातळीवरील नेत्यांची मनधरणी करावी लागत आहे. पिंपळगाव येथे झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर मतदारसंघात युतीकडून एकही सभा न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आलेले शैथिल्य दूर करण्यासाठी ११ एप्रिल रोजी नांदगाव व येवला येथे गोपीनाथ मुंडे यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. नितीन गडकरींची वडाळीभोई, सुषमा स्वराज यांची येवला येथे सभा होणार आहे. माकपचे गावीत यांच्यासाठी राष्ट्रीय नेत्या वृंदा करात या नऊ व ११ एप्रिल या दोन दिवसात चार सभा घेणार आहेत.