Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९

अडचणीतील पतसंस्थांना सहकार विभागही जबाबदार
प्रश्न जिव्हाळ्याचे, वार्ताहर / जळगाव

जिल्ह्य़ात तब्बल ९५० नागरी सहकारी पतसंस्था असून त्यातील जवळपास ९० टक्के संस्था सद्यस्थितीत कोणत्या ना कोणत्या कारणाने बंद पडल्या आहेत. या संस्थांनी सहकार कायद्यातील विविध तरतुदींचे पालन केले नाही, हे कारण पुढे केले जात असले तरी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या सहकार उपनिबंधक कार्यालयानेही संस्था संचालकांना नियमांचे पालन करण्यास भाग पाडले नाही. परिणामी, पतसंस्थांच्या बळावर उद्योजक, राजकारणी, व्यापारी व समाजातील प्रतिष्ठित ‘संस्थानिक’ झाले तर दुसरीकडे अडचणीत आलेले हजारो ठेवीदार आपल्याच कष्टाचे पैसे मिळविण्यासाठी लाचार झाल्याचे चित्र दिसत आहे. हजारो ठेवीदारांना अडचणीत आणणाऱ्या पतसंस्थांच्या संचालकांविरुद्ध स्थानिक लोकप्रतिनिधींनी बाळगलेले मौन चिंताजनक आहे. अनेक बडय़ा मंडळींचा या कथित घोटाळ्यांमध्ये समावेश असल्याच्या चर्चेमुळे ठेवीदारांच्या प्रश्नात लोकप्रतिनिधींनी रस घेतला नाही, असे सांगितले जाते. सहकारी संस्था अधिनियमन १९६० नुसार नाममात्र सभासद होण्याचा अधिकार फक्त नागरी सहकारी बँकांना आहे.

धुळ्यामध्ये दाजींच्या मौनव्रताचे सोईस्कर अर्थ
धुळे / वार्ताहर

धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस अंतर्गत निर्माण झालेला गुंता अद्याप कायम असून त्यातच अमरिशभाई पटेल यांच्या अर्जावरील निकाल राखून ठेवण्यात आल्याने हा मतदारसंघ नाटय़पूर्ण घडामोडींचा साक्षीदार होत आहे. जनता दलाचे निहाल अहमद व युतीचे प्रतापदादा सोनवणे या दोघांनीही प्रचारास वेग दिला असताना काँग्रेसचे आ. रोहिदास पाटील यांचे मौनव्रत कायम आहे. बंडखोरी करण्याची वेळ आता टळून गेल्याने त्यांचा जवाहर गट कोणत्या उमेदवाराला मदत करेल, याविषयी कोणतेच संकेत मिळत नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये संभ्रम कायम आहे.

रावेर मतदारसंघात विकासापेक्षा जातीय समीकरणांची अधिक चर्चा
जळगाव / वार्ताहर

विकास कामांपेक्षा जातीचे समीकरण कसे ‘फिट्ट’ बसवावे, याची चिंता रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवारांपुढे असून २००७ च्या पोटनिवडणुकीपर्यंत झालेल्या पंधरा निवडणुकांमध्ये येथून लेवा पाटील समाजाचेच उमेदवार विजयी झाले असले तरी पुनर्रचनेनंतर मात्र गणित पूर्णपणे बदलले आहे. या बदललेल्या समीकरणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न आता सर्वच उमेदवारांकडून होऊ लागला आहे. रावेर मतदारसंघात चोपडा तालुक्याचा समावेश आणि जळगाव तालुक्याचे वगळले जाणे, यामुळे मराठा मतदारांचे प्राबल्य वाढले आहे. ही मतपेटी पाहूनच राष्ट्रवादीने रवींद्र पाटील यांच्या रुपाने मराठा समाजाचा उमेदवार रिंगणात उतरविला आहे. बहुजन समाज पक्षानेही याच आधारावर सुरेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

जळगावमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम थंड मात्र फलक हटाव मोहीम जोरात
जळगाव / वार्ताहर

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरात प्रभावीपणे राबविण्यात येत असलेली अतिक्रमण हटाव मोहीम सद्यस्थितीत पूर्णपणे थंडावल्याचे चित्र दिसत असून अतिक्रमणाची स्थिती ‘जैसे थे’ होत असताना महापालिकेने आता शहरात ‘फलक हटाव’ ची मोहीम तीव्रपणे सुरू केली आहे.
शहरातील सर्व प्रमुख रस्ते आणि चौकात अतिक्रमण वाढले. फेरीवाल्यांची प्रचंड संख्या वाढल्याने किंबहुना त्यांनीच महत्वाच्या ठिकाणांवर कब्जा मिळवल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. यामुळे शहरात वाहन चालविणेच काय, पायी चालणेही मुश्किल झाले होते.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा मेळावा
नंदुरबार / वार्ताहर

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना ही शिक्षकांच्या हिताचाच सदैव विचार करीत असल्याने संघटनेत नवा-जुना असा कोणताही वाद नाही, त्यामुळे संघटना आजही एकसंघ आहे, असे प्रतिपादन संघटनेचे प्रांताध्यक्ष प्रा. दत्तात्रय धर्मे यांनी केले. जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा जिल्हा मेळावा येथे प्रा. बी. ए. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्य सरचिटणीस प्रा. पंडित पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांवरील अन्यायाच्यावेळी संघटना त्यांच्यासाठी लढली. चवथ्या आणि पाचव्या वेतन आयोगात शिक्षकांवर झालेल्या अन्यायाविरूध्द शिक्षणमंत्री, अर्थमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याशी संघटनेने चर्चा केली. आंदोलन, चर्चा, संप या माध्यमातून शासनावर दबाव आणून सुधारित वेतन श्रेणी शिक्षकांना मिळवून दिली. तसेच प्रलंबित समस्यांसाठी संबंधितांकडून सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासनही संघटनेने मिळविल्याचे धर्मे यांनी सांगितले. प्रा. पाटील यांनी अंशदायी पेन्शन योजना रद्द करून पूर्वीचीच पेन्शन योजना लागु करणे, निवडश्रेणीसाठी २० टक्क्यांची अट रद्द करणे, विनाअनुदान तत्व रद्द करणे, पाचव्या वेतन आयोगानुसार जानेवारी १९९६ पासून सुधारित वेतनश्रेणी लागु करणे, माहिती तंत्रज्ञान विषयासाठी नियमित शिक्षक मिळणे आदी अनेक प्रस्ताव शासनाकडे दिल्याचे सांगितले. यावेळी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. राजेंद्र शिंदे आणि ग. स. बँक संचालकपदी निवड झाल्याबद्दल प्रा. दत्तात्रय शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डी. सी. पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ईश्वरलाल जैन सातत्याने डावलत असल्याचा आरोप
जळगाव / वार्ताहर

रावेरमधून राष्ट्रवादीची उमेदवारी न मिळाल्यामुळे भुसावळचे आ. संतोष चौधरी व त्यांचे बंधू यांची नाराजी कायम असून राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ईश्वरलाल जैन हे आपणास डावलत असल्याचा आरोप अनिल चौधरी यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर येथून कोणाला उमेदवारी द्यायची याबद्दल जैन हे आतापासूनच बोलू लागल्याने आमचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आम्ही का म्हणून सहन करावा, असा सवाल चौधरी यांनी केला. रावेर लोकसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी आ. चौधरी यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे पर्यंत प्रयत्न केले. मात्र पक्षाने रवींद्र पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर चौधरी समर्थक गट भडकला. उमेदवारी बद्दल नाराजी व्यक्त करून चौधरींच्या भावाने समर्थकांचा मेळावा घेऊन राजीनामे देण्याचा इशारा दिला. नंतर चौधरी यांनी सामंजस्याची भूमिका घेत पक्षासोबतच राहणार असल्याचे वक्तव्य करून पवार सांगतील ते काम करण्याचे जाहीर केले. तथापि, त्यांचे बंधू अनिल यांनी नाराजीचा सूर कायमच ठेवत प्रदेश उपाध्यक्ष इश्वरलाल जैन यांच्यावर तोफ डागली आहे. विधान परिषदेसाठी आपण इच्छूक व प्रभावी असताना जैन यांनी पारोळा येथील ए. टी. पाटील यांना उमेदवारी दिली. जेव्हा जिल्ह्य़ाला मंत्रीपद देण्याची वेळ आली तेव्हा संतोष चौधरी यांना डावलून प्रभावहिन व समर्थकांचे पाठबळ नसलेल्या व्यक्तीला मंत्रीपद बहाल करण्यात आले. आता लोकसभेच्या उमेदवारीसाठी पवार व माजी प्रदेशाध्यक्ष अरूण गुजराथी यांनी शब्द दिलेला असताना ऐनवळी त्यात बदल करण्यात आला. या साऱ्यामागे जैन यांचेच कारस्थान असल्याचा व त्यांनीच आपणास डावल्याचा आरोप चौधरी यांनी केला. विधानसभा निवडणुकांना अजून अवकाश असताना मुक्ताईनगर मतदार संघातून उमेदवारीबद्दल जैन यांनी आताच नाव जाहीर करून टाकल्याचेही चौधरी यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देण्याचा इशारा देणाऱ्या चौधरीबाबत ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.