Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

अंध-पंगु सदावर्ताच्या वर्धापनदिनी सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव
नाशिक / प्रतिनिधी

येथील श्री गाडगे महाराज ट्रस्टच्या अंध-पंगु सदावर्ताच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त सेवाकार्य करणाऱ्या नाशिक जिल्ह्य़ातील सेवाभावी व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यावेळी अंध-अपंगांना

 

फराळाचे वाटपही करण्यात आले.
चैत्र शुद्ध एकादशी श्री रामरथयात्रेच्या मुहूर्तावर १९३६ मध्ये संत गाडगे महाराज यांनी नाशिक येथे भुकेलेल्यांना जेवण मिळावे म्हणून अंध-पंगु सदावर्ताची संकल्पना राबविली. त्यानुसार अंध-अपंग, कुष्ठरोगी, निराश्रीत भुकेलेल्यांना गुळ, शेंगदाणे देण्याची प्रथा सर्वप्रथम सुरू केली. नंतर अन्नदाते मंडळींच्या इच्छेनुसार संत गाडगे महाराज यांनी बेसन-भाकरी, भाजी-पोळी, वरण-भात अशा प्रकारे अन्नदान सुरू केले. त्याचा लाभ सुरूवातीस सुमारे पन्नास अंध-अपंग घेत असत. आज नाशिक तीर्थक्षेत्राचे महानगरामध्ये रुपांतर झाले आणि अंध-अपंगांची संख्या देखील वाढली असून दररोज ४०० पेक्षा अधिक अंध-अपंग, कुष्ठरोगी, निराधार या अंधपंगु सदावर्ताचा लाभ घेतात. नित्याने दुपारी ठिक चार वाजता वरण, भात, भाजी, चपाती तर बहुतांशी मिष्टान्न पंगती पार पडत असतात. नुकतीच वयाचे शंभर वर्ष पूर्ण करणारे तसेच राजकीय क्षेत्राबरोबरच शैक्षणिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे माजी आमदार दुलाजीनाना पाटील आणि दुसरे शतायुषी धार्मिक क्षेत्रामध्ये आपले आयुष्य अर्पण करणारे वारकरी संप्रदायाचे अध्र्वयु गबाजी बाबा गायकवाड यांचा ट्रस्टच्या वतीने वसंत बोधले आणि चंदुलाल शाह यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्याचबरोबर नाशिक महानगरामधील मायके एम्प्लॉईज फोरमचे अध्यक्ष नानासाहेब शिंदे, तुलसी आय हॉस्पीटलचे मुख्य कार्यकारी संचालक मेजर (निवृत्त) डी. के. झरेकर, डॉ. नारायण देवगांवकर, सुरेश रावत, बाळासाहेब पाटील या सेवाभावी व्यक्तींचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचलन व संयोजन अशोक देशमुख तर प्रास्तविक ट्रस्टचे उत्तमराव बापुसाहेब देशमुख यांनी केले. आभार शंकरराव ठाकरे यांनी मानले.