Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

केबल ऑपरेटर्सच्या मनमानीविरूध्द ग्राहक पंचायतीचे आवाहन
नाशिक / प्रतिनिधी

अखंडितपणे केबल प्रसारण न करणे, नियमांनुसार तक्रारींचे निरसन न करणे, यासारख्या समस्या वारंवार उद्भवत असल्याने केबल ऑपरेटर्सविरूध्द अशा तक्रारी दाखल करण्यासाठी ग्राहकांनी

 

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीशी संपर्क साधण्याचे आ़वाहन करण्यात आले आहे.
केबल ऑपरेटर्सकडून सध्या भारनियमनाच्या नावाखाली पैसे घेऊनही विस्कळीत सेवा देणे, तक्रारी न सोडविणे, हा टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या परिपत्रकानुसार गुन्हा असू शकतो. वीज पुरवठय़ात बाधा येत असल्यास ‘बॅक ऑफ पॉवर सप्लाय’ असला पाहिजे.
हे प्रत्येक केबल ऑपरेटर्सला बंधनकारक असूनही नाशिक शहरात तशी व्यवस्था न ठेवल्यामुळे केबल ग्राहकांना महत्वाच्या प्रसारणास मुकावे लागत आहे. ही सेवेतील त्रुटी आहे. ही बाब ग्राहक पंचायतीने पत्राद्वारे स्थानिक केबल ऑपरेटर्सच्या नजरेत आणून दिली असून जनरेटर्सची व्यवस्था करून केबल ग्राहकांना अखंडित प्रसारण द्यावे अशी सूचना केलेली आहे.
यामध्ये सुधारणा न झाल्यास ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल करावी लागेल, असा इशाराही अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे.
ग्राहकांनी अशा स्वरूपाच्या आपल्या तक्रारी लिखीत स्वरूपात अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यालय, ६, धर्मराज प्लाझा, जुना गंगापूर नाका, नाशिक येथे जमा कराव्यात.
अधिक माहितीसाठी ग्राहकांनी मेजर पी. एम. भगत यांच्याशी ९३२५३८३०६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.