Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे निसर्गप्रेमीचा सत्कार
नाशिक / प्रतिनिधी

आजकाल धावपळीच्या जगण्यात वाढत्या प्रदुषणाने आरोग्यावर परिणाम होत आहे. कामाच्या

 

रहाटगाडय़ातून एखाद्या निवांतक्षणी मोकळ्या हवेत किंवा बगीचात निवांतपणाचे काही क्षण घालवावे असे प्रत्येकालाच वाटते. परंतु हा निवांत क्षण आणि बगीचा हे समीकरण जुळून येणे तसे दुरापास्त. मनुष्याला असणारी निसर्गाची ओढ जन्मजात असली तरी निसर्गाचे सान्निध्य सर्वानाच लाभते असे नाही. या परिस्थितीवर नाशिक येथील माधव गोसावी यांनी घरच्या घरी उपाय शोधून काढला. त्यांनी आपल्या घरामध्येच सुंदर बगीचा फुलविला आहे. त्यांच्या या निसर्ग प्रेमाचा सन्मान नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे नुकताच करण्यात आला.
साधारणत बंगला बांधल्यावर, घराच्या आजुबाजुचा वापर गुलाब, शोभिवंत झाडे, नारळ लावण्यासाठी होतो. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे ‘टूबीएचके’ जमान्यात मोकळी जागा, अंगण कोणाला मिळणार? यासाठी गोसावी यांनी घरामध्येच अरेका पाम, गोल्डन बांबु झाडांबरोबर वॉटरफॉलचा कलात्मकरित्या वापर केल्याने तिथे असणाऱ्या बगिच्यात आपणच बसल्याचा भास होतो. येणाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी दाराजवळ असलेली मधुमालती, मोगरा, गुलाब, काश्मिरी कुफीया, संक्रात वेल, हायपोमिया, कोलियस, बालरूम या वेली येणाऱ्याला सुगंधाचा नजराणा पेश करतात. पावसाळ्यामध्ये घरात असतांना मोतीच बरसत असल्याची अनुभूती मिळते. दगड-मातीच्या बांधकामात निसर्ग सौंदर्य जपतांना गोसावी यांनी या बगिच्यावर खूप मेहनत घेतली आहे. ते रोज सकाळी दोन तास स्वत बागेची मशागत करतात. त्यांच्या मेहनतीमुळे बागेतील वृक्षवेली हिरवाईने बहरलेली आहेत. बगिचामध्ये कुठेही कीड वा वास येत नाही.
हिरवाईत रमणाऱ्या माधव गोसावी यांचा नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे शोभिवंत झाड देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी महापौर अ‍ॅड. मनीष बस्ते, वैद्य विक्रांत जाधव, निसर्ग अभ्यासक भास्कर शेरे, डॉ. विक्रम शहा, सुजीत जाधोर, निशांत नहाटा, कैलास राठी, प्रा. राजेंद्र खैरणार, उषा कंसारा उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी सूत्रसंचालन केले तर धीरज वारके यांनी उपस्थितांचे आभार मानले.